Friday, May 9, 2025

विशेष लेखसंपादकीय

आयुष्याची अक्षय वाटचाल...

आयुष्याची अक्षय वाटचाल...


  • सुरक्षा घोसाळकर, पवई, मुंबई



सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नये यासाठी हिंदू धर्मामध्ये सनातन संस्कृती आणि संस्कार यांची जोपासना करणारे विविध सण साजरे केले जातात. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून या तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन वास्तूत प्रवेश, वस्तू विकत घेणे, आर्थिक व्यवहार करणे, विवाह करण्याची पद्धत आहे.


आपली संस्कृती अक्षय ठेवण्यासाठी आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या, पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होणाऱ्या पिढीला प्रत्येक ऋतूमध्ये येणाऱ्या सणांचे महत्त्व, ग्रहनक्षत्र, तारकामंडल यासकट विज्ञानाची सांगड घालून पटवून देणे ही काळाची गरज आहे. जेणेकरून त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता कार्यान्वित करून विकासाचे मूळ हे भारतीय संस्कृतीतच आहे, याची जाणीव होईल. आपले पूर्वज महान होते. त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीसोबत चांगले विचार, चांगली वागणूक अंगीकारून वैयक्तिक विकासाबरोबर सामाजिक जाणीव निर्माण करून जीवनाचे सोने करण्याची दिशा देणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये नाते संबंध, सात्त्विक आहारामुळे मानसिक, शारीरिक, बौद्धिक आरोग्य अक्षय ठेवता येईल.


अक्षय्य तृतीयेला केलेली कृती अक्षय राहते म्हणून घराजवळ अनेक वर्षे टिकतील, असे वृक्ष लावून नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करूया. शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध या तन्मात्रांच्या सहाय्याने पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांची उपासना करूया. दान करायचेच असेल, तर अक्षयपात्र बनून सूर्याच्या प्रखर उष्णतेने त्रस्त पशू, पक्षी, प्राणी, श्रमजीवी यांच्याकरिता अन्न, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था करून त्यांची सुरक्षितता वाढवूया. परिसर स्वच्छता, आरोग्य, कार्यक्षमता, आर्थिक साक्षरतेसाठी विविध कौशल्य वाढीचे उपक्रम राबवूया. दिनचर्येमध्ये लय, राग, ताल, वेद, ग्रंथांचे रसग्रहण करूया.


सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार करूया. प्रत्येकाला आत्मसन्मान, संरक्षण देऊन देशहित जपूया. संविधान, नैतिक मूल्य जपणारे, कायदा सुव्यवस्थेचे भान राखणारे, सामाजिक ऐक्य आबाधित ठेवणारे प्रामाणिकपणे, सचोटीने, सेवाभावे, जनसेवा हितार्थ प्रभावी नेतृत्व निर्माण करूया.


भारताची जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर नोंद झालेली आहे. त्यामध्ये न कमावणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. वाढत्या लोकसंख्येला सेवा सुविधा पुरवताना अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सर्वसमावेशक राहणीमानाचा दर्जा उंचवण्यासाठी सणांमधील श्रद्धा आणि भावनेचा आदर करून सण साजरे करताना केवळ ऐश्वर्याचा दिखावा न करता तरुण पिढीने विना सहकार नाही उद्धार या भूमिकेतून सहकारी पद्धतीने एकमेकांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. सणांचे महत्त्व केवळ उत्सवप्रियता नसून वैचारिक प्रगतीसाठी, भविष्याचे नियोजन करण्यासाठी सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, घटना, संसदीय कायदे यांची जाण असलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, सरकारी आस्थापनातून निवृत्त झालेल्या अनुभव समृद्ध व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. वाचनकट्टा, उद्योग मार्गदर्शन, स्पर्धा परिक्षांकरिता अभ्यासिका निर्माण करून जाणीव जागृतीसाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.


बहुजन समाज, मागासवर्गीय, आदिवासी समाजाच्या पायाभूत समस्या सोडविण्यासाठी समाजाला एकसंघ करण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा नियोजन, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने विविध योजनांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून पतपेढ्या, बचत गटांची स्थापना करण्यासाठी या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊया. जाती भेदाच्या भिंती पाडून समाजामध्ये एकसंघता निर्माण करण्यासाठी आपल्यातील कौशल्याचा बालक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध योजना राबविताना राजकारण विरहित प्रचार, प्रसारमाध्यमांचा अवलंंब करावा. निर्बुद्धपणे प्रथांचे अनुकरण न करता प्रचलित अंधश्रद्धांना मूठमाती देऊन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तुमचे मनगट मातीशी घासा, त्यातून सोने निर्माण होईल, या संदेशाचे महत्त्व जाणून कुटुंब, समाज, देशाकरिता आपले योगदान देण्यासाठी सदैव तत्पर राहूया.


राष्ट्रीय संत, क्रांतीकारक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, उद्योजक यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करूया. दिनदर्शिकेतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व जाणून स्वतःमधील आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता, महत्त्वाकांक्षा वृद्धिंगत करून प्रत्येक क्षणाला नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. आपल्या प्रगतीमध्ये बहुमोल योगदान असलेल्या शिक्षक, शेतकरी, सैनिक, लोकहिताचे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती, प्रशासकीय यंत्रणा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. स्वतःमधील अलौकिक गुणांचे आत्मपरिक्षण करून जागतिक पातळीवर अक्षय कर्तृत्वाचा ठसा निर्माण करूया. आपणा सर्वांना सुरक्षित, आनंदी, निरोगी दिर्घायुष्याकरिता सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन निसर्गातील ज्ञात-अज्ञात शक्ती आपल्या


इच्छित मनोकामना पूर्ण करोत, या अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!

Comments
Add Comment