-
रवींद्र तांबे
आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्न, ऑक्सिजन आणि पाणी याची नितांत आवश्यकता असली तरी यामध्ये पाणी खूप महत्त्वाचे आहे. पृथ्वीवर फक्त ७१ टक्के पाणी असून त्यापैकी २ टक्के पाणी पिण्यालायक आहे. त्यात वाढती लोकसंख्या (जगात नंबर वन) व औद्योगिकीकरण यामुळे पाण्याचा जास्त वापर होतो तसेच अपव्ययसुद्धा होत असतो. तेव्हा आवश्यक कामासाठी पुरेसे पाणी वापरल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल. याची खबरदारी शासन स्तरावर होणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. तसेच पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास गावच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर रिकामे हंडे वाजवून पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. जर उन्हाळ्यात पाणी टंचाईला गावकऱ्यांना तोंड देण्याची वेळ येत असेल, तर एकजुटीने ‘प्रत्येक गावात एकच नारा, पाण्याची काटकसर करा’ असा आवाज दुमदुमून गेला पाहिजे. म्हणजे पाण्याचा होणारा अपव्यय नागरिक टाळू शकतात, तरच पाणीटंचाईवर आपण मात करू शकतो. मी लहान असताना मे महिन्यामध्ये माझ्या आयनल गावातील वाडीत येणाऱ्या पाटाचे पाणी कमी झाल्यावर जवळजवळ पंधरा ते वीस दिवस पाणीटंचाई निर्माण व्हायची. तेव्हा आम्हाला पिण्यासाठी पाणी दुरून आणावे लागत असे. एकदा पाऊस पडला की, माझ्या गावी पाणीच पाणी व्हायचे. तेव्हा आता जीवनात पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची गावातील प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. तेव्हा प्रत्येकांनी पाणी वाचवण्याचा ध्यास घ्यावा म्हणजे भविष्याचा विकास होऊ शकतो, हे प्रत्येक नागरिकांवर अवलंबून आहे.
पाणी वापराच्या संदर्भात विचार करता बऱ्याच वेळा गगनचुंबी इमारतींमध्ये पाण्याचा अपव्यय जास्त होताना दिसतो, तर झोपडपट्टी किंवा चाळीमध्ये अजूनही काही भागात पुरेसे पाणी येत नाही. तेव्हा पाण्यासाठी नंबर लावावे लागतात. यासाठी रहिवाशांना झोपमोड करावी लागते. त्यासाठी प्रत्येक वस्तीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे, म्हणजे पाण्याचे योग्य वाटप झाल्याने आपले सर्वांचे जीवन आनंदाने फुलेल.
पूर्वी विहिर, नद्यानाले यांचे पाणी लोक पीत असत. सध्या उद्योगधंद्यातील दूषित झालेले पाणी नदीनाल्यात सोडले जाऊ लागले. या पाण्याचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर होऊ लागला. बऱ्याच वेळा हे पाणी गरम करून लोक पिऊ लागले; परंतु लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने लोक नंतर नळाचे पाणी किंवा बंद बॉटलमधील फक्त पिण्यासाठी वापर करू लागले. पावसाळ्यात, तर आजही काही ग्रामीण भागात घराच्या छपरावर पडलेले पाणी बादलीमध्ये घेऊन कपड्याने गाळून नंतर पितात. काही वेळा सतत मुसळधार पाऊस लागल्याने पूरस्थिती निर्माण होते. अशा वेळी त्या ठिकाणच्या विहिरी पूर्ण पाण्याने भरल्या जातात किंवा बाहेरील पाणी विहिरीमध्ये जाते. तेव्हा नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी पावसाच्या पाण्यावर गावकऱ्यांना तहान भागवावी लागते. अशी वस्तुस्थिती पावसाळ्यात बऱ्याच गावामध्ये झालेली दिसून येते.
सध्या औद्योगिकीकरणाच्या नावाखाली पाण्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाण्याचा अपव्यय टाळा असे लोकांना आव्हान करण्याची वेळ आली आहे. मात्र अशी वेळ का आली? याचे कारण शोधले पाहिजे. तेव्हा पावसाळ्यात विहिरी खोदण्यापेक्षा आता विहिरीचे खोदकाम करून बांधल्यास पाणीही विपुल प्रमाणात मिळू शकते. पावसाळ्यात काय चार ते पाच फुटांवर पाणी लागते. पाणी लागल्याने पूजापाठ केली जाते. मात्र अशा विहिरी डिसेंबर महिन्यापर्यंत कोरड्या होतात. तेव्हा पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती पाहायला मिळते. अशा वेळी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. जेणेकरून नव्याने विहीर बांधत असताना उन्हाळ्यात विहिरीचे खोदकाम करून बांधण्यात यावेत. महत्त्वाची बाब म्हणजे अशा कामासाठी घाई करू नये. उद्याचा विचार करून काम हाती घ्यावे. यावर शासकीय अनुदान खर्च केला जातो. मात्र बऱ्याच विहिरी ओसाड पडलेल्या दिसून येतात. असे चित्र शेतात खोदलेल्या विहिरीच्या बाबतीत दिसून येते. सध्या लोक शेतीच करत नसल्यामुळे विहिरी ओसाड झालेल्या दिसत आहेत.
आज पाण्याच्या अभावामुळे मळे एकवेळ उन्हाळ्यामध्ये लांबून हिरवेगार दिसणारे आता ओसाड दिसत आहेत. झाडांमुळे हिरव्यागार दिसणाऱ्या टेकड्यासुद्धा विकासाच्या नावाखाली वाळवंटासारख्या दिसू लागल्या आहेत. यासाठी पुन्हा झाडे लावणे गरजेचे असते. घोषणा केल्या जातात, तशा प्रकारच्या जाहिरातीने बस सजविली जाते. मात्र झाडे लावण्याकडे दुर्लक्ष केला जातो. पाहा ना, सध्या रस्त्यांचे चौपदरीकरणचे काम चालू असल्याने बऱ्याच प्रामाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. वास्तविक रस्त्याची रुंदी व सपाटीकरण झाल्यानंतर योग्य अंतर ठेवून रस्त्याच्या बाजूने नवीन झाडे लावणे आवश्यक आहे. तसे काम स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत करून घ्यावे. त्याचा महसूल पण त्यांना द्यावा म्हणजे एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात नकळत वाढ होते. तसेच स्थानिकांना काही दिवस रोजगारसुद्धा मिळू शकतो. म्हणजे पर्यावरण संतुलन राखले पाहिजे. झाडे असल्यामुळे झाडांच्या मुळांमुळे पाणी अडविले जाते. पाणी अडविले गेल्याने जमिनीत मुरते. याचा परिणाम पाण्याची पातळी टिकून रहाण्याला मदत होते. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतो त्याचे सर्वे करून त्यावरती योग्य ती उपाययोजना सुचवून कायदेशीरपणे कारवाई करण्यात यावी, म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळता येईल.