Saturday, January 18, 2025
Homeक्रीडाIPL 2024गुजरातसमोर लखनऊचे आव्हान

गुजरातसमोर लखनऊचे आव्हान

अव्वल स्थानावर झेप घेण्याचा सुपर जायंटसचा प्रयत्न

  • वेळ : दुपारी ३.३०
  • ठिकाण : एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ

लखनऊ (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या १६व्या मोसमाची गाडी आता हळूहळू पुढे सरकते आहे. या स्पर्धेत एकापाठोपाठ एक थरारक सामने पाहायला मिळत आहेत. त्यात मागील हंगामातील दोन नवे पण तगडे संघ लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी डबल हेडरचा पहिला सामना अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. गेल्या मोसमाप्रमाणे या मोसमातही दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत चांगली आहे.

गेल्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाने राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला. तर त्याउलट गत सामन्यात गुजरातचा राजस्थानने ३ गडी राखून पराभव केला होता. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या संघाने गुजरातचा पराभव केला. त्यात लखनऊने यंदाच्या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघाने सहा सामन्यांतून चार विजय नोंदवलेत आणि सध्या पॉइंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे गुजरातविरुद्ध विजय मिळवून गुणतालिकेतील प्रथम स्थान मिळवण्यासाठी लखनऊचा संघ प्रयत्न करेल. मागील सामन्यात लखनऊच्या गोलंदाजांनी कमाल करत राजस्थानला हरवले. फलंदाजी ढेपाळली असली तरी आरआरविरुद्ध गोलंदाजांनी कमी लक्ष्याचा बचाव केला. आवेश खान आणि मार्कस स्टॉइनिस यांनी अनुक्रमे तीन आणि दोन विकेट घेत राजस्थानला पराभूत करण्यास मोलाची मदत केली.

फलंदाजीमध्ये एलएसजीकडे काइल मेयर्स, निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस अशी ताकद आहे. मेयर्स अव्वल स्थानी सनसनाटी फॉर्ममध्ये आहेत, तर पूरन आणि स्टॉइनिस यांनी मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आहे. पण कर्णधार केएल राहुलचा फॉर्म थोडा चिंतेचा आहे. तथापि गत सामन्यात त्यालाही सूर गवसलेला दिसतोय. मात्र अष्टपैलू दीपक हुड्डा अद्याप प्रभावी खेळी खेळू शकला नाही. प्रतिभावान लेग-स्पिनर रवी बिश्नोई आणि अनुभवी अमित मिश्रा फिरकी विभागात चांगली कामगिरी करत आहेत, तर कृणाल पांड्यानेही सामना जिंकून देणारी कामगिरी केली आहे. मार्क वुड, आवेश खान आणि युधवीर सिंग चरक यांच्या रूपातही एलएसजीकडे चांगला वेगवान विभाग आहे. नवोदित नवीन-उल हकने राजस्थानविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात चमक दाखवली आहे.

दुसरीकडे, गुजरात टायटन्स सध्या काहीसे विखुरलेले दिसत आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाने पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि ते सध्या चौथ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या विजयानंतर, गुजरातला त्यांच्या पुढच्या सामन्यात शमी वगळता इतर गोलंदाजांच्या योगदानाच्या अभावामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. गुजरातसाठी रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल डावाची चांगली सुरुवात करताना दिसतात. गेल्या अनेक सामन्यांमध्ये शुभमनने सलामीची बाजू सांभाळून घेत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. गिल चांगल्या लयीत दिसतोय. पण साहाला सुद्धा त्याला साथ देण्याची गरज आहे. लखनऊविरुद्ध या दोघांनाही मोठा डाव खेळून संघाला मजबूत स्थितीत आणण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. मधल्या फळीत साई सुदर्शन, हार्दिक पंड्या आणि डेव्हिड मिलर फलंदाजीला उतरू शकतात. मात्र केन विल्यमसनला दुखापत झाल्यानंतर साईला कर्णधाराने प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले होते. पण साईला आतापर्यंत मोठी खेळी खेळता आलेली नाही, त्यामुळे संघात टिकण्यासाठी त्याला धडाकेबाज खेळी खेळावी लागणार आहे.

गुजरातकडे अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत राहुल तेवतिया आणि रशीद खानसारखे स्फोटक फलंदाज आहेत. ज्यांच्याकडे आपल्या स्फोटक खेळीने सामन्याचा मार्ग बदलण्याची ताकद आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीसाठी गुजरातचा कर्णधार पंड्या, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा यांच्यावर अवलंबून राहू शकतो. राशिद खान आणि मोहम्मद शमी चांगल्या लयीत गोलंदाजी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्स मागील सामन्यामधील पराभव मागे टाकून लखनऊ सुपर जायंट्सशी सामना करताना त्यांची विजयी मार्गावर परत येण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स आपल्या विजयाची गती कायम ठेवण्यास उत्सुक असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -