Monday, July 8, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘बिग बॉस’मधून ओळख मिळाली

‘बिग बॉस’मधून ओळख मिळाली

  • टर्निंग पॉइंट: युवराज अवसरमल 

माझ्या अभिनयाचा टर्निंग पॉइंट म्हणाल, तर माझ्या अभिनयाची सुरुवात झाली, जेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन, तेव्हा मी तिसरीत होते, मी मूळची बेळगावची. तेव्हा बेळगावला, ‘रायगडला जेव्हा जाग येते’ हे नाटक बसविले जात होते. त्यात मला शिवाजी महाराजांच्या छोट्या मुलाची राजारामची भूमिका मिळाली होती. ते मी नाटक केले. त्याचे भरपूर प्रयोग बेळगावला व इतर ठिकाणी झाले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी माझे फार कौतुक केले. मला ते फार आवडलं. त्यानंतर मी ठरवले की, मला अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्या नाटकापासून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली. तेव्हा मला अभिनयाची जास्त संधी बेळगावमध्ये मिळाली नाही. माझी आई वीणा लोकूर या क्षेत्रामध्ये असल्याने तिने ‘फुलोरा’ ही नाट्यसंस्था सुरू केली होती. त्यामुळे तिच्याबरोबर मी भरपूर बालनाट्य केले. बालनाट्य करता करता मी मुंबईला ऑडिशन देण्यासाठी जाऊ लागले. बालकलाकार म्हणून मला मुंबईला भरपूर कामे मिळाली. मालिका, जाहिरात, चित्रपट मिळाले. त्यानंतर रूपारेल कॉलेजमधून मी कॉमर्स स्नातक झाले.

माझ्या करिअरमधला टर्निंग पॉइंट म्हणाल तर तो आहे, ‘बिग बॉस सीझन १.’ बिग बॉसच्या अगोदर मी सहा-सात मराठी चित्रपट केले होते. एक बॉलिवूड चित्रपट देखील केला होता. खूप स्टेज शो केले होते. पण, मी लोकांपर्यंत पोहोचले नव्हते; परंतु जेव्हा मी ‘बिग बॉस’मध्ये काम केले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील माणसे मला ओळखू लागली. सई लोकूर कोण आहे, हे लोकांना माहीत होतं. ती ओळख मला मिळाली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचले. मी बिल्डिंगमधून खाली भाजी आणायला आले की, फॅन्स माझ्याकडे येऊन माझ्यासोबत फोटो काढायचे. हे आधी कधीच घडल नव्हतं. हे फॅन्सचे प्रेम मला नक्कीच बिग बॉसमुळे मिळाले.

माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणाल तर तो आहे. ‘कोविड’ जानेवारी २०२० मध्ये मला स्लीप डिस्कचा खूप त्रास सुरू झाला होता. मुंबईमध्ये मला डॉक्टरने बॅक रेस्ट सांगितले होते. त्या बॅक रेस्टसाठी मी आईबाबाकडे बेळगावला आले. मी फेब्रुवारीमध्ये बेळगावला आले आणि मार्चमध्ये ‘लॉकडाऊन’ सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये मला कळेना काय करावे? लॉकडाऊनमध्ये लग्नाच्या वेबसाइटवरून माझं व दीप रॉयचे सूर जुळले व दोन महिन्यांच्या आत आम्ही लग्नाच्या रेशीमगाठीत बांधलो गेलो. त्यानंतर माझं आयुष्य बदलत गेलं. दीप आयटीमध्ये आहे. त्यावेळी बंगलोरला लॉकडाऊन होता, त्यामुळे तो बेळगावला शिफ्ट झाला व घरून काम करू लागला. मी देखील घरून अनेक ब्रॅण्डेड वस्तूंच्या जाहिराती करू लागले. माझ्या सोशल मीडियावर त्या पोस्ट करू लागले. अशा प्रकारे काम केल्याचे समाधान देखील मला मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -