-
नंदकुमार पाटील: कर्टन प्लीज
सध्या व्यावसायिक रंगमंचावरती सुरेंद्र जगे लिखित आणि विशाल राऊत दिग्दर्शित ‘रियुनियन’ हे नाटक सुरू आहे. निवृत्त होईपर्यंत इमाने इतबारे बँकेत सेवा बजावल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांच्या पंगतीत बसल्यानंतर या मंडळींना स्वच्छंद आनंद आणि रंगसेवा करण्याची इच्छा झालेली आहे. ‘रियुनियन’ हे नाटक त्या मित्रांचे आहे. या नाटकाचे काही प्रयोग केल्यानंतर आपल्यात एक तरी प्रेक्षकप्रिय चेहरा असायला हवा, असे या सर्वांना वाटायला लागले. विशेषतः स्री भूमिकेसाठी शोध केल्यानंतर नाट्य प्रयोगाला संजीवनी देणारी संजीवनी अखेर त्यांना सापडली.
‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेत वच्छीची भूमिका साखर करणारी कलावती म्हणजेच संजीवनी पाटील. फौजी, राईचा पर्वत या एकांकिकेमध्ये शिवाय आता काही खरं नाही, आठवी पास या नाटकात दिसलेली. काही मालिकेत, वेबसीरिजसाठी तिने कामही केलेले आहे. नाही म्हटले तरी चौदा वर्षांचा तिचा प्रवास झालेला आहे. जे काही महासोहळे होतात किंवा प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले जातात, तिथे संजिवनीच्या नावाचा आग्रह धरलाय जातो. हे ती वलायांकीत अभिनेत्री असल्याचे दाखले देतात. आपुलकीने बोलवतात तिथे जाणार. पण एखादा हटके चित्रपट आपल्या वाट्याला यावे, असे तिला वाटते. तिने आतापर्यंत जेवढे म्हणून नाटके केली त्यात ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहिलेली आहे; परंतु या नव्या नाटकाने तिचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. रियुनियनमध्ये मैत्रीची गोष्ट सांगणारी कथा आहे. नाटकात श्रेय नामावली वाचताना ‘…आणि संजीवनी पाटील’ असा ज्यावेळी उल्लेख होतो, त्यावेळी तिला लय भारी वाटते. शिवाय जबाबदारी वाढल्याचीही जाणीव होते.