-
गोलमाल: महेश पांचाळ
प्रकरण एक : Dear Customer Your Bank Account has been Suspended today please update your PANCARD Immediately Click here link https://hsyvIr.web.app असा मेसेज तक्रारदारांच्या मोबाइलवर अनोळखी मोबाइल क्रमांकांवरून एक मेसेज आला होता. नमूद मेसेज हा त्यांना बँकमधून आला असावा, असे प्रथमदर्शनी त्यांना वाटले. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीने नमूद मेसेजमध्ये दिलेली लिंक ओपन केली. ती ओपन झाल्यानंतर बँकेच्या वेबसाइटसारखे दिसणारे पेज ओपन झाले. त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी कस्टमर आयडी व पासवर्ड टाकण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी बँकेचा कस्टमर आयडी व इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड टाकला. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर काही मॅसेज प्राप्त झाले. त्यामध्ये त्यांच्या इंटरनेट बँकिंगवर एक Beneficiary Account add झाल्याचे तसेच काही ओटीपी प्राप्त झाले. त्यानंतर लगेच त्यांच्या खात्यामधून एकूण एक लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. हे अचानक कसे झाले म्हणून ते गोंधळले.
प्रकरण दोन : या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना अनोळखी मोबाइल क्रमांकवरून एसएमएस आला होता. फिर्यादींचे बँक खाते बंद होणार असल्याचे सांगून मोबाइल एसएमएसद्वारे पाठविलेली लिंक http://tb.gy/kmw7wx वर जाऊन पॅन कार्ड अपडेट करण्यास त्यांना सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी त्यांच्या बँकेचा तपशील कॉलरने लिंकद्वारे पाठविलेल्या बँकेच्या बनावट वेबसाइटवर भरला. त्यावेळी फिर्यादीच्या बँक खात्यातून रुपये ९९ हजार ९८६ इतकी रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर तत्काळ वळविण्यात आली. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला चालू व्यवहार बंद करण्यासाठी कॉल केला व त्यासाठी फिर्यादींच्या मोबाइलवर आलेल्या ओटीपीची मागणी केली. त्यावर फिर्यादीने त्यांचे मोबाइलवर आलेले ओटीपी संदेश त्या व्यक्तीला दिला. त्यानंतर बँक खात्यामधून एकूण २ लाख ९९ हजार ९७० इतकी रक्कम इतर बँक खात्यांवर वळती झाली.
प्रकरण तीन : तक्रारदारांना ते घरी असताना त्यांच्या मोबाइल क्रमांकवर, Dear Customer Your— Netbanking A/C will be blocked today please update your PANCARD Just click on link http://bitly.ws/ALRs असा एक संदेश आला होता. त्यानंतर तक्रारदारानी सदरची लिंक ओपन करून पाहिली तेव्हा लिंकमध्ये पॅन कार्ड व आधारकार्डची माहिती भरण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर फिर्यादींनी विचारण्यात आलेली पूर्ण माहिती भरली. त्यानंतर त्यांना ओटीपी देण्यास सांगितले. त्यांनी तो ओटीपी दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर फिर्यादींनी त्यांच्या मोबाइलवर पाहिले असता त्यांच्या बँक खात्यामधून ९९,९९८ रुपये रक्कम वजा झाल्याबाबत मेसेज पाहिला.
बँक ग्राहकांना कशा प्रकारे फसविले जाते, त्यातील ही काही मोजकी प्रकरणे. बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस येत असतात. त्याचा गैरफायदा घेत एका आंतरराज्यीय टोळीने मुंबईत बँक ग्राहकांना वरील पद्धतीने फसविल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये बँकेची केवायसी अपडेट नसल्यामुळे तुमचे बँक खाते सस्पेंड करण्यात येईल किंवा केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली नागरिकांना फसवणूक आले होते. याबाबत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रारीमध्ये अचानक वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्व गुन्ह्यांचा सायबर शाखेमार्फत एकत्रित तपास करण्यात येत होता. गुन्ह्यांची उकल करण्याकरिता चार विशेष पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली होती. केवळ १२ दिवसांत कौशल्यपूर्वक तपास करून एकूण आठ आरोपीतांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले. या आरोपींकडून अशा प्रकारचे फसवणुकीचे एकूण २४ गुन्हे उघडकीस आले आहेत. देशातील पश्चिम बंगाल, झारखंडसह ४ राज्यात पोलिसांनी छापे टाकले. यातील काही आरोपी हे नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आहेत. तसेच या गुन्ह्यासंदर्भात मुंबईतील कॉल सेंटरवर धाड टाकण्यात आली. या कॉल सेंटरमधून वेगवेगळ्या राज्यातील सायबर गुन्हेगारांना बँकेचा डाटा पुरवला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या डाटावर काम करत काही बँक ग्राहकांना केवायसीच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढण्यात आरोपी यशस्वी झाले. या आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली,अशी माहिती सायबर गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त डॉ. बाळसिंग राजपूत यांच्याकडून देण्यात आली.
मुंबई गुन्हे शाखा पोलिसांचे नागरिकांना आवाहन
१. अनोळखी मोबाइल क्रमांकवरून आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये.
२. आपली गोपनिय माहिती वेबसाइटवर भरण्यापूर्वी नमूद वेबसाइटचा यूआरएल व्यवस्थित तपासा व बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
३. आपली बॅकेची केवायसी अपडेट करण्याकरिता आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत भेट द्या.
४. केवायसी अपडेट संबंधी येणाऱ्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
५. बँकेच्या कार्ड तपशील, पिन, ओटीपी पासवर्ड इत्यादी वैयक्तिक माहिती कोणासोबत शेअर करू नका.
[email protected]