कोल्हापूर : मार्च महिन्यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या पोलीस अधिकाऱ्यांना तब्बल ८ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सोशल मीडियात उपदेश देणारा तत्वज्ञानी सहाय्यक फौजदाराला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात सापडला आहे. या घटनेनंतर कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलीस दलात लाचखोरीचे प्रमाणव वाढतच चालले आहे.
फायन्सासमध्ये गेलेले वाहन परत मिळवून देण्यासाठी लाच घेताना जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचूक (वय ४८) याला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराने फायनान्सचे कर्ज घेत ओमनी वाहन खरेदी केले होते. त्यानंतर ते वाहन संबंधित तक्रारदाराने उमळवाडमधील मित्राला विकले होते. मात्र, या वाहनावरील हप्ता न भरता आल्याने परस्पर व्यवहार विकले होते. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेत वाहन परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदाराने अर्ज केल्यानंतर सोमनाथ चळचूकने १५ हजार लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
या सहाय्यक फौजदाराने डिसेंबर महिन्यात सोशल मीडियावर केलेली पोस्टही व्हायरल झाली आहे. ८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही? अशी विचारणा करणारी पोस्ट २८ डिसेंबर २०२२ रोजी केली होती. त्यामुळे या सहाय्यक फौजदाराची आता अस्सल कोल्हापुरी भाषेत सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे.
माणूस सोशल मिडियावर जसा दिसतो तसा नसतो, आता हाच लाचखोर पोलीस बघा, फेसबुकवर काय पोस्ट करतो आणि प्रत्यक्षात काय करतो… अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल झाल्या आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत फौजदाराचा क्लास घेतला आहे.