-
न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन
भारताने १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केली. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राष्ट्रासाठी आणि त्याच्या समृद्ध सभ्यतेसाठी अमृत काळाची संकल्पना समोर ठेवली. आपल्या मौल्यवान स्वातंत्र्याच्या शतकापर्यंतची म्हणजेच विक्रम संवत २१०४ (ग्रेगोरियन वर्ष २०४७) पर्यंतची आगामी २५ वर्षे-जो आपल्या प्रिय भारत देशासाठी अनंत शक्यता आणि परिवर्तनाचा काळ असेल. मोदीजींनी आपल्या दूरदृष्टीने आणि परिश्रमाने आपल्या देशाची प्रगती आणि यशाच्या नवीन युगाची सुरुवात करून सर्व देशबांधवांना हा उल्लेखनीय मार्ग दाखवला आहे. देशाच्या उन्नतीसाठी आणि उत्तम प्रशासनासाठी पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या अनेक उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण मोहीम म्हणजे त्यांचा कार्यक्रम, मन की बात. मन की बात हा एक अद्वितीय रेडिओ कार्यक्रम आहे की, जो वर्ष २०१४ मध्ये सुरू झाला. याच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केवळ दुर्गम भागातील नागरिकांशीच नव्हे तर समाजातील उपेक्षितांशी थेट संपर्क साधला. ‘मन की बात’ हा एक अतिशय अद्भुत कार्यक्रम आहे. कारण यात श्रोते आणि पंतप्रधान यांच्यात थेट संवाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान आपले हितचिंतक, मार्गदर्शक या नात्याने बौद्धिक, तात्त्विक आणि वैयक्तिक स्तरावर आपल्याशीच बोलत आहेत, अशीच प्रत्येक व्यक्तीची भावना होते. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याची हीच पद्धत सतत कायम ठेवली आहे. देशातील अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींना जन्म देणारा हा परिवर्तनशील रेडिओ कार्यक्रम ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरू झाला आणि ३० एप्रिल २०२३ रोजी १०० भागांचा टप्पा पूर्ण करीत आहे. पंतप्रधानांनी ‘पंचप्रण’ म्हणजेच भविष्यकालीन भारताचा अढळ पाया रचण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने घ्यायच्या पाच प्रतिज्ञा सांगून अमृत काळात प्रवेश केला आहे. यातील प्रत्येक पंचप्राणाचा भर प्रेरणादायी कृतीवर आणि राष्ट्र उभारणीला सुकर करण्यावर आहे. विकसित भारताचे ध्येय; वसाहतवादी मानसिकतेच्या सर्व खुणा काढून टाकणे; आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, ऐक्य बळकट करणे आणि कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे हे ते पण आहेत.
भारताने गेल्या दशकभरात पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती नोंदवली आहे. कोविड-१९ महामारीचे अभूतपूर्व आव्हान असताना, भारताने स्वतःच्या आणि जगाच्या जनतेच्या कल्याणासाठी स्वदेशी लसी तयार करून हे सिद्ध केले आहे. महामारीच्या काळात पंतप्रधानांनी मन की बातमधून भारताला स्वयंपूर्ण राष्ट्र आणि जागतिक स्तरावर समर्थ आर्थिक सत्ता बनण्याचा आग्रह केला होता. भारताने आपल्या मूलभूत तत्त्वांना अनुरूप असणाऱ्या सामाजिक स्थैर्य, आर्थिक समृद्धी, सांस्कृतिक संरक्षण आणि उत्क्रांती यांचा समावेश असलेल्या सभ्यताविषयक उद्दिष्टांमध्ये उत्कृष्टता मिळवण्याचा संकल्प केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांमध्ये या संकल्पाची भावना प्रभावीपणे पोहोचवली आणि जागृत केली. पंतप्रधानांनी देशबांधवांना परिवर्तनाचे माध्यम होण्यासाठी तसेच राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी सतत प्रेरणा दिली. मन की बात हे स्टार्ट-अप इंडिया मोहिमेला तसेच भारतातील तरुणांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारे उत्कृष्ट व्यासपीठ ठरले आहे. देशातील डिजिटल क्रांती या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. मन की बातमुळे देशातील सर्वांगीण घडामोडी लोकप्रिय करण्यात मोठा हातभार लागला आहे. मन की बात हे नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि विकसित राष्ट्राचे उच्च ध्येय गाठण्यासाठी त्यांना एकत्र आणण्याचे आणखी एक साधन बनले आहे.
आपली कला, साहित्य आणि संस्कृती हे नव्या भारताच्या रचनेचे आधारस्तंभ आहेत हे पंतप्रधानांनी ओळखले आहे. मन की बातच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या सामूहिक संपत्तीबद्दल सर्वसामान्यांना केवळ माहिती देण्याची जबाबदारीच त्यांनी स्वत:वर घेतली नाही तर ती परत मिळवण्यासाठी तसेच कला, साहित्य आणि सांस्कृतिक वारशाचे आधारस्तंभ पुन्हा उभारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. पंतप्रधानांनी जागतिक नेत्याची भूमिका बजावताना देशाचा अस्सल प्रतिनिधी म्हणून देशाच्या क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. आपल्या उपक्रमांमधून त्यांनी वसुधैव कुटुंबकम्या संकल्पनेला जागतिक स्तरावर चालना दिली आहे. यामुळे भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या ध्येयासाठी अभिमान वाटणाऱ्या आणि प्रवृत्त झालेल्या नागरिकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
देशासाठी ‘अमृत काळची घोषणा करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आपली प्रतिभा, संसाधने आणि बलस्थाने यांच्या सहाय्याने यशाच्या दिशेने प्रवास सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्राला त्यांनी सबका प्रयासची जोड देऊन आत्मनिर्भर भारत; उभारण्याच्या प्रवासात देशवासीयांना आपले योगदान देण्याचे आवाहन केले. ग्रामीण-शहरी भेद दूर करून तसेच कमीत कमी सरकार, अधिक प्रशासन या मंत्राला चालना देऊन समृद्धीच्या नव्या उंचीवर जाण्याचे उद्दिष्ट ठेवत पंतप्रधानांनी ‘अमृत काळाचा मार्ग आखला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सहभागाने, समर्पणाने आणि वचनबद्धतेने नव्या भारताचा उदय निःसंशयपणे सुनिश्चित होऊ शकेल, हे सिद्ध झाले आहे आणि मन की बात ही लोकसहभागातून होणाऱ्या देशाच्या प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी एक प्रेरक शक्ती बनून राहील. त्यामुळे भारत आपल्या साध्य करण्याच्या ध्येयाच्या सतत जवळ जात राहील तसेच राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना देशवासीयांमध्ये कायमस्वरूपी रुजवली जाईल. त्यामुळे ३० एप्रिल २०२३ रोजी थेट प्रसारित होणाऱ्या या प्रेरणादायी रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग काय घेऊन येणार, हे पाहणे अतिशय औत्सुक्यपूर्ण आहे.
(लेखक भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत)