दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या गोलंदाजीसमोर जेसन रॉय वगळता कोलकाताचे फलंदाज पत्त्यांसारखे कोसळले. रॉयच्या खेळीला तळात आंद्रे रसेलने साथ दिल्यामुळे कोलकाताने निर्धारित षटकांत कशाबशा १२७ धावा जमवल्या. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्लीचा डेव्हिड वॉर्नर एकाकी झुंज देत होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दिल्लीने १२ षटकांत ८७ धावांवर ३ फलंदाज गमावले होते.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने त्यातल्या त्यात बरी सुरुवात केली. संघाची धावसंख्या ३८ असताना पृथ्वी शॉच्या रुपाने त्यांनी पहिली विकेट गमावली. वरुण चक्रवर्तीने पृथ्वीला त्रिफळाचित केले. त्यानंतर मिचेल मार्श आणि फिल सॉल्ट हे फलंदाज दुहेरी धावसंख्याही करू शकले नाहीत. त्यामुळे ६७ धावांवर ३ फलंदाज बाद अशी दिल्लीची अवस्था झाली. कर्णधार डेव्हीड वॉर्नर मात्र एका बाजूने तळ ठोकून होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वॉर्नर आणि मनीष पांडे खेळत होते.
प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची खराब सुरुवात झाली. जेसन रॉय वगळता त्यांचा एकही फलंदाज धावा जमवण्यात यशस्वी ठरला नाही. जेसन रॉयने ४३ धावा जमवल्या. तळात आंद्रे रसेलने नाबाद ३८ धावा केल्याने कोलकाताने शंभर धावांचा टप्पा ओलांडला. कोलकाताने २० षटकांत १२७ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या इशांत शर्मा, अॅनरिच नॉर्टजे, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. मुकेश कुमारने एक विकेट मिळवली. कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. त्यातून बाहेर येणे त्या संघाला जमलेच नाही. जेसन रॉय आणि रसेल वगळता कोलकाताच्या अन्य फलंदाजांनी निराश केले. पावसामुळे या सामन्याचा खेळ उशीरा सुरू झाला.