Sunday, October 26, 2025
Happy Diwali

संजय राऊतांविरोधात मुंबईत तक्रार दाखल

संजय राऊतांविरोधात मुंबईत तक्रार दाखल

मुंबई : खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसदस्यांना तडफडून मारले असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ५० श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी मरिन लाईन्स पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

संजय राऊतांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बूच बसले आहे. खारघरमध्ये ४० ते ५० मृत्यू झाले. त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही. माणसांचे जीवन पैशाने विकत घेता येत नाही. बाहेर कुठे बोलू नका असा दबाव श्रीसदस्यांवर टाकला जात आहे. मृत्यू लपवण्यासाठी सरकार घरी जाऊन खोके देऊन त्यांची तोंडे बंद करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

खारघर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एकसदस्यीय समिती स्थापन केली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.

Comments
Add Comment