Tuesday, September 16, 2025

माऊलींचे अलौकिक दृष्टांत

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
व्यासमुनी हे जणू आईप्रमाणे आहेत. आई आपल्या बाळाची सर्व प्रकारे काळजी घेते, त्याला खाऊपिऊ घालते, त्याप्रमाणे व्यासमुनींनी सामान्यजनांना म्हणजे बालकांना सांभाळले आहे. भगवद्गीतेतील ज्ञान हे पोषण करणारे जणू अन्न आहे.

श्री व्यासमुनींनी भगवद्गीता लिहून संपूर्ण मानवजातीला एक मोठा ठेवा दिला आहे. त्याविषयी बोलताना ज्ञानदेव फार सुंदर दृष्टांत / दाखला योजतात. आई मुलाला प्रेमाने जेवू घालण्यास बसली म्हणजे त्याला जसे गिळता येतील, असे लहान घास करते.

बाळकातें वोरसें । माय जैं जेवऊ बैसे। तैं तया ठाकती तैसे । घास करी ॥ ओवी क्र. १६९७ वोरसे म्हणजे प्रेमाने, ठाकती म्हणजे गिळता येतील असे.

या दृष्टांतात विलक्षण भावनिकता आहे. मायेच्या मनातील ममतेचे प्रतिबिंब या दाखल्यात आहे. व्यासमुनी हे जणू आईप्रमाणे आहेत. आई आपल्या बाळाची सर्व प्रकारे काळजी घेते, त्याला खाऊपिऊ घालते, त्याप्रमाणे व्यासमुनींनी सामान्यजनांना म्हणजे बालकांना सांभाळले आहे. भगवद्गीतेतील ज्ञान हे पोषण करणारे जणू अन्न आहे. पण बाळाचा विचार करून व्यासमुनींनी त्याचे जणू लहान घास केले. श्रीकृष्ण-अर्जुन संवादरूपाने ते सोपे करून दिले.

पुढचा दाखला हा बुद्धीशी निगडित आहे. अफाट वायू आपल्या हातात यावा म्हणून शहाण्यांनी जशी पंख्याची योजना केली.

कां अफाटा समीरणा । आपैतेंपण शाहाणा। केलें जैसें विंजणा । निर्मूनिया ॥ ओवी क्र. १६९८

समीरण हा वाऱ्यासाठी सुंदर शब्द आहे. आपैतेंपण म्हणजे स्वाधीन होण्याकरिता किंवा आपल्या हातात यावा म्हणून, तर विंजणा म्हणजे पंखा होय. अफाट वायूतत्त्व शहाण्यांनी पंख्याच्या रूपाने आपल्या आवाक्यात आणले, त्याप्रमाणे शब्दांनी जे कळावयाचे नाही ते ज्ञान अनुष्टुभ छंदात आणून व्यासांनी स्त्री, शूद्र इत्यादी सर्वांच्या बुद्धीला कळेल, असे करून ठेवले.

तैसें शब्दें जें न लभे । तें घडूनिया अनुष्टुभें। स्त्री शूद्रादि प्रतिभे । सामाविले ॥ ओवी क्र. १६९९

या दाखल्यातून काय सांगायचं आहे? तर वारा हा अफाट आहे, सर्वत्र भरून राहिलेला आहे, त्याप्रमाणे अफाट, अलौकिक असं ज्ञान श्रीकृष्ण-अर्जुन संवादात भरून राहिलेलं आहे, ते श्रीव्यासमुनींनी अनुष्टुभ नावाच्या काव्यरचनेत बांधून सर्वांसाठी खुलं केलं. त्यामुळे ते ज्ञान स्त्री, शूद्र आदी वर्गांनाही मिळालं. या दाखल्यात अजून एक मार्मिकता आहे. पंख्याच्या वाऱ्याने गार वाटतं, थंड, छान वाटतं. तापलेल्या शरीर व मनाला पंख्याचा वारा गार करतो, थंडावा देतो त्याप्रमाणे या संसारात तापलेले, थकलेले जीव आहेत, त्यांना व्यासमुनींच्या या ग्रंथाने विसावा मिळतो, आधार मिळतो.

भगवद्गीतेची थोरवी सांगणारे माऊलींचे हे दोन दाखले आपण पाहिले. आई व बाळ हा एक दाखला; त्यात भावनिकता आहे. दुसरा दाखला हा पंख्याच्या वाऱ्याचा, ज्यात बुद्धीची करामत आहे. कधी श्रोत्यांच्या हृदयाला, तर कधी त्यांच्या बुद्धीला साद घालणारे असे दृष्टांत योजणे ही ज्ञानदेवांची कवी म्हणून प्रतिभा व प्रतिमा! या अलौकिक प्रतिभा व प्रतिमेला त्रिवार वंदन!

manisharaorane196@gmail.com

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा