-
माझे कोकण : संतोष वायंगणकर
अथांग समुद्रकिनारा. या किनाऱ्यावर माड, पोफळीच्या बागा सोबत आमराई आणि असा अनेक फळ पिकविणारा हा कोकणप्रांत निसर्गाकडून उपजत काही बाबतीत कोकणाला वरदान लाभला आहे. अशातलाच एक म्हणजे कल्पवृक्ष म्हणून ज्याचा उल्लेख होतो त्या नारळाच्या झाडांच्या, माडांच्या बागा कोकणात आहेत.
पूर्वी तर कोकणाशिवाय नारळ महाराष्ट्रात कुठेच होत नाहीत, असे आपण म्हणायचो. एक खरं आहे कोकणातील नारळाला एक वेगळी ‘टेस्ट’ आहे. कोकणातील शहाळ्याचे पाणीही एक सलाईनचं काम करतं असं म्हणतात. पूर्वी कोकणातील प्रत्येक घरांच्या आजूबाजूला चार-दोन तरी माड उभे असायचे. तेव्हा मात्र एक गोष्टीची चर्चा केली जायची, ती म्हणजे नारळ फक्त कोकणातच धरतात. महाराष्ट्रातील अन्य भागात नारळ होत नाहीत. झाले तरीही नारळ धरत नाहीत असं म्हटलं जायचे; परंतु आता मात्र वस्तुस्थिती फार वेगळी आहे.
कोकणापेक्षाही अधिक नारळ अन्य भागातही धरताना दिसतात. दोन नारळाची झाडं माड घराशेजारी, शेतात असतील तर पाच माणसांचं एक कुटुंब आरामात उदरनिर्वाह करू शकतं असं म्हटलं जायचे ही वस्तुस्थिती आहे. जसे नारळाचे खोबरे जेवण-खाण्यामध्ये वापरतात. तसेच त्याच्या करवंटी, त्याची सोडणं या सगळ्यांचा उपयोग होतो. त्याचे पैसेही येतात. कोकणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नारळाची झाडं असतानाही शहाळी मात्र कर्नाटक राज्यातून येतात. याचे कारण कोकणातील नारळ बागायतदार शहाळी काढू देत नाहीत. नारळ बागायतदारांमध्येही कोणतीही व्यावसायिकता दिसत नाही. जेवण-खाण्यापुरते नारळ मिळतात. यातच कोकणातील बागायतदार शेतकरी समाधान मानतो. पाहुणे आले की, हक्काने आपल्या माडावरची शहाळी उतरवून देण्यात तो आनंद मानतो. अलीकडे कोकणातही शहाळी विक्रीचे स्टॉल दिसू लागले आहेत; परंतु या स्टॉलवर विक्रीला असणारी शहाळी कर्नाटकातून येतात. एक तर नारळ लावतानाही बागायतदार दूरदृष्टीने व्यावसायिक विचार करून नारळ लावत नाही. लवकर पीक येणारे नारळ लावले जातात.
काही नारळ शहाळ्याच्याही योग्य नसतात. त्याचं खोबरही जेवणात वापरता येणारे नसते. मात्र, तरीही कोकणात जी व्यावसायिकता आंबा, काजूमध्ये आहे ती नारळ, सुपारी, कोकममध्ये नाही. त्याचं अर्थशास्त्र कोकणातील शेतकरी कधीच मांडत नाही. त्यातून पैसे अधिक कसे मिळवता येतील यासाठीची अस्वस्थता त्याच्यामध्ये नसते. त्यामुळेच शेतकरी पारंपरिक माड उभे करण्याचा प्रयत्न करतो. या नारळ बागेमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन काही करता येऊ शकते. आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांनी नारळाच्या माध्यमातून काथ्या उद्योगात प्रचंड प्रगती केली आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून ‘नारळपाणी’चं खास आकर्षण केलं आहे. खरंतर केरळ आणि आपलं कोकण यात अनेक बाबतीत साम्य आहे; परंतु इथल्या निसर्ग संपत्तीचं मार्केटिंग कोकणवासीयांना कधीच जमलं नाही. हे जमण्यासाठी तसा सार्वत्रिक विचार रुजावा लागतो. नारळाचा विषय आला की, कोकणवासीय अभिमानाने नारळांची महती सांगतात. त्याचं समाधानही आहे; परंतु या नारळ बागायतदार शेतकऱ्याला म्हणावा तसा फायदा मिळत नाही. पुन्हा इथे वन्यप्राणी माकडांचा जो त्रास आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी हैराणच आहे. माडांवर दिसणारे नारळ तयार होऊन शेतकऱ्याला मिळतील तो त्याचा आनंदाचा दिवस. याचे कारण कोकणात माकडांचा त्रास फारच वाढला आहे.
जंगलांमध्ये दिसणारी माकडं अलीकडे भरवस्तीत दिसत आहेत. अनेक ठिकाणी कोणत्याही झाडावरची फळं तर ठेवतच नाहीत. त्याचबरोबर घरातील वस्तूही गायब करतात. या मर्कटलीला पूर्वी गंमतीने घेतल्या जायच्या; परंतु आता मात्र या मर्कटलीला लीला न राहाता त्याचा फार मोठा त्रास शेतकऱ्याला होऊ लागला आहे. घराशेजारच्या माडावरचे नारळ कोवळे असतानाच माकड तोडून टाकतात. यातूनही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते; परंतु कोणकोणाला काय सांगणार, शेतकऱ्याचे हे नुकसानीचे दु:ख स्वत:शीच वाटून घेतो. त्यावर फार चर्चा न करता ‘माकडांनी हैराण केल्यानी झाडावर खायचा फळ येव सारख्या नाय, काय वाट लावल्यानीच’ अशा गजालींमध्ये कोकणवासीय रमतात. बाकी काम करणार फटाके, अॅटमबॉम्ब आदी सर्व गोष्टींना माकड आता सरावली आहेत. त्यांना कुठल्याच गोष्टीची आता भीती वाटत नाही. म्हणूनच भरवस्तीत ही माकडं वाट्टेल त्या पद्धतीने धुडगूस घालत आहेत. कोकणातील या कल्पवृक्षावर माकडांच्या टोळधाडीने कोकणातील बागायतदार शेतकरी हैराण आहे. मात्र, यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी नारळ बागायतीत अधिक स्वारस्य घेऊन काम करावे असे सांगणेही अवघड झाले आहे; परंतु कोकणातील शेतकऱ्यांनीही शहाळ्यांचे मार्केट काबिज केलं पाहिजे.