-
गजानन महाराज: प्रवीण पांडे, अकोला
श्री गजानन विजय ग्रंथांमधून गजानन महाराज चरित्राचे वाचन करीत असताना अनेक चमत्कार आढळून येतात. पण त्यात कोठेही श्री महाराजांचे स्तोम किंवा अवडंबर कुठेच आढळून येत नाही. त्यासोबतच संतकवी दासगणू महाराज यांची रसाळ वाणी आणि सुंदर काव्य प्रतिभा पाहून मनाला एक वेगळेच समाधान व तृप्ती लाभते. प्रत्येक अध्यायाच्या आरंभी आणि समापन करताना दासगणू महाराजांनी केलेली विविध दैवतांची आळवणी तसेच या ग्रंथाच्या पठणाचे फलित काय हे देखील सांगितले आहे. भक्ताचे किंवा पतिताचे महत्त्व साक्षात श्री विठ्ठलास सांगताना दासगणू महाराज रोखठोकपणे विठ्ठलाला म्हणतात :
श्री गणेशाय नमः।
हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा।
हे चंद्रभागा तट विहारा।
श्री संत वरदा शारंगधरा।
पतीत पावना दयानिधे।।१।।
लहानांवाचून मोठ्यांचा।
मोठेपणा न टिके साचा।
पतिताविण परमेश्वराचा।
बोलबाला होणे नसे।।२।।
आम्ही आहोत पतीत।
म्हणून तुला म्हणतात।
पावनकर्ता रुक्मिणीकांत।
हे आता विसरू नको।।३।।
परिस लोहाला सोने करी।
म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी।
ओहोळ पोटी घे गोदावरी।
म्हणून म्हणती तीर्थ तिला।
याचा विचार करावा।
चित्ती आपुल्या माधवा।
दासगणुला हात द्यावा।
बुडू न द्यावे कोठेही।।५।।
बघा किती सुंदर ओव्या आहेत. सुरुवातीला रोखठोक भाषेत भक्ताचे महत्व, आणि पुढे ‘भक्ताला या भव सगरात कुठेही बुडू देऊ नका’ अशी विनम्रतेने केलेली भाव विभोर करणारी आळवणी. वा हे परमेश्वरास अधिकार वाणीने सांगणारा भक्त देखील तितकाच अधिकारी असावा लागतो.
एकदा गोविंद बुवा टाकळीकर नावाचे त्या काळातील प्रख्यात कीर्तनकार शेगावास कीर्तन करण्याकरिता आले. (हे आकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील रहिवासी असल्यामुळे टाकळीकर. त्यांचे मूळ आडनाव अग्निहोत्री आहे. आजही त्यांचे वंशज बार्शी टाकळी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे एक पणतू तर कीर्तनकार आहेत.) त्यावेळी कीर्तनकार मंडळी लहान बैलगाडी (दमनी) किंवा घोडा अशा साधनाचा वापर प्रवासाकरिता करीत असत, तर हे गोविंद बुवा येऊन शेगाव येथील शिव मंदिरात उतरले. या मंदिराचा जीर्णोद्धार शेगाव येथील श्री मोटे सावकार यांनी केला असल्यामुळे त्या मंदिराला मोटे यांचे मंदिर अशी ओळख आहे. (हे शिव मंदिर आता छान सुशोभित केलेले आहे आणि श्री गजानन महाराज मंदिराच्या मागील भागात आहे. त्या मंदिराचे बाजूलाच श्री गजानन महाराज शेगावात ज्या ठिकाणी प्रकट झाले ते स्थान देखील आहे.)
तर गोविंद बुवा टाकळीकर या शिव मंदिरामध्ये उतरले आणि त्यांनि त्यांचा घोडा मंदिरासमोर बांधला. हा घोडा अतिशय द्वाड होता. तो कोणीही जवळ आल्यास त्यास लाथा मारीत असे, किंवा चावत असे, खिंकाळत असे, अशा अनेक वाईट सवयी त्या घोड्यास होत्या. नेमके या वेळेस त्या घोड्याला बांधण्याकरिता केलेल्या साखळ्या आणावयास गोविंद बुवा विसरून गेले. त्यामुळे उपलब्ध झालेल्या दोराने (चऱ्हाटाने) गोविंद बुवांनी घोडा कसाबसा बांधला आणि गोविंद बुवा निजण्यास गेले. मध्य रात्रीच्या समयाला श्री गजानन महाराज त्या ठिकाणी सहजगतीने फिरत आले आणि त्या द्वाड घोड्याच्या चारी पायामधील जागेत निजले. मुखाने ‘गण गण गणात बोते’ हे भजन सुरूच होते. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ह्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या ‘गण गण गणात बोते’ ह्या दिव्य महा मंत्राची उकल श्री दासगणू महाराजांनी सांगितली आहे.
(अध्याय क्रमांक ९, ओवी क्रमांक २४ पासून तर ओवी क्रमांक २९ , भक्त मंडळींनी अवलोकन करावे.)
ती उकल दासगणू महाराज पुढीलप्रमाणे सांगतात :
मुखे भजन चालले होते।
‘गणी गण गणांत बोते’।
या सांकेतिक भजनाते। जाणण्या कोण समर्थ हो?।।२४।।
त्या सूत्ररूप भजनाचा।
अर्थ ऐसा वाटतो साचा।
गणी या शब्दाचा।
अर्थ मोजी हाच असे।। २५।।
जीवात्मा म्हणजे गण।
तो ब्रह्माहून नाही भिन्न।
हे सुचवावया कारण।
गणांत हा शब्द असे।।२६।।
बोते हा शब्द देखा।
अपभ्रंश वाटे निका।
बाते हा शब्द ऐका।
तेथे असावा निःसंशय।।२७।।
बाया शब्दे करून।
घेतले पाहिजे मन।
ते हें आहे सर्वनाम।
शब्दा ऐवजी आलेले ।।२८।।
म्हणजे मना समजे नित्य।
जीव हा ब्रह्मास सत्य।
मानू नको तयाप्रत।
निराळा त्या तोची असे।।२९।।
इथे दासगणू महाराज असे देखील म्हणतात की, या महामंत्राचा अर्थ जाणण्यास कोणी समर्थ नाही. आणि पुढे लगेच त्याचा अर्थ सोपा करून सर्व-सामान्यांना कळेल अशा पद्धतीने सांगतात देखील. पण हे सांगत असताना, ‘या भजनाचा अर्थ असा वाटतो की…’ असे देखील विनम्र भावाने म्हणावयास दासगणू महाराज विसरत नाहीत. अधिकारी पुरुषांकडून हेच तर शिकण्यासारखे आहे. या महामंत्राबद्दल दोन मते आढळून येतात :
१. ‘गिण गिण गिणांत बोते’
२. ‘गणी गण गणांत बोते’
या मत भिन्नतेबद्दल बोलताना दासगणू महाराज सांगतात :
त्यासी न आपुले प्रयोजन।
आपणा कथेसी कारण।
ज्या वेळी गजानन महाराज त्या घोड्याच्या चहू पायांमध्ये जाऊन निजले, त्यावेळी त्यांच्या मुखाने भजन सुरूच होते. दासगणू महाराज याबद्दल ओवी लिहिताना एक सुंदर कल्पना सांगतात :
वरील भजन मुखाने।
चालले होते आनंदाने।
वाटे या भजनरूप साखळीने।
घोडा बंधूंनी टाकीला।। ३२।।
गोविंद बुवांना घोड्याबद्दल जबर धास्ती वाटत होती म्हणून ते मधूनमधून उठून घोड्याला पाहावयास आले असता त्यांना घोडा बांधलेल्या ठिकाणी शांत उभा असलेला दृष्टीस पडला. त्यांनी विचार केला की, हा घोडा इतका शांत कसा? किंवा काही आजाराने ग्रस्त झाला हा? कारण हा इतका शांत कधीच उभा राहत नाही. ते घोड्याजवळ पाहण्यास आले असता त्यांना घोड्याच्या पायांमध्ये एक माणूस आहे, असे दिसून आले. अजून थोडे जवळ आले असताना त्या घोड्याच्या पायांमध्ये श्री समर्थ निजलेले दिसले. आता गोविंद बुवांना घोडा का शांत आहे याचे कारण कळून आले.
गोविंद बुवांनी समर्थांच्या चरणावर डोके ठेवले आणि त्यांचे अष्टभाव दाटून आले. गोविंद बुवा महाराजांचे स्तवन करू लागले. त्यानंतर गोविंद बुवांनी महाराजांना त्या द्वाड घोड्याचे गुण सांगितले. ते ऐकून महाराजांनी तो द्वाड घोडा शांत केला. महाराज घोड्याला बोलले :
घोड्यास म्हणाले आता गड्या।
करू नकोस येथून खोड्या।
त्या येथेंच रोकड्या।
द्याव्या अवघ्या सोडून।।४९।।
तू शिवाच्या समोरी।
याचा विचार काही करी।
वागत जावे बैलापरी।
त्रास न देई कवणाते।। ५०।।
ऐसे त्यासी बोलून।
निघून गेले दयाघन।
कृपा कटाक्षे करून।
पशू ही ज्याने आकळीला।।५१।।
दुसरे दिवशी श्री महाराज मळ्यात असताना गोविंद बुवा घोड्यावर बसून महाराजांच्या दर्शनास्तव आले. शेगाव येथील लोकांना गोविंद बुवांच्या घोड्याची महती चांगलीच माहिती होती. त्यामुळे लोक त्यास भीत होते. ते गोविंदबुवांना म्हणाले :
‘गोविंद बुवा, ही पीडा इथे का बरे घेऊन आलात. मळ्यात बायका, लहान मुले वावरत आहेत. तुमचा घोडा काही घात करू शकतो.’ त्यावर गोविंद बुवा त्यांना म्हणाले :
‘तुमचे म्हणणे मी ऐकले. काल माझ्या घोड्याला श्री समर्थांनी शहानं केले. त्याने खोड्या करणे सोडून दिले आहे. तो आता गोगली गायी प्रमाणे शांत झाला आहे. त्या मळ्यात हिरवा भाजीपाला असताना देखील त्या घोड्याने कशासही तोंड लावले नाही. शेगावात नित्य भक्त मंडळी दर्शनाकरिता येत असत. त्यामुळे तिथे नित्य यात्रा सुरू असल्या प्रमाणे गर्दी होत असे. एके दिवशी बाळापूर येथील दोन गृहस्थ मनात क्षिभेतू ठेवून महाराजांच्या दर्शनास आले. दर्शनास जाताना ते एकमेका>स बोलले की पुढील वारीस येताना महाराजांना देण्यास गांजा आणू. पुढील वारीस येताना दोघेही गांजा आणावयास विसरले. आता त्यांनी पुन्हा मनोदय केला की, आता विसरलो ते ठीक. पुढच्या वेळी दुप्पट गांजा आणू. पण पुन्हा तेच झाले. गांजा आणायला विसरले. हात जोडून बसले. पण गांजाची स्मृती राहिली नाही. हे पाहून महाराज भास्कराला म्हणाले :
तै स्वामी म्हणाले भास्करासी। पाहा जगाची रीत कैसी।
मारून गांठ धोतरासी।
विसरती जिन्नस आणावया।।७१।।
हे ऐकून ते दोघेही विस्मयचकित झाले. की, महाराजांनी आपले मनातील हेतू कसा ओळखला. यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे आहे. चला आता गावातून गांजा आणू. असा विचार करून गावात जाऊ लागले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की, आता गावात जाऊन गांजा आणू नका.
तुमचा हेतू पूर्ण झाल्यावरच गांजा आणा. तुमचे काम पुढील आठवड्यात होईल. येथील पाच वाऱ्या करा. कारण इथे हा मृडानिपती कर्पूरगौर स्थित आहे. त्याला नमस्कार करा. परमार्थात मानवाने कदापि खोटे बोलू नये. पुढील आठवड्यात त्यांचे काम झाले. ते गांजा घेऊन वारी करण्याकरिता आले. दर्शन घेऊन पुन्हवते बलापुरास निघून गेले.
(क्रमशः)