Monday, March 17, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखउष्माघात टाळा, स्वस्थ राहा!

उष्माघात टाळा, स्वस्थ राहा!

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. सूर्य जोरात तापू लागला आहे. त्यामुळे उष्णता वाढत आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पीत राहणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे आणि हा उपाय आपणच करू शकत असल्यामुळे उष्माघात टाळणे आपल्याच हातात आहे. शक्यतो या दिवसांमध्ये आवश्यक असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे. मात्र त्यासाठी गॉगल, छत्री, टोपी अथवा दुपट्टा आपल्याजवळ असला पाहिजे, तरच डोक्यावर पडणारी तीव्र स्वरूपाची सूर्य किरणे रोखता येतील. मात्र अनेकजण या उपायाकडे दुर्लक्ष करतात, मग नको त्या घटना घडून जातात. खारघर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात नाहक १०-१२ जणांचा बळी गेला. यापासून आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे.

दररोज सूर्य उगवणे, त्याचे तापणे ही नित्यनेमाची नैसर्गिक क्रिया आहे. ती कुणी थांबवू शकत नाही. त्यामुळे सूर्य आपले काम करीत असतो आणि इतरांनाही कामाला लावतो. म्हणजे उन्हामुळे आजारी पडणे. म्हणून या दिवसांत उष्माघात टाळा आणि स्वस्थ राहा हाच संदेश सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात विशेषकरून विदर्भात राज्याच्या इतर भागापेक्षा अधिक तापमान असते. खासकरून नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत उन्हाची तीव्रता जास्त जाणवते. त्याचे भौगोलिक कारण सांगितले जाते की, या पट्ट्यातून कर्कवृत्त गेल्याचे. कर्क रास सर्वांना माहिती आहे. कर्क म्हणजे कॅन्सर. कॅन्सर किती जीवघेणा आहे, हे वेगळे सांगायला नको. कॅन्सरचे नाव जरी आपण काढले तरी भीती वाटते. तसे हे कर्कवृत्त असावे, अशी कल्पना येते. सध्या विदर्भाच्या काही भागांत एप्रिलच्या मध्यावरच तीव्र स्वरूपाचे ऊन जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात ४४ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. वाशिम, अमरावती या जिल्ह्यांत त्या खालोखाल तापमान होते. एप्रिल आणि मे हे दोन महिने कडक उन्हाचे समजले जातात. या दोन महिन्यांच्या काळात प्रत्येकाने उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. मला काय होते? असे आई – वडील अथवा मोठ्यांनी सांगितल्यावर मुले तसे म्हणतात. पण त्यांचा सल्ला योग्य असतो. नेमके अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मुंबईतही उन्हाची तीव्रता सध्या जाणवत आहे. ३७ अंशांचा टप्पा उन्हाने ओलांडला असल्यामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईत नेहमीच दमट तापमान असते. त्यामुळे सतत शरीरातून घाम निघत असतो. उन्हामुळे तर सध्या सर्वचजण त्रस्त आहेत. सूर्य देव कोपला, आग ओतू लागला, जीवाची लाही लाही करू लागला असेही आपण म्हणतोच. उष्माघात कसा होतो, मृत्यू होण्यासाठी उष्माघात कसा जबाबदार ठरू शकतो, यावर उपाययोजना काय करावी या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. उष्माघाताचा त्रास साधारणपणे दोन प्रकारचा असतो. बाहेरील तापमान वाढल्याने परिश्रम नसलेला, यामुळे उष्माघात होतो. तर बाहेरील तापमान फार वाढलेले नसते; परंतु शरीरातील तापमान वाढल्याने परिश्रमात्मक उष्माघाताचा त्रास होतो. बाहेरील तापमान वाढल्यावर शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीरात असलेली कुलिंग यंत्रणा कार्यान्वित होते. ही यंत्रणा शरीरातील घाम बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. यावेळी शरीराला पाण्याची आवश्यकता भासत असते. मात्र हे पाणी न मिळाल्यास शरीरातील घाम बाहेर टाकण्याची प्रक्रिया थांबते आणि शरीरातील तापमान ४० अंश होते. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी ही यंत्रणा ठप्प होते. परिणामी श्वसनाचा त्रास सुरू होतो, रक्तदाब कमी होतो, उलटी व चक्कर येण्यास सुरुवात होते. व्यक्तीला अस्वस्थ किंवा चक्कर येऊन तो खाली पडतो. तसेच शरीरातील मेंदू, मूत्रपिंड, हृदय असे अवयव बाधित होण्यास सुरुवात होते, तर परिश्रमात्मक उष्माघातामध्ये व्यक्ती दूरचा प्रवास करीत असल्यास किंवा व्यायाम करीत असेल, तर उष्माघाताचा त्रास होतो, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भारत जागीयासी हे देतात.

सगळेजण या ना त्या कारणाने उन्हात फिरत असतात. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे मृत्यू होतो. आपल्या शरीराचे तापमान ३७ अंश से. असते. या तापमानातच शरीरातील सर्व अवयव नीट काम करतात. घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश से. तापमान कायम राखण्यात येते. सतत घाम निघत असताना पाणी पीत राहणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी शरीरात इतरही महत्त्वाची कामे करत असते. त्यामुळे पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकण्याचे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंशांचा पुढे जाते आणि शरीराची कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीरात तापमान ३७ अंशांच्या पुढे जाऊ लागते. शरीराचे तापमान जेव्हा ४२ अंश डिग्री सेल्सअसपर्यंत पोहोचते तेव्हा त्या वक्तीला रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, उलट्या होणे, निर्जलीकरण होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच व्यक्तीचे अवयव हळूहळू बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढवतो, याकडे

जे. जे. रुग्णालयातील डॉ. मधुकर गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे. एकूणच उष्माघात जीवघेणा कसा ठरतो, यांची कल्पना येऊ शकते. म्हणून उष्माघात येऊच नये अथवा होऊच नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असून काही त्यासाठी असलेल्या उपाययोजनांचाही अवलंब केला पाहिजे. जसे भरपूर पाणी प्या, सैल आणि सुती कपडे वापरा, गाॅगलचा वापर करा, डोक्यावर टोपी अथवा दुपट्टा वापरा, उन्हात जाणे टाळा, कष्टाची कामे उन्हात करू नका, शिळे आणि खूप प्रथिनयुक्त अन्नपदार्थ खाऊ नका आदी उपायांचा अवलंब केला, तर उष्माघातापासून निश्चितच जपता येईल आणि आपण स्वस्थ जीवनही जगू शकू, हे ध्यानात घेतले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शहरातील महानगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायत, स्थानिक रुग्णालये आणि वैयक्तिक स्वरूपात आपले डाॅक्टरही काळजी घेण्याचे आवाहन करीत असतात ते उगाच नव्हे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -