पुणे: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातले घमसान असो की गौतमी पाटीलच्या नृत्य कार्यक्रमांत होणारे गोंधळ. या दोघींवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न वेळोवेळी विचारला जातो. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी याचे उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलते. यासंदर्भात कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही. त्यामुळे उर्फी जावेद आणि गौतमी पाटील या दोघी तुमच्या दृष्टीकोनातून अश्लील वाटत असल्या तरी दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील असू शकतात. म्हणून आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही.
रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, गौतमी पाटील करतेय ते नृत्य नाही, पण या प्रकरणात राज्य महिला आयोगाला ज्या तक्रारी येतात, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य महिला आयोग संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवतात. पण राज्यघटनेने तुम्हाला, मला जो व्यक्तिस्वातंत्र्याचा, भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणी काय घालावे, कोणी काय बोलावे, कोणी काय खावे, हे कोण कुणाला सांगू शकत नाही.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, याप्रकरणी आपण त्यांना समज देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था पाहता त्यासाठीचे काही परिमाण ठरले आहेत, त्यापलीकडे जाऊन आपण कोणतीही कारवाई करू शकत नाही.