-
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत असली तरी जनता दल सेक्युलर हा तिसरा खेळाडू आहे. या पक्षाकडेही पारंपरिक ताकद आहे. देवेगौडा पिता-पुत्रांचा पक्ष अशी या संघटनेची प्रतिमा आहे. या वर्षी निवडणूक प्रचाराला सुरुवात होताच अचानक गुजरातच्या अमूल दुधाने बंगळूरुमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आणि कन्नड अस्मिता उफाळून आली. गुजरातच्या अमूल दुधाचे बंगळूरुमध्ये काय काम असा प्रश्न भाजप विरोधकांनी विचारायला सुरुवात केली. कर्नाटच्या नंदिनी दुधावर आक्रमण करण्यासाठी अमूल येत आहे, असे या निवडणूक प्रचाराला वळण मिळाले. कर्नाटकात अमूल दुधाचा प्रवेश व्हावा म्हणून भाजप उत्सुक आहे, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला.
नंदिनी दूध ही कर्नाटकची एक विशेष ओळख आहे. कर्नाटकमधील गावागावात नंदिनी व अमूल हे दोन्ही ब्रँड प्राथमिक दुग्ध शाळा सुरू करण्याच्या दिशेने काम करतील व येत्या तीन वर्षांत सर्व गावांत दूग्ध शाळा असतील, असा प्रचार गेल्या तीन महिन्यांपासूनच सुरू झालाय. याच महिन्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अमूलने ट्वीट करून कर्नाटकाची राजधानी बंगळूरुमध्ये लवकरच प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घोषणेने अमूलचे नंदिनीवर आक्रमण होणार म्हणून काँग्रेसने प्रचाराला सुरुवात केली आणि तिथेच अमूल विरुद्ध नंदिनी अशा राजकीय संघर्षाला तोंड फुटले.
अमूलचे आईस्क्रिम व अन्य उत्पादने कर्नाटकमध्ये अगोदरपासून विक्रीला उपलब्ध आहेत. पण अमूल आपले दूध बंगळूरुमध्ये लवकरच विक्रीला आणणार या घोषणेने काँग्रेसला निवडणूक प्रचाराला मोठा मु्द्दाच मिळाला. अमूलने प्रवेशाची घोषणा करताच सेव्ह नंदिनी, गो बॅक अमूल अशी मोहीम सोशल मीडियावरून सुरू झाली. नंदिनी हा सहकार क्षेत्रातील मोठा ब्रँड आहे व अमूलच्या प्रवेशाने त्याला धक्का लागू शकतो अशी भीती अशा मोहिमेतून दाखवली जात आहे. बंगळूरुच्या हॉटेल्स असोसिएशनने आम्ही केवळ नंदिनी दुधाचा वापर करणार, असे जाहीर करून टाकले. हाच मुद्दा घेऊन काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या जनतेत उतरले आहेत. कर्नाटकमधील सर्वात मोठा दुधाचा ब्रँड नंदिनी संपुष्टात आणण्याचा मोठा डाव रचला गेला आहे व त्यासाठीच अमूलचा प्रवेश होत आहे, असा प्रचार काँग्रेसने चालवला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही नंदिनी विरुद्ध अमूल या युद्धात उडी घेतली आहे. ते म्हणतात, ‘आमची जमीन, पाणी आणि दूध’ ही शक्ती आहे. आमच्याजवळ नंदिनी आहे. अमूल जरी चांगला ब्रँड असला तरी त्याची आम्हाला गरज नाही.
जनता दल सेक्युलरचे नेता व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे, ‘मागल्या दरवाजाने अमूल कर्नाटकात येऊ पाहत आहे. अमूल आणून कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ)चा गळा आवळण्याचे कारस्थान आहे’.
काँग्रेस व जनता दल सेक्युलरने अमूलवर हल्ला चढवताना भाजपला टार्गेट केले आहे. पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या हल्ल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. बोम्मई म्हणतात, ‘अमूलवरून काँग्रेस राजकारण खेळत आहे. नंदिनी केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशात लोकप्रिय ब्रँड आहे. नंदिनी ब्रँडला केवळ एका राज्यापुरते सीमित करणे योग्य नाही. नंदिनी दुधाचे उत्पादन वाढलेले नाही, तर शेतकऱ्यांची कमाईसुद्धा वाढली आहे. म्हणूनच केवळ अमूलवर विरोधी पक्षाकडून होणारे आरोप चुकीचे आहेत’.
राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी म्हटले आहे, काँग्रेस आज निवडणूक प्रचारात भले दुधाचे राजकारण करीत आहे. पण सत्तेवर असताना या पक्षाने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना नंदिनीशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांना एक लिटर दुधावर मिळणारे अर्थसहाय्य एक रुपयावरून दोन रुपये केले होते. आता तर भाजप सरकारने त्यात पाच रुपये वाढ केली आहे.
अमूल दूध उत्पादन करणाऱ्या आनंद मिल्क युनियनची स्थापना १९४६ मध्ये झाली. आज देशातील २८ राज्यांत अमूल दुधाची व अमूल दूध उत्पादनांची विक्री होत आहे. गुजरात, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगणा या राज्यांत अमूलची विक्री होते. सन २०२१-२२ या वर्षांची या कंपनीची आर्थिक उलाढाल ६१ हजार कोटी रुपये होती. अमूलला दूध पुरविणाऱ्या १८ लाख ६० हजार दूध सोसायट्या ग्रामीण भागात आहेत. अमूलकडे रोज २ कोटी ८३ लाख लिटर दूध संकलन होते.
नंदिनी दूध उत्पादन करणाऱ्या कर्नाटक मिल्क फेडरेशनची स्थापना १९७४ मध्ये झाली. सहकार क्षेत्रात दूध संकलनाचे काम करणाऱ्या नंदिनी दुधाची विक्री देशात ७ राज्यांत होते. कर्नाटकबरोबरच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गोवा व महाराष्ट्रातही नंदिनी ब्रँडची विक्री होते. सन २०२२ मध्ये नंदिनीची आर्थिक उलाढाल १९ हजार कोटी रुपये होती. नंदिनीला दूध पुरविणाऱ्या १२ लाख ३३ हजार दूध सोसायट्या ग्रामीण भागात आहेत. नंदिनीचे दूध संकलन रोजचे ८४ लाख लिटर आहे.
कर्नाटक मिल्क फेडरेशनशी २६ लाख दूध उत्पादक शेतकरी संलग्न आहेत. ही मोठी आर्थिक व राजकीय व्होट बँक आहे. या व्होट बँकेवर आपले वर्चस्व असावे यासाठी राजकीय पक्ष सतर्क असतात. ग्रामीण भागात व छोट्या गावांमध्ये दूध सोसायट्यांचा दबदबा असतो. दूध उत्पादक शेतकरी व त्याचा परिवार यांचा विचार केला तर ही व्होट बँक मोठी असते. म्हणूनच अमूलचा प्रवेश झाल्यावर नंदिनी ब्रँड कमकुवत झाला तर त्याचा लाभ भाजपला मिळेल, अशी भीती काँग्रेस व जनता दल सेक्युलर पक्षांना वाटते आहे.
नंदिनी व अमूल हे एकमेकांच्या विरोधात नाहीत तर दोन्ही ब्रँड एकत्रपणे शेतकऱ्यांचे भले करतील असे भाजप सारखे ठसवत आहे. काँग्रेसप्रमाणे भाजप नंदिनीला विरोध करीत नाही. भाजपची साधारणत: शहरी भागात पकड आहे. दूध संघांवर ताबा मिळाला, तर ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार वेगाने करणे शक्य होईल, असे भाजपचे गणित आहे. देशभरात २ लाख दूध सोसायट्या सहकार क्षेत्रात आहेत. शिवाय साडेतीनशे सहकारी साखर कारखाने आहेत. गुजरात व महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात भाजपने बऱ्यापैकी यश संपादन केले आहे. गुजरातप्रमाणे कर्नाटकातही सहकार क्षेत्रात शिरकाव करून ग्रामीण भागावर वर्चस्व मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कर्नाटकात म्हैसूर, रामनगर, कोलार, मांड्या अशा भागांत सहकारी संस्थांचे जाळे आहे. या प्रदेशात लिंगायत व वोकलिंग्गा समाजाची लोकसंख्या प्रभावी आहे. लिंगायत मतदार भाजपकडे, तर वोकलिंग्गा मतदार काँग्रेस व जनता दल सेक्युलरकडे झुकतो असे आजवरचे गणित आहे. अमूल-नंदिनी संघर्षात भाजप वोकलिंग्गा मतदारांना आपल्याकडे खेचेल अशी भीती काँग्रेसला वाटते. कर्नाटकातील १६ जिल्ह्यांत शेतकऱ्यांची बांधिलकी नंदिनी ब्रँडकडे आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व त्यांच्या परिवाराने नंदिनी ब्रँडवर आपले वर्चस्व राहील याची वर्षानुवर्षे काळजी घेतली. डी. व्ही. सदानंद गौडा यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न केले, पण त्याचा पराभव झाला. कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यावर त्यांना पक्षाने मुख्यमंत्रीपद दिले. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत सहकार क्षेत्र ही राजकीय पक्षांची मोठी व्होट बँक आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळूरुवर अमूलचे लक्ष आहे. बंगळूरुमध्ये रोज ३५ लाख लिटर दुधाची गरज असते. त्यातील ७० टक्के दूध नंदिनी पुरवते. अमूलच्या दुधाची विक्री हुबळी – धारवाडमध्ये होत आहेच. तेथे रोज दहा हजार लिटर अमूल जाते. अमूलची किंमत ५४ रुपये, तर नंदिनीची किंमत लिटरला ३९ रुपये आहे. कर्नाटकमध्ये नंदिनीसह दुधाचे वेगवेगळे १८ ब्रँड विकले जात आहेत. पण अमूल येणार या धास्तीने कन्नड अस्मितेला जागे करण्यासाठी काँग्रेसने नंदिनी विरुद्ध अमूल अशी खेळी चालवली आहे. महाराष्ट्राचे महानंद दूध स्पर्धेत कुठे आहे?