Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, आढावा बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, आढावा बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन

वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे राज्यात २५ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कार्यरत

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचना

मुंबई : देशासह महाराष्ट्रातही कोविडची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाचे २५ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कार्यरत करण्यात आले असून हे रुग्णालय प्रामुख्याने गंभीर रुग्णांना उपचार देण्याकरिता कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी संवाद साधला. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. आश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून आपण सर्वांनी मास्क लावावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्वांनी मास्क लावून काम करावे अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्या.

श्री. महाजन म्हणाले की,आजच्या स्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 5 हजारांहून अधिक कोविड खाटा आहेत. तर २ हजारांहून अधिक व्हेंटिलेटर व रुग्णांना आवश्यकता पडल्यास लागणारे ऑक्सिजन करिता ६२ LMO Tanks, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे. त्याच प्रकारे २ हजार जम्बो आणि ६ हजार लहान सिलेंडर तयार आहेत.
आज प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी सुविधा उपलब्ध असून एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालय ३० हजारांहून अधिक कोविड चाचण्या करू शकतात. नुकतेच दिनांक १० व ११ एप्रिल रोजी प्रत्येक महाविद्यालयात भारत सरकार च्या मार्गदर्शन सूचनेनुसार कोविड मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.

कोविड प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरीता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. मास्कमुळे कोविडची लागण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अधिष्ठाता यांनी आपल्या महाविद्यालयात आणि रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांना मास्क लावून काम करण्यास सांगावे. याशिवाय ज्येष्ठ व्यक्ती यांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुगणालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावी अशा सूचनाही श्री. महाजन यांनी दिल्या.

या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -