मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. स्वत: अजित पवार यांनी काल या चर्चांना पूर्णविराम दिला असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटने पुन्हा नव्या चर्चांना ऊत आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मिशन नो पेन्डसी’ म्हणत दोन फोटोंसह एक ट्विट केला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे कार्यालयीन काम करताना दिसत असून फोटोला ‘Office work. Clearing pendencies..’, असे कॅप्शनही फडणवीसांनी दिले आहे. राज्यात एकीकडे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dev_Fadnavis: Mission #NoPendency !
Office work. Clearing pendencies..
कार्यालयीन कामकाज.. #worklife #govt #files #sign #Mumbai #AapleSarkar #sarkar #people #Maharashtra #sevak pic.twitter.com/XRFWVafinJ— Devendra Fadnavis Fan (@Dev_Fadanvis) April 18, 2023
कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोबत मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग त्यांनी दिला आहे. या ट्विटमधील फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिगारा दिसत आहे. त्यातील काही फायलींवर देवेंद्र फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचे ट्विट केल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवार यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी अशा ट्विटमुळे त्यावर पुन्हा चर्चा होताना दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर सुप्रीम कोर्टाकडून अपात्रतेची टांगती तलवार आहे. अशात सरकार अल्पमतात आलेच तर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपची संभाव्य रणनीती आहे, अशी चर्चा अजूनही कायम आहे. राजकीय तज्ज्ञदेखील अजूनही अजितदादा व भाजपची हातमिळवणी होण्याच्या शक्यतेचे दावे करत आहेत.
अशातच देवेंद्र फडणवीसांनी ‘मिशन नो पेन्डसी’ म्हणत फोटो ट्विट केल्याने फडणवीसांनी कामाची आवराआवर का सुरू केली?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात जाणार, अशी शक्यता भाजपलाही वाटत आहे का? त्यामुळेच पुढील रणनितीबाबत देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक ट्विट तर केले नाही ना?, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
मंगळवारी अजित पवारांबाबतच्या चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस मात्र शांतच होते. अजित पवारांच्या गोटात होत असलेल्या सर्व घडामोडींवर ते बारीक लक्ष ठेवून होते. मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. अजित पवारांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचे खंडण केल्यानंतर या चर्चा आता थंड झाल्या होत्या. मात्र, तोच देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक ट्विट करुन राजकीय चर्चांना पुन्हा हवा दिली आहे.