मुंबई: काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताने बळी गेल्यानंतरही सरकारने यातून काही बोध घेतल्याचे चित्र दिसत नाही. आज कडाक्याच्या उन्हाळ्यात भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात कामानिमित्त आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत उभे असल्याचे चित्र होते. कारण काय तर तांत्रिक अडचणींमुळे पास नाही.
मंत्रालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आत प्रवेशासाठी पास काढावे लागतात. आज या पाससाठी मंत्रालयाबाहेर भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पास मिळत नसल्याने नागरिक प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत होते. पास का मिळत नाहीत याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की येथील इंटरनेट बंद पडले आहे. त्यामुळे पास मिळत नव्हते. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सोलापूर यांसह अन्य शहरांतून हे नागरिक कामानिमित्त येथे आले होते.