- फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. जे आपल्याला पटत नाही, ते आपल्यासाठी वाईट असतं, जे आपल्याला आवडत नाही, ते चूक असतं, जे आपल्या मनाविरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध घडते. ते अयोग्य असतं अशी आपली ठाम समजूत झालेली असते. हे जग आपल्या आपण पाहिलेल्या स्वप्नांसाठी, आपल्या विचारशैलीनुसार, आपण बनवलेल्या नियमानुसार आणि आपल्या हुकूमशाहीनुसार चालणार नसतं, तर ते ज्याला जे पटेल, जे त्याला आवडेल, जमेल, जे त्याच्यासाठी योग्य असेल, सोईच असेल त्यावर अवलंबून असतं. आपलं घर असो, घरातली लोकं असो, समाज असो पार रक्ताची नाती असोत, आपल्या म्हणण्यानुसार, सांगण्यानुसार कोणीही स्वतःला, स्वतःच्या सवयी ना, स्वतःच्या आवडी-निवडीला, स्वभावाला बदलायला तयार नसतं. आपण मात्र इतरांनी आपल्या अपेक्षेनुसार बदलावे, वागावे हा अट्टहास धरून बसतो आणि विनाकारण स्वतःला त्रास करून घेत राहतो.
इतरांना बदलणारे आपण कोण आहोत? जसे आपल्याला दुसऱ्याचं काही खटकटं, दुसऱ्याचं काही आवडत नाही, आपण जसे इतरांमध्ये खोड्या काढतो, इतरांना चूक समजतो, इतरांच्या स्वभावात आपल्याला दोष आढळतात तसंच इतरांना पण आपल्या अनेक गोष्टी आवडतं नसतात, अनेक विचार पटत नसतात. इतरांच्या तुलनेत आपण सुद्धा मूर्ख असू शकतो, चुकीचे असू शकतो, आपल्यात कमतरता, उणिवा असू शकतात ही जाणीव आपल्याला असणे आवश्यक आहे.
इतरांना बदलण्याची सतत कसरत करत बसण्यापेक्षा, त्यासाठी प्रयत्न करत बसण्यापेक्षा, आपल्या सांगण्यानुसार, वागतोय की नाही हे सतत तपासत बसण्यापेक्षा म्हणजेच क्रॉस चेक करत राहण्यापेक्षा, इतरांच्या वागणुकीला फूटफट्टीने मोजत बसण्यापेक्षा आणि त्याला वारंवार आपल्या अस्तित्वाची, अपेक्षांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःला बदला, स्वतःमध्ये असे विचार रुजवा की सगळ्यांना आपापले आयुष्य आपल्या पद्धतीने जगायचा अधिकार आहे. आपण कोणालाच जबरदस्ती करून, रागावून, दबाव टाकून, इमोशनल ब्लॅकमेल करून, कांगावा करून, त्याला धाक दाखवून आपल्या मनाप्रमाणे वागायला मजबूर करणे चुकीचे आहे. ही आयुध वापरल्यामुळे एकवेळ समोरचा तेवढ्यापुरता आपल्या मनासारखे वागेलसुद्धा पण ते मनापासून नसेल तर तो तेवढ्यापुरता केलेला देखावा असेल. इतर लोक कसे वागतात, तसे का वागतात, आपले का ऐकत नाहीत हे अजिबात आपल्या हातात नसते. लोकांना मोकळं राहू द्या, आपली मतं, विचार, अपेक्षा कोणावरही लादण्याचा प्रयत्न करू नका. आपले मत, विचार, अपेक्षा, भावना इतरांना नक्कीच सांगा, बोला, आपलं मन मोकळं करा, आपल्याला होणारा त्रास समोरच्याला सांगा, त्याचं सहकार्य मागा, पण कोणाच्याही मागे लागू नका. त्यामुळे आपलीच किंमत शून्य होते, लोकं आपल्याला कमी लेखू लागतात. कोणाकडे मागितलेली मदत असो, आपली काही गरज असो एकदा-दोनदा सांगणे आणि विचारणं रास्त आहे. पण ती पूर्ण होण्यासाठी कोणाकडे अट्टहास करणे म्हणजे त्याला त्याच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध जायला लावणे आहे. जेव्हा कोणीही तुमच्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध जावून कोणतीही गोष्ट करेल तेव्हाच त्या संबंधात, त्या ओळखीत अथवा नात्यात दडपण आणि अवघडलेपणा तयार होईल. आपला कोणत्याही गोष्टीसाठी लावलेला तगादा, हट्ट एखाद्याची डोकेदुखी ठरू शकते याचं भान ठेवणं आवश्यक आहे.
आपल्यासाठी आपले विचार, आपलं बोलणं तसेच सांगणं खूप महत्त्वाचं असतं, आपल्यासाठी आपल्याला होणारा त्रास, आलेली अडचण, आपल्याकडे असलेली माहिती, आपले प्लॅन, उपाययोजना, नियोजन आपल्याला पटणाऱ्या असतात. दुर्दैवाने समोरील व्यक्तीला त्यात इंटरेस्ट नसेल तर तो त्याच्याच नियमानुसार चालणार आहे. अशावेळी आपण दोन पावले मागे येणं कधीही चांगलं. ‘मौनम सर्वार्थ साधनम’ या उक्तीनुसार अशा प्रसंगी शांत राहा.
आंतरिक इच्छाशक्ती ही मानवी स्नेहसंबंधामध्ये खूप महत्त्वाची आहे. जर कोणालाही तुमच्यासाठी काहीही करायची मनापासून इच्छा असेल, तर त्याला आपण ते सांगण्याची, याचना करण्याची, पटवण्याची, परत परत आठवण करून देण्याची, त्याचं लक्ष वेधून घेण्याची कधीच गरज नसते. आपण ज्याला जितकं महत्त्व देतो, त्याच्या प्रतिक्रियेला जितकं महत्त्व देतो, तितकंच त्याच्या आयुष्यात आपलं महत्त्व असेल तर काहीही झालं तरी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोच.
समोरच्याचं प्राधान्य म्हणजेच प्रायोरिटी वेगळी असेल तर आपण त्याला विनाकारण आपल्याकडे खेचत राहण्यात काहीच अर्थ नसतो. कोणाच्याही मनावर ताबा मिळवण्यासाठी आपण काहीही क्लृप्त्या केल्या तरी त्या निष्फळ ठरतात कारण तिथे त्याच्या इच्छाशक्तीचा आभाव असतो. म्हणूनच इतरांना कंट्रोल करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि तसा प्रयत्न सुद्धा आपण करू नाही. आपल्याला होणारे जास्तीत जास्त मानसिक त्रास, दुःख, यातना, चिडचिड, राग, संताप, नैराश्य, खदखद हा इतर लोकं आपल्या मन मर्जीनुसार, आपल्या अपेक्षित वागत नाहीत, यातून निर्माण झालेला असते. आपण कितीही त्रागा केला, आदळ आपट केली तरी समोरचा त्याची दखल घेत नाही. आपण कितीही चांगुलपणा दाखवला, नमतं घेतलं, माघार घेतली तरी आपल्या मनासारखं होत नाही. कोणाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही कारण समोरच्याने आपल्याला विचारात सुद्धा घेतलेलं नसतं. समोरच्याने जरी आपल्याला विचारात घेतलं असेल तरी त्याला तसं वागायचं नसतं, तसं करायचं पण नसतं पण आपण मात्र सतत धुसफूस करत असतो. अशा वेळी विषय ताणत बसण्यापेक्षा निर्णय त्या व्यक्तीवर सोडून पुढे चालत राहणे रास्त असते.
आपलं व्यक्तिमत्त्व, आपले विचार, आपल्या जाणिवा, आपल्या भावना आणि संवेदना या फक्त आपल्या असतात. आपण कोणाचा कितीही विचार केला, त्याच्या बदलण्याची, आपल्या अपेक्षेनुसार वागण्याची कितीही वाट पाहिली तरी त्याचा मनात काय आहे हे आपण कधीच जाणून घेऊ शकत नाही. दुसऱ्याचं मन, भावना, विचार आपण नियंत्रित करू शकत नसतो. दुसऱ्याच्या विचारांना आपण बंधनात ठेऊ शकत नसतो. त्यामुळे आपल्या हातात असते ते म्हणजे फक्त स्वतःला बदलमणे. कोणाचंही मन वाऱ्याच्या वेगाने धावणार असतं, जर आपलंच मन आपल्या ताब्यात नसतं तर इतराचं मन आपण कसं ताब्यात ठेवणार आहोत याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक जण स्वतःचं आयुष्य जगायला समर्थ असतो, त्याला त्यासाठी उपजत बुद्धी असते, तयारी असते. आपण कोण आहोत जे इतरांना, त्यांच्या आयुष्याला बदलण्याची धडपड करत राहावी? आपल्याला असं का वाटावे की कोणी माझ्यासाठी काहीतरी करेल, माझ्यासाठी कोणीही तसदी घेईल? आपल्यासाठी कोणी त्याच्या विचारांशी, निर्णयाशी तडजोड का करेल? आपल्याला इतरांच्या कुबड्या का लागतात? आपल्याला सतत आधार आणि पाठिंबा का लागतो, इतराचं मन वळवण्यासाठी आपण आपला किती वेळ, श्रम, भावना किती काळ खर्ची घालायचा याचा आपण विचार करणे आवश्यक आहे. आपण एखाद्याला जितकं महत्त्व देतो तितकंच महत्त्व त्याच्या आयुष्यात आपलं असेल तर काहीही झालं तरी आपण एकत्र येतोच, समोरचा आपल्यासाठी वाटेल ते करतोच. दोन्ही बाजूने अपेक्षा, आकांक्षाचा समतोल असेल तर अशक्य काहीही नसतं. म्हणून कोणत्याही कारणास्तव इतरांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न आपण करू नाही.