जयपूर (वृत्तसंस्था) : गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना बुधवारी लखनऊ सुपरजायंट्सशी होणार आहे. चालू हंगामात गुणतालिकेत आतापर्यंत चढ-उताराची कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला विजयी मार्गावर परतून अव्वल स्थानी झेप घ्यायची असेल, तर त्यांना टेबल टॉपर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा यशस्वीरीत्या सामना करावा लागेल.
मोसमात राजस्थानची कामगिरी नावाप्रमाणेच रॉयल राहिली असून या संघाने आतापर्यंत खेळलेल्या पाचपैकी चार सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. दुसरीकडे केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ ५ पैकी ३ सामने जिंकून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना शेवटच्या सामन्यात पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या मोसमात आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी चांगली दिसत आहे. राजस्थानसाठी या हंगामात आतापर्यंत सर्व काही मनाजोगते झाले आहे. फलंदाजीत जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल संघाला चांगली सुरुवात करण्यात यशस्वी ठरले आहेत. कर्णधार संजू सॅमसननेही या मोसमात भरपूर धावा केल्या आहेत. शिवाय शिमरॉन हेटमायर फिनिशर म्हणून खूप प्रभावी ठरत आहे. गोलंदाजीत अश्विन आणि युझवेंद्र चहल या जोडीने आपल्या फिरकीने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, तर ट्रेंट बोल्टने संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले आहे.
दुसरीकडे पंजाबविरुद्ध अखेरच्या क्षणी विजय लखनऊच्या हातातून निसटला. मात्र संघासाठी दिलासादायक बातमी म्हणजे कर्णधार केएल राहुल प्रदीर्घ कालावधीनंतर फॉर्ममध्ये परतला आहे. राहुलने गेल्या सामन्यात ७४ धावांची शानदार खेळी केली होती. शिवाय मार्क वुड आणि रवी बिश्नोई यांनी गोलंदाजीत कमाल केली. तसेच युद्धवीर सिंगनेही त्याच्या पहिल्याच सामन्यात केलेल्या घातक गोलंदाजीबद्दल प्रशंसा मिळवली. लखनऊच्या संघाकडे प्रतिभेची कमतरता नाही; परंतु त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही. पंजाब किंग्ज विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात लखनऊचा संघ मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे अखेरीस त्यांना १० ते १५ धावा कमी झाल्या. कर्णधार केएल राहुलचे (५६ चेंडूंत ७४ धावा) फॉर्ममध्ये परतणे संघासाठी सकारात्मक संकेत आहे. फलंदाजांना मात्र मधल्या षटकांमध्ये धावा जमवण्यावर भर द्यावा लागणार आहे. लखनऊकडे काईल मायर्स, निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस यांच्या रुपात चांगले पॉवर हिटर आहेत. पण हे सारे फलंदाज चांगली भागीदारी रचण्यात असमर्थ ठरत आहेत. याशिवाय दीपक हुडाचे अपयश हाही संघासाठी चिंतेचा विषय आहे.
राजस्थानकडे मजबूत फलंदाजीची फळी असून यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी संघाच्या शीर्ष क्रमात चांगली भूमिका बजावली आहे. बटलरने आतापर्यंत संघासाठी सर्वाधिक २०४ धावा केल्या आहेत, तर जयस्वालच्या नावावर १३६ धावा आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात हे दोन्ही सलामीवीर चालू शकले नाहीत; परंतु कर्णधार सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी आपली भूमिका चोख बजावत संघाला विजय मिळवून दिला. देवदत्त पडिक्कलनेही आक्रमक खेळी केली. मात्र रियान पराग संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. राजस्थानचे गोलंदाजी आक्रमणही मजबूत आहे.
लखनऊला पंजाबविरुद्ध प्रतिभावान रवी बिश्नोईकडे चेंडू उशिरा सोपवण्याची चूक महागात पडली. कारण बिश्नोई त्याच्या गुगलीने फलंदाजांना अडचणीत आणण्यात माहीर आहे. त्यामुळे कर्णधार राहुलने त्याचा वापर मधल्या षटकांमध्ये केला पाहिजे. संघातील इतर दोन फिरकीपटू कृष्णप्पा गौतम आणि कृणाल पंड्या आपली भूमिका चोख बजावत आहेत. तसेच मार्क वुड आणि आवेश खान यांच्या रुपाने चांगले वेगवान गोलंदाज आहेत. युद्धवीर सिंग चरकनेही पंजाबविरुद्ध आपला प्रभाव सोडला. मात्र सलग तीन सामने जिंकून गुणतालिकामध्ये पहिले स्थान पटकावणाऱ्या राजस्थानवर मात करणे लखनऊसाठी सोपे नसेल.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स गेल्या मोसमात दोनदा आमने-सामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये एलएसजीला आरआरकडून पराभव स्वीकारावा लागला होता.अशा स्थितीत लखनऊ मागील पराभवाचा बदला घेण्यास सक्षम ठरतील की रॉयल्स यावेळीही आपली आघाडी कायम ठेवतील?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…