नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १० हजार ५४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जे आधीच्या तुलनेपेक्षा ३८ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ६३ हजार ५६२ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
गेल्या २४ तासांमध्ये ३८ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे एप्रिलमधील मृतांची संख्या ४४ वर पोहोचली आहे.
राज्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून नवीन ९४९ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी ५०५ रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत मंगळवारी २२० रुग्ण आढळून आले. सोमवारी १३१ रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने २२ मार्चपासून सक्रिय रुग्णांच्या वाढीचा आलेख उंचावला आहे. यात भरीस भर म्हणजे मे महिन्यात रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून पाच ते सहा हजारांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.