पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली उघडकीस
नागपूर : बेळगाव तुरुंगात कैदी असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी नागपूर पोलीस चौकशी करत आहेत. अकबर पाशा हा प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेचा सदस्य आहे.
जयेश उर्फ शाकीरचे लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.
बेळगावच्या तुरुंगातून १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन करत धमकी दिली होती. यावेळी पहिल्यांदा १०० कोटी तर दुसऱ्या वेळी १० कोटी रुपये खंडणी म्हणून मागण्यात आले. पैसे न दिल्यास गडकरींन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.