Wednesday, March 12, 2025
Homeक्रीडाIPL 2024मुंबई-हैदराबाद मध्ये आज घमासान

मुंबई-हैदराबाद मध्ये आज घमासान

विजयी हॅटट्रिकचे लक्ष्य

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

ठिकाण : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

हैदराबाद (वृत्तसंस्था) : सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी गत दोन्ही सामन्यांत बाजी मारली असून विजयी हॅटट्रिकचे लक्ष्य कोण साध्य करणार? यावर चाहत्यांच्या नजरा आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये या दोन्ही संघांनी सलग दोन पराभवांसह स्पर्धेची सुरुवात केली. मात्र त्यानंतरचे दोन्ही सामने आपल्या खिशात घातल विजयी लय पकडली आहे.

शेवटच्या सामन्यात मुंबईने केकेआरचा ५ विकेटने सहज पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव त्याच्या नेहमीच्या जबरदस्त लयीत दिसला. स्टार फलंदाज सूर्या फॉर्ममध्ये परतल्याने उत्साही मुंबई इंडियन्स मंगळवारी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. मुंबई आणि सनरायझर्स या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले असून आता विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. मुंबईसाठी आनंदाची बातमी म्हणजे सूर्यकुमार फॉर्ममध्ये परतला आहे. तर ईशान किशनच्या आक्रमकतेलाही धार आली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघर्ष करणारा मुंबईचा संघ आता संतुलित दिसत आहे.  तिलक वर्मा चांगल्या लयीत आहे, तर कॅमेरॉन ग्रीन आणि टीम डेव्हिड यांनीदेखील आवश्यकतेनुसार उपयुक्त योगदान दिले आहे. गोलंदाजीत अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावलाने अप्रतिम कामगिरी केली आहे; तर युवा हृतिक शोकीनने त्याला चांगली साथ दिली आहे.  मात्र बुमराहच्या अनुपस्थितीत, भरवशाचा जोफ्रा आर्चरही कोपराच्या दुखापतीमुळे खेळू न शकल्याने मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची चिंता आहे.  त्याच्या अनुपस्थितीत रिले मेरेडिथ गेल्या दोन सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळत आहे. मुंबईने रविवारी अर्जुन तेंडुलकर आणि डुआन जॅनसेन यांना आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली आणि या दोघांनाही हैदराबादच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सनरायझर्सला हॅरी ब्रूक आणि राहुल त्रिपाठी यांच्या रुपाने दोन नवे हिरो मिळाले आहेत, ज्यांनी त्यांच्या मागील दोन विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.  एकीकडे ब्रूकने नाइट रायडर्सविरुद्ध शतक झळकावत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या, तर दुसरीकडे त्रिपाठीने ४८ चेंडूंत ७४ धावांची खेळी कतर पंजाबविरुद्ध विजय मिळवून दिला. तसेच सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने या दोन्ही सामन्यात दुसऱ्या टोकाकडून उपयुक्त योगदान दिले.  गोलंदाजांमध्ये फिरकीपटू मयंक मार्कंडेयने सनरायझर्सकडून आतापर्यंत सहा बळी घेतले आहेत, तर उमरान मलिक, मार्को जॅनसेन आणि भुवनेश्वर कुमार यांनीही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे.

मार्को जॅनसेन हा इंडियन्ससाठी धोकादायक ठरू शकतो. कारण मुंबईच्या शीर्ष क्रमातील फलंदाज डाव्या हाताच्या गोलंदाजाविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहेत. पण कर्णधार रोहित शर्मा फटकेबाजी करत असून मधल्या फळीत तिलक वर्माचा कमाल करत आहे.  दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास सारखाच आहे. किंचित चांगल्या नेट रन रेटमुळे, मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलवर सनरायझर्स हैदराबादपेक्षा थोडे वरचढ आहेत. मात्र दोन्ही संघ अद्यापही गुणतालिकेत तळाच्या अर्ध्यात आहेत. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात विजयासह अव्वल चारमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -