पालिका निवडणुकीमुळे वेळापत्रकात बदल
लखनऊ (वृत्तसंस्था) : लखनऊमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे ४ मे रोजी होणाऱ्या लखनऊ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लखनऊमध्ये होणाऱ्या सामन्यात बदल करण्यात आला आहे. आता हा सामना ४ ऐवजी ३ मे रोजी खेळवला जाणार आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील वेळापत्रकानुसार ४ मे रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार होते. एक सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात, तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार होता. मात्र, वेळापत्रकात बदल केल्यानंतर आता लखनऊ आणि चेन्नई यांच्यात होणारा सामना ३ मे रोजी दुपारी ३.३० वाजता होईल. त्याच दिवशी संध्याकाळी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ४ मे रोजी एकच सामना संध्याकाळी ७.३० वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.