बंगळूरु (वृत्तसंस्था) : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या सामना फीच्या १० टक्के हा दंड असेल. नेमक्या कोणत्या घटनेसाठी हा दंड आहे हे स्पष्ट केलेले नसले, तरी शिवम दुबे बाद झाल्यानंतर केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे हा दंड आकारल्याचे मानले जात आहे.
आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आचारसंहितेचा स्तर-१ चे उल्लंघन झाल्यास, रेफरींचा निर्णय अंतिम असतो. मात्र कोहलीला कोणत्या घटनेसाठी दंड ठोठावण्यात आला होता हे स्पष्ट केलेले नाही. पण चेन्नईचा मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबेला बाद केल्यावर कोहलीने आक्रमक सेलिब्रेशन केले होते. त्यामुळे कदाचीत आचारसंहितेचे उल्लंघन झाले असावे, असे मानले जात आहे.