मुंबईसारख्या महानगरांच्या अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्या आहेत. इथे रोजी-रोटी मिळवण्यासाठी हजारो लोक दररोज येत असतात. काहींना यश मिळतं तर काहींना उपेक्षित जीणं जगावं लागत. रस्त्यावर किंवा रेल्वे स्टेशनवर आपण अनेक लहान मुलं कधी कधी त्यांच्या आई-वडिलांबरोबर किंवा कधी कधी एकटीच इथे तिथे फिरताना पाहतो.
सामान्य माणूस त्यांच्याकडे बऱ्याचदा उपेक्षेनीच पाहत असतो आणि आपल्या नेहमीच्या धावपळीत त्यांना विसरूनही जातो; परंतु अशी बेघर मुलं ही सुद्धा एक सामाजिक समस्या आहे याकडे सामान्य जणांचा लक्ष जात नाही. मुंबईत अशा प्रकारची एक ते सव्वालाख बेघर मुलं आहेत अशी आकडेवारी जर आपल्याला सांगितली तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. पण ही वस्तुस्थिती आहे असं जीवन संवर्धन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण यांनी बोलताना सांगितलं आणि आश्चर्याचा धक्का बसला. हे वास्तव पाहूनच या मुलांसाठी काहीतरी करावं या विचारांनी जागृत होऊन चव्हाण कसे कामाला लागले? आणि त्यातूनच जीवन संवर्धन फाऊंडेशनची स्थापना कशी झाली? हे जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाली.
सदाशिव चव्हाण हे धुळ्यामध्ये अभाविपचे पूर्णवेळ काम करत होते. त्यामुळे सामाजिक कार्यात काहीतरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतचं. मुंबईत आल्यानंतर रस्त्यावर, स्टेशनवर असलेली बेघर मुलं त्यांच्या नेहमी नजरेला पडत असत. सामाजिक कार्याच्या निमित्ताने मुंबईत आल्यानंतर त्यांचा डोंगरी बालसुधार गृहाशी संपर्क आला आणि त्यांना तिथे छोटा-मोठा गुन्हा करून आलेल्या मुलांची दुःख, वेदना आणि समस्या लक्षात आल्या. एका मुलाला दोनशे रुपये चोरले म्हणून आठ महिन्यांची शिक्षा झाली होती आणि बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. त्याच्याकडे चव्हाण यांनी तुझ्यासाठी कोणी केस लढली नाही का? असं विचारल्यावर तो म्हणाला, माझं कोणीच नाहीये. या आठ महिन्यांच्या काळात त्या मुलावर काय संस्कार होत होते ते त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं.
त्याच दरम्यान त्यांनी अशाच दोन बेघर मुलींना स्वतःच्या घरी राहायला आसरा दिला होता. त्यांची पत्नी आणि त्यांचे सासरे त्यांची खूप चांगली देखभालकरत होते. ते करत असताना असं जाणवल की, हे काम घरात होणार नाही तर याला संस्थेचे रूप देण्याची गरज आहे. म्हणून २०१० साली सदाशिव चव्हाण यांनी समविचारी मित्रांसोबत जीवन संवर्धन फाऊंडेशनची स्थापना केली. पहिला प्रकल्प टिटवाळा येथे सुरू झाला. एका दानशूर व्यक्तीने स्वतःची जागा “वापरायला घ्या” असं सांगून वापरायला दिली आहे, ती अद्याप परत मागितलेली नाही. त्यानंतर मुलींसाठी दुसरा प्रकल्प २०१६ मध्ये ठाणे येथे सुरू झाला.या मुलांचे सर्वेक्षण करणे, काही काळ मुलाचे निरीक्षण करणे, त्याच्याशी मैत्री करणे, त्याला बाहेरच्या जगातील चांगल्या गोष्टींची जाणीव करून देणे, त्याला शिक्षण घेण्यासाठी तयार करणे व तो शिक्षणासाठी तयार झाला की त्याला योग्य ठिकाणी शिक्षणासाठी ठेऊन त्याला चांगला माणूस बनण्यास मदत करणे या मुलांशी संपर्क साधला जातो. त्यातूनच “मी पण शिकणारच” या प्रकल्पातून अनेक मुलांचे आयुष्य उभे राहत आहेे.
आतापर्यंत संस्थेने मुंबईतील ८६ मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचे कार्य केले आहे. मुंबईतील फूटपाथ व प्लॅटफॉर्मवरील(बेघर) मुले म्हणजे काय? तर मुलांना ज्या वेळेस स्वत:चे घर नसते, त्या वेळेस समाजातील असामाजिक तत्त्वाची माणसं, परिस्थिती त्याचा गैरफायदा घ्यायला लागतात. ही मुले त्या वयात चांगले काय आणि वाईट काय हे समजण्याच्या स्थितीत नसतात. परिणामी ज्या वयात मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे, खेळले पाहिजे, त्या वयात ही रस्त्यावर फिरणारी बेघर असलेली मूले परिस्थितीच्या आहारी जातात. जिथे दोन वेळच्या जेवणासाठी खूप कसरत करावी लागत असते. तिथे कुठलं शिक्षण आणि कुठले संस्कार मिळणार? केवळ आपले पोट भरणे हाच त्यांचा जगण्याचा हेतू राहिलेला असतो आणि हा हेतू पूर्ण करण्यासाठी मग मिळेल तो मार्ग ते मुलं हाताळतात.
चोऱ्या करणे, पाकीट मारणे, भीक मागणे अशा कामात ती सहज ओढली जातात आणि उरलेल्या पैशामधून नशाही करायला लागतात, त्यानंतर मात्र या मुलांचं जीवनच उद्ध्वस्त होत असत. फटपाथ किंवा प्लॅटफॉर्मवर राहात असताना यापैकी ९० टक्के मुलां/मुलींचे लैंगिक शोषणही होत असते असं संस्थापक चव्हाण यांनी सांगितल्यावर धक्काच बसला. मुंबईतील या मुलांकरवी ड्रॅग रॅकेट चालवलं जातं. मुलांकडून सहजी ड्रग इकडे तिकडे पोहोचवले जातात. शिवाय त्या मुलांनाही नशेची सवय लावली जाते. त्यामुळे भविष्यात ती गरज भागवण्यासाठी सुद्धा ही मुलं हा व्यवसाय करत राहतात. खायला वडा पाव, समोसा असतो आणि अांघोळ नाही, कपडे धूत नाहीत या सर्वांमुळे ती आतून खंगतात.यांचं आयुष्य पस्तीशी पुढे गाडी हाकू शकत नाहीत. कारण यापैकी अनेकांना एचआयव्ही, टीबीसारखे आजार लागलेले असतात असं हे दुष्टचक्र आहे असं चव्हाण यांनी सांगितल्यावर मती गुंग झाली.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या देशात बेघर मुलांची ही स्थिती म्हणजे आपलं सामाजिक अपयशच आहे असं हे ऐकताना जाणवलं. तेच चव्हाण यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला आतून जाणवलं आणि म्हणून त्याने या कामाची रुजवात केली असावी. साधारणतः १०० नवीन मुले “मी पण शिकणारच” या प्रकल्पात सहभागी करण्यात येतात; परंतु ही मुलं इतक्या सहजासहजी शिक्षणाकडे वळत नाहीत. सुरुवातीला संस्थेचे कार्यकर्ते या मुलांना रेल्वे स्टेशन किंवा रस्त्यावर फिरताना पाहतात, त्यांची राहाणी, एकूण वर्तन यांचं दररोज जाता येता निरीक्षण करतात. हळूहळू त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतात. तुला समाजात चांगल्या रीतीने राहायचं असेल, तर शिकलं पाहिजे असं सांगतात, आई-वडील असतील तर त्यांना समजावतात. कारण अनोळखी माणसांकडून त्यांनी अनेक टक्केटोणपे खाल्लेले असतात; परंतु नंतर कार्यकर्ता दादा किंवा ताई आपल्या चांगल्यासाठीच सांगत आहे याची खात्री पटल्यावर ही मुलं यायला तयार होतात. आल्यानंतर त्यांचा कल पाहून त्यांना शिक्षण दिलं जात. सकाळी नियमित वेळेत उठणं, योगासन, नाश्ता, अभ्यास, रात्रीची प्रार्थना, सर्व सण साजरे करणं अशा तऱ्हेने या मुलांची दिनचर्या असते.
आतापर्यंत इथून ८६ मुलं बाहेर पडली असून सध्या १७१ मुले-मुली संस्थेत राहत आहेत. त्यापैकी सात मुलं ड्रायव्हिंगचं शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली आहेत तसेच एक मुलगा इंजिनीअरिंग शिक्षण घेत आहे, अन्य एक मुलगा दक्षिण आफ्रिकेतही नोकरीसाठी गेला आहे. मुलींनाही शिवणकाम, संगणक प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे राहणाऱ्या मुलांना कुठलीही वयोमर्यादा नाही. अठरा वर्षांची झाली की त्यांनी बाहेर पडावं अशी सक्ती त्यांच्यावर नसते. बाहेर गेलेल्या मुलांकडेही कार्यकर्ते लक्ष ठेवून नको ते पाहत असतात. सुरुवातीला मोठ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणे सुरू झालेलं हे काम आता चांगलंच फोफावल आहे. एखादं काम जेव्हा अतिशय प्रामाणिकपणे, नियमित आणि चोख केले जाते. त्यावेळी समाजातील अनेक हात मदतीसाठी पुढे येतात त्यानुसारच अनेक जणांच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक मदतीचा आधार तसेच अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी हाती असल्यामुळेच संस्था या बेघर मुलांसाठी नेटाने काम करत आहेत.
या सहकाऱ्यांबरोबर अनेक नामांकित पुरस्कारही संस्थेला प्राप्त झाले आहेत. नुकताच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा अंत्योदय पुरस्कार २०२३ संस्थेला मिळाला आहे. पुरस्कार हे केवळ बक्षीस नसतात तर ते एक प्रोत्साहन असतात. तसेच आपण नि:स्वार्थ बुद्धीने केलेल्या कामाची पोचपावतीही असते त्यामुळे चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह अजून द्विगणित झाला असून यापुढे समाजातील सगळीच बेघर मुलं नाही, तर किमान एक टक्का तरी मुलांना घर आणि घरपण द्यायचे, असा जीवन संवर्धन फाऊंडेशनचा संकल्प आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…