मी राष्ट्रवादीत आहे, हे स्टँम्प पेपरवर एफीडेविट लिहून देऊ काय : अजित पवार
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, मी भाजपात जाणार यामध्ये यत्कींचितही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी आज दिली. भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अखेर पूर्णविराम दिला. दोन दिवसांपासून राज्यात याबाबत चर्चा सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्याचे वृत्त खोटं आहे. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, हे सुद्धा धादांत खोटे आहे. आता काय मी राष्ट्रवादीत आहे हे स्टँम्प पेपरवर एफीडेविट लिहून देऊ काय, असे संतप्त होऊन अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळले. मीडिया स्वत:च्या मनाने बातम्या चालवत आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजितदादांनी संजय राऊतांनाही झापले
आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेण्याची काहीही आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वत:चे प्रवक्त आहेत, नेते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडतील, अशा शब्दांत अजित पवार यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर सूचक वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या भेटीचा उल्लेख करत या लेखात संजय राऊतांनी म्हटले होते की, राष्ट्रवादीतून कुणाला भाजपमध्ये जायचे असल्यात त्याची ती वैयक्तिक भूमिका असेल. पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतरच अजित पवारांभोवती पुन्हा संशयाचे धुके निर्माण झाले होते. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ शकतात, अशा चर्चांना ऊत आला होता.
पत्रकार परिषदेत या चर्चांचे खंडन करताना अजित पवार म्हणाले की, माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत मुद्दामहून गैरसमज पसरवले जात आहेत. एका पक्षाच्या मुखपत्रातूनही माझ्या बंडावर काहीही चर्चा केली गेली. तुम्हाला आमचे वकीलपत्र घेण्याची काय आवश्यकता आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या पक्षात ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आहेत ना. ते आमची भूमिका मांडतील. उगीच काहीतरी बोलून संभ्रम का निर्माण करत आहात.
संजय शिरसाटांनाही सुनावले खडेबोल
अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनाही खडेबोल सुनावले. संजय शिरसाट म्हणाले होते की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे. पण ते राष्ट्रवादी पक्षासोबत आले तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावरही अजित पवारांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले, अरे मी अजून कुठे गेलेलो नाही. कुठे आलेलो नाही. त्याआधीच ते आले तर आम्ही जाऊ, अशी भाषा का करत आहात? माझी काही भूमिका असेल तर मी ती स्वत: मांडेन ना. मी स्वत: पत्रकार परिषदेत माझी भूमिका मांडेन. त्याआधीच माझ्या येण्यावर येवढी काय चर्चा करताय. काही लोकांचे माझ्यावर एवढे काय प्रेम आहे, हेच मला समजेनासे झाले आहे.