Tuesday, July 9, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकनाशिकमधील गोहत्या थांबणार कधी?

नाशिकमधील गोहत्या थांबणार कधी?

गोरक्षकाची अर्जाद्वारे मागणी

नाशिक : रोज दहा टन गोमांस मुंबईसह अन्य शहरात विक्रीसाठी पाठविणारा गोमांस व्यापारी किती गोवंशाची कत्तल करीत असेल? त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे अनेक सवाल उपस्थित करून एका गोरक्षक नागरिकाने १३ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, लोकायुक्त, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, पोलीस यंत्रणा यांना नाशिकमध्ये खुलेआम सुरू असलेल्या गोहत्येबाबत अर्ज दिला आहे. या अर्जाद्वारे त्यांनी नाशिकमधील गोहत्या थांबविण्याची मागणी केली आहे. मात्र या अर्जावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.

वडाळा येथे रोज शेकडो गोवंशाची कत्तल केली जाते व नाशिक शहरासह मुंबई व इतर ठिकाणी पाठवले जातात, जवळपास दहा ते बारा टन गोमांस रोज विक्री केले जाते, अशी धक्कादायक माहिती एका गोवंश बचावासाठी पुढाकार घेतलेल्या अर्जामुळे समोर आली आहे. खरंतर यावर गंभीरतेने प्रशासनाने दखल घ्यायला हवी परंतु मुक्या जनावराप्रमाणे यंत्रणादेखील मुखी व हातबल झाल्याचे चित्र सुसंस्कृत मनाला चटका लावून जाणारे आहे.

तांत्रिक यंत्रणा वापरा आणि पडताळा सत्यता

तांत्रिक यंत्रणेच्या जोरावर अनेक गुन्हेगारांना तुरुंगात डांबल्याचे आपण बघितले आहे. उघड्या डोळ्यांनी दिसणारा अवैध धंदा बंद करण्यासाठी व त्यावर कारवाई करण्यासाठी फक्त योग्य मानसिकता गरजेची आहे. परंतु धंदाच नाही असे सोंग घेणाऱ्यांसाठी अर्जदाराने चक्क वडाळा नाका येथील अवैध गोवंश विक्री होत असलेल्या ठिकाणाचा गुगलसारख्या तांत्रिक यंत्रणेचा वापर करून पोलिसांनी शोध घ्यावा आणि उचित ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात संजेरी मेडिकलच्या जवळ असलेले मोठ्याचे मटन दुकान हे स्पष्ट गुगल मॅप वर दिसून येते. तरीही यंत्रणा ढिम्म हे यातून स्पष्ट होते.

शहरातील वडाळा नाका परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला अवैध कत्तलखाना आजी माजी लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने सुरू असल्याचा आरोपही या अर्जदाराने केला आहे.

कट मारल्याचा राग, पाठलाग केला पण…?

दोन-चार दिवसांपूर्वीच पालक मंत्री दादा भुसे यांच्या ताब्यातील गाडीला एका पिकअपने कट मारला व सुसाट वेगाने पळून जात असताना दादांनी त्याचा पाठलाग करून त्या पिकअप गाडी चालकाला थांबवले व त्याच्या गाडीत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशाची सुटका केल्याने हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. त्यावर दादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दादांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गो हत्या करणाऱ्यांवर तसेच गोमांस विक्री करणाऱ्या तस्करांची गय केली जाणार नाही असे बोलून दाखवले. मात्र शहरात इतका मोठा कत्तलखाना सुरु असताना दादा स्थित प्रज्ञ का? तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर देखील किमान या अवैध धंद्यावर योग्य कारवाई करण्यासाठी पाऊल उचलणे अपेक्षित होते.

पुराव्यासह अर्ज, मग प्रतीक्षा कसली?

कत्तलखाना चालवणाऱ्यांच्या नावासहित अर्जदाराने तक्रारी अर्ज केला आहे ज्यामध्ये संशयित कुठल्याही थराला जाऊ शकतात तसेच आपली हत्या देखील ते घडवून आणू शकतात ही त्यांच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे असे नमूद करत, अर्जदाराने गोरक्षणासाठी जीवावर उदार होत अवैध कत्तलखान्याविरोधात अर्ज दिलेला आहे. कत्तलखान्याचा मालक व त्याचे इतर सहकारी यांचा स्पष्ट नामोल्लेख अर्जात आहे. या अर्जाची गंभीरतेने पोलीस विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -