सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले
नवी दिल्ली : न्यायालयाचे आदेश डावलून झाडे तोडल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑथोरिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना न्यायालयात उभे करा आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, अशा तीव्र शब्दात न्यायालयाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले.
मुंबईतील आरे जंगलातील झाडे तोडल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल) चांगलेच फटकारले. सुप्रीम कोर्टाने काही आदेश मागच्या वेळेस दिले होते. त्याचा अवमान झाल्याने सुप्रीम कोर्टाने एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
तुम्ही न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाही. तुम्ही कोर्टाचे आदेश व कोर्टाला डावलू शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या समोर या अधिकाऱ्यांना उभे करा व या ऑथोरिटीचे जे अध्यक्ष आहेत, त्यांना देखील उभे करा, असे म्हणत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीष डी. वाय. चंद्रचूड यांनी प्राधिकरणाला सुनावले. तसेच अशा लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे, अशा तीव्र शब्दात न्यायालयाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले.
मुंबई मेट्रो प्राधिकरण हे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चालते. ८४ झाडे तोडण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली होती. पण १८५ झाडे तोडण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यात अधिकारी हे दोषी आहेतच पण मुंबई मेट्रो प्राधिकरणाला देखील न्यायालयाने तितकेच जबाबदार ठरवले आहे.