Monday, June 30, 2025

अशा चुका पुन्हा नको - राज ठाकरे

मुंबई : थेट कुणावरही थेट टीका न करता प्रशासनाकडे बोट दाखवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा चुका पुन्हा करणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला प्रशासन आणि सरकारला दिला आहे.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झालेल्या श्रीसदस्यांपैकी १२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.


"काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचे आणि सरकारचे मी अभिनंदन केले होते. पण या सोहळ्याला जे गालबोट लागले ते टाळता आले नसते का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळले नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला केला आहे.


सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही, याची काळजी घ्यावी. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असेही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment