Wednesday, October 9, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यतो परत येतोय...

तो परत येतोय…

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

कोरोनाची लाट सुरू होऊन आज तीन वर्षे उलटून गेली, तरी कोरोनाची दहशत अजून संपलेली नाही, त्यातच आता नवीन लाट येत आहे. देशात एका दिवसात पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच नवीन एच २ एन २ हा नवीन व्हायरस ही धुमाकूळ घालू लागला आहे. म्हणजे आणखी एक नवीन संकट देशापुढे व जगापुढे उभे राहिलेले आहे. जगाने कोरोनाचा समर्थपणे मुकाबला केला. आता ही गरज आहे एकत्रितपणे येऊन न डगमगता मुकाबला करण्याची.

२४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन घोषित झाले व नंतर मानवाची एकूणच जगण्याची पद्धतच बदलली. सर्व व्यवहार ठप्प झाले. सर्वांना नाईलाजाने घरी बसणे सक्तीचे झाले. ज्यांना या आजाराची लागण झाली, त्यांना सर्वांपासून वेगळे राहावे लागले. काहींना इस्पितळात ठेवण्यात आले. बऱ्याच जणांचे मृत्यू हे आरोग्याच्या गुंतागुंतीतून झाले. तर कित्येकांचे मृत्यू हे भीतीमुळेच झाले. यावेळी आरोग्य यंत्रणा ही चाचपडताना दिसत होती. कोणावर काय उपचार करावेत. कोणता उपाय प्रभावी हेच त्यावेळी समजत नव्हते. नुसतेच प्रयोग सुरू होते. अशातच तीन-सहा महिने गेले, या काळातच बरीच मित्रमंडळी, ओळखीची माणसे आपल्याला सोडून गेली. स्मशानगृहात कधी नव्हे त्या रांगा लागल्या. आपल्या आप्तस्वकीयांचे अखेरचे दर्शन होणे सुद्धा कठीण होऊन बसले. अखेर तीन-चार महिन्यांनी आरोग्य यंत्रणांना आपला योग्य तो सूर गवसला. केंद्र सरकारने अशा वेळेस कौतुकास्पद काम केले. आपले पंतप्रधान नरेंद मोदी हे स्वतः या सर्व यंत्रणेकडे जातीने लक्ष ठेवून होते. कोरोना रुग्णालयांची विक्रमी वेळेत उभारणी करणे असो वा आरटीपीसीआरसारख्या महागड्या चाचण्या सर्वांना निदानासाठी वापर करणे, बाधितांवर मोफत उपचार करणे, लॉकडाऊन असल्याने गरिबांना मोफत अन्नपुरवठा करणे, अशी अनेक कामे केंद्र सरकार एकाच वेळी यशस्वीपणे पार पाडत होती. बॅक्टेरिया, व्हायरस, तसेच इतर जीवाणू यास मानवाची प्रतिकार शक्ती चांगली असल्यास मानवास त्रासदायक ठरत नाही, परंतु या साथीचा उद्रेक झपाट्याने झाल्यास तो थोपवणे मग अशक्य बनते, कोरोनाच्या बाबतीत नेमके हेच घडले. बघता बघता हा रोग जगभर पसरला, जगाचे कोणतेच टोक त्याने सोडले नाही. आता तीन वर्षे होऊन गेली तरी तो अजूनही आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. अजूनही त्याची दहशत तितकीच आहे, जितकी पूर्वी होती. १६ जानेवारी २०२१ला कोविड विरोधी पहिली लस उपलब्ध झाली होती. केंद्र सरकारच्या प्रयत्नाने तिचे वितरणही देशभर समान पद्धतीने व मोफत झाले होते. ही पहिली लस कोट्यवधी लोकांनी घेतली. तितक्याच लोकांनी दुसरी मात्रा घेतली तर खूपच कमी लोकांनी तिसरा बुस्टर डोस घेतला. गेली तीन वर्षे आपण कोरोनाच्या दहशतीखाली काढली, या काळात आपल्या शरीरात व मानसिकतेतही बदल झाला आहे. व्हायरसमध्ये जसे म्युटेशन होते, तसे ते आपल्या शरीरातही होत असते, आता आपले शरीर या कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी जास्त सज्ज झाले आहे. आपल्या मानसिकतेतही आता बराच बदल झाला आहे, तरी पण बेफिकीर न राहाता आता अजूनही पूर्वीसारखी काळजी घेणे तितकेच जरुरीचे आहे. हल्ली आजार हे खूप खर्चिक झाले आहेत, याचा कोरोना काळात खूप वाईट अनुभव सर्वांना आला, सरकारी इस्पितळे हाऊसफुल्ल झाली होती, ज्यांना सरकारी इस्पितळात बेड मिळाले नाहीत, त्यांनी खासगी इस्पितळात धाव घेतली तेथे त्यांचे बिल लाखा-लाखांमध्ये गेले, कित्येकांनी आपली आयुष्यभराची पुंजी ओतून टाकली तर कित्येकजण कर्जबाजारी झाले. कित्येक जण जीवनातून उठले. कोरोनाचे निदान करण्यासाठी लागणारी आरटीपीसीआर ही चाचणी करण्यासाठी हजारो रुपयांना लुटले गेले. कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाट आली, अशा कित्येक लाटा येतील असे भविष्य वर्तविले गेले होते. आता मात्र एक लाट आपल्यासमोर उभी ठाकली आहे.

आपले शरीर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी जास्त सज्ज झाले आहे. मृत्यूचे भय ही आता कमी झाले आहे. आपली काळजी आता आपणच घेतली पाहिजे. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार- विहार, साधी जीवनशैली, योग, ध्यानधारणा याचा अवलंब केला पाहिजे, दररोज स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, योग्य वेळी समतोल आहार घेणे व जीवनातील ताणतणाव टाळून मन नेहमी प्रसन्न ठेवावे एवढ्या साध्या गोष्टी तरी करता आल्या तर कराव्यात. आपण बघितले की कोरोनाचे मृत्यूचे प्रमाण आता कमी कमी होत जात राहिले आहे, डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेतला तर कोरोना पोझिटिव्ह हा रुग्ण ही सुखरूप कोणतीही गुंतागुंत न होता बाहेर पडू शकतो. आता ही गरज आहे समर्थपणे मुकाबला करण्याची. तरी तो अजूनही आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. अजूनही त्याची दहशत तितकीच आहे. जितकी पूर्वी होती.

आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार विहार, साधी जीवनशैली, योग, ध्यानधारणा याचा अवलंब केला पाहिजे, दररोज स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, योग्य वेळी समतोल आहार घेणे व जीवनातील ताणतणाव टाळून मन नेहमी प्रसन्न ठेवावे. एवढ्या साध्या गोष्टी तरी करता आल्या तर कराव्यात. सध्या वातावरणीय बदलामुळे इतर संसर्गजन्य आजारामध्ये डोके वर काढत असतात. त्यात कोरोना कोणता व वायरल आजार कोणते यात गल्लत होण्याची संभावना अधिक असते. जर गरज वाटेल तेव्हाच कोरोनाची चाचणी करणे उत्तम. या कोरोना काळात अनेक सार्वजनिक नियम हे पाळायलाच हवेत, बाहेर जाताना मुखपट्टीचा वापर हा केलाच पाहिजे. हात वरचेवर धुणे, हस्तादोलन टाळणे, गळाभेट न घेणे या गोष्टी अंगवळणी पडून घेणे आवश्यक असून नवीन लाटेतही या गोष्टींचा अवलंब करणे जरुरीचे आहे.

जेव्हा देशात लसीकरण सुरू झाले. पहिली लस सर्वांनी घेतली. दुसऱ्या लसीकरणात थोडी शिथिलता आली होती. तर तिसरा डोस फारच कमी लोकांनी घेतला. मात्र साथ कमी झाल्यावर लोकांचा ही लसीकरणाचा उत्साह कमी झाला. आजही असे नागरिक आहेत की, ज्यांनी पहिला डोस ही घेतला नाही, अज्ञान, गैरसमज याने ते आपला धोका वाढवीत आहेतच; परंतु दुसऱ्यांच्या जीवास ही धोका निर्माण करत आहेत अशा व्यक्ती आता आपणच शोधून काढून त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. सध्याच्या कोरोना साथीवर लस घेणे हाच एक प्रभावी इलाज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -