राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : राज्याच्या राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहेत. अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.
अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचे जमत नाही. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरू आहेत, असे खळबळजनक विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते खरेच झाले आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
त्यात आज अजित पवार यांनी आपले सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. ते तिथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. रविवारी रात्री अजित पवार यांनी कामोठेमधल्या एमजीएम रुग्णालयात जाऊन तिथे दाखल असलेल्या श्री सदस्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पण तिथून पुण्याला न जाता अजित पवार थेट मुंबईतल्या आपल्या निवासस्थानी पोहोचले. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे बारामती मध्ये असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे दिल्लीला पोहोचल्याने चर्चेला उधाण आले आहे.
त्यातच भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आले तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश, देव आणि धर्माला मानणारे आले तर त्यांचे स्वागत आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावे लागते, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी या दिग्गज नेत्यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
‘मी आज प्रशासकीय कारणासाठी दिल्लीत आलो आहे, आम्ही कोणत्याही राजकीय कामासाठी दिल्लीत आलेलो नाही. मला अजित पवार यांच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. राजकारणात चर्चा खूप होत असतात, पण याच काही तथ्य नसते. भाजपमध्ये आम्ही प्रत्येक बुथवर पक्षप्रवेश घेत आहोत. हा महिना संपूर्ण पक्ष प्रवेशाचा आहे. आमचा संपूर्ण राज्यभर दौरा सुरू आहे. बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आम्ही पक्ष प्रवेश घेत आहोत. या महिनाभरात अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जात सत्तास्थापन करणार या चर्चेला उधाण आले आहे. अशातच परवा अजित पवार यांनी १५ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे सरकार स्थिर असल्याचे सांगत ‘मविआ’ नेत्यांच्या मनसुब्यांमधील हवाच काढून टाकली. त्यामुळे अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.
दरम्यान अजित पवार हे भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मला वाटत नाही अजित पवार हे भाजपसोबत जातील, मात्र राष्ट्रवादीमधील काही जण भाजपमध्ये जाऊ शकतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई दौऱ्यानिमित्त अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीतील एका मोठा गटाला सत्तेत घेण्यासाठी चर्चा केली असल्याचे देखील वृत्त आहे. अमित शहा हे शनिवारी रात्री मुंबईत दाखल झाले. यानंतर त्यांनी पक्षातील काही खास लोकांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यासाठी शाह यांनी हालचाली सुरू केल्या असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार महाआघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्याचबरोबर अजित पवारांसह राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फुटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी खुलासा केला होता. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचे आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावले जात आहे, असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणाले होते. प्रकाश आंबेडकर यांनी देखील येत्या १५ दिवसांत राज्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले होते.
या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्याकडून राष्ट्रवादीचा एक गट फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून फुटणाऱ्या गटात कोण कोण असेल, त्याचे नेतृत्व कोण करेल तसेच त्यांना सत्तेतील वाटा कशाप्रकारे देता येईल याची चाचपणी अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान केल्याची माहिती आहे. दरम्यान या संदर्भात अधिकृत माहिती नसली तरी या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
२००४ पासून अजित पवारांच्या मनात खदखद
२००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हा हातातोंडाशी आलेली मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने दवडली होती. दरम्यान, २००४ साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चूक होती. कुणालाही मुख्यमंत्री केलं असतं तरी चाललं असतं, असं विधान त्यांनी केलं होतं.
या निवडणुकीत राष्ट्रवादीला ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे यायला हवे होते. परंतु, शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसबरोबर बोलणी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिले आणि त्याबदल्यात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद जास्तीचे घेतले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदाला सुरुवात झाली.
२००९च्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून नाराज
त्यानंतर २००९च्या निवडणुकीत सुद्धा तिकीट वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अंतर्गत मतभेद झाले होते.
भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवण्यावरूनही अजित पवार नाराज होते
अजित पवार यांचे संबंध सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाशी चांगले आहेत. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सहकार्य देण्यात अजित पवार यांना अडचण वाटत होती. सन २००८ मध्ये छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवण्यावरूनही अजित पवार नाराज होते. त्याच प्रमाणे सन २०१० मध्ये अशोक चव्हाण यांनी त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात आल्यानंतर राजीनामा दिला होता.
२०१२ साली अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता.
पार्थच्या पराभवाची सल
लोकसभा निवडणुकीत पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हवे तसे सहकार्य केले नव्हते आणि म्हणूनच पार्थ पवार यांचा पराभव झाला असे मानत अजित पवार नाराज झाले होते. शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध केला होता. यावेळी मतभेदाचा मुद्दा ताणला गेला आणि उघड मतभेद झाला. पुढे पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढले. त्यात ते पराभूत झाले. यावेळीही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद प्रकर्षाने पाहायला मिळाले.
२०१९ मध्ये बंडखोरी करत घेतली पहाटेची शपथ
बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाला साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर घडलेले सर्व नाट्य सर्वांना माहिती आहेच.