मुंबई-पुणे जुन्या हायवेवर शुक्रवारी जो अपघात झाला, तो नेहमीप्रमाणेच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झाला आणि त्यात मुंबईच्या एका संगीत वाद्यवृंदाचे १३ सदस्य अकारण ठार झाले. यात दोष अर्थातच चालकाचा आहेच. त्यांनी बेदरकार वाहन चालवल्यामुळे ही खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळली. या प्रकारचे अपघात बोरघाटात सामान्यपणे नेहमीच घडतात. आतापर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना हायवे यावर झालेल्या शेकडो अपघातांत सेलेब्रिटींसह कित्येक लोक ठार झाले आहेत. अगदी मराठी नाट्य, चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदारपासून ते अभिनेता आनंद अभ्यंकर असे कित्येक सेलेब्रिटी या रस्त्याचे बळी ठरले आहेत.
शुक्रवारचा अपघात असाच बेफाम वेगाने वाहन चालवण्यातून आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटून झाला आहे. पहाटेच्या वेळेस नेहमी असे अपघात घडतात. रात्रीच्या वेळेस वाहन चालवणे जास्तच जिकिरीचे आहे आणि तरीही वाहने चालवण्यापासून दुसरा इलाज नसतो. सावधगिरीने वाहन चालवणे हाच एक त्यावर उपाय आहे. पण अनेक अशी कारणे आहेत की, जी मानवी नियंत्रणात आहेत. पण ती पाळली जात नाहीत. अनेक चालक हे प्रशिक्षित नसतात. बहुतेक चालक हे याच्या त्याच्या हाताखाली काम करून चालक झालेले असतात. त्यांना कसल्याही प्रकारचे रितसर प्रशिक्षण नसते. कित्येक चालकांना रस्त्यावरील वाहन चालवण्यासंबंधी ज्या खुणा दिलेल्या आहेत, त्यांचे अर्थही कित्येकदा ठाऊक नसतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण दिले जाते. काही आकडेवारी नेहमीच सादर केली जाते. त्यानुसार अगदी ताजी आकडेवारी ही गेल्या वर्षीची आहे. त्यानुसार बोरघाटात म्हणजे मुंबई-पुणे हायवेवर पाच महिन्यांत २८ अपघात झाले आणि त्यात १० जण ठार झाले. एक मात्र मान्य केले पाहिजे की, मुंबई-पुणे हायवेचा लोणावळा ते पनवेल दरम्यानचा भाग हा वाहनधारकांसाठी प्रचंड धोकादायक बनला आहे. पोलिसांनी बहुतेक अपघातांसाठी जड वाहनांना जबाबदार धरले आहे. त्याशिवाय या मार्गावर अयोग्य उतार आणि रचनाच चुकीची असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे काही विशिष्ट ठिकाणी चालकाचे त्याची इच्छा नसतानाही वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात घडतात. हे काहीही असले तरीही असे वारंवार अपघात होणे आणि त्यात प्रवाशांचे जीव जाणे हे काही योग्य नाही.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, म्हणून अनेक उपाय योजले आहेत. पण त्यांचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. वाहतूक विभागाने गेल्या वर्षी वाहन सुरक्षा मोहीम आयोजित केली आणि त्यानंतर अपघातांचे प्रमाण ५५ टक्के कमी झाले, असा दावा वाहतूक विभागाने केला होता. त्यात तथ्य असेल. पण रस्त्यावरील अपघातात जेव्हा जीवलगांचे जीव जातात, तेव्हा अशा आकडेवारी आणि दाव्यांचा काही उपयोग नसतो. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोरघाटातील एक विशिष्ट सेक्शन अपघातप्रवण आहे. म्हणजे तेथे रस्त्याची चुकीची रचना आणि वाहनाचा वेग यामुळे चालक वाहनावरील नियंत्रण हरवून बसतो आणि अपघात अपरिहार्यपणे घडतात. शुक्रवारचा अपघात त्याच सेक्शनमध्ये झाला आहे. या सेक्शनमधील रस्त्याचे डिझाईन हे द्रुतगतीने वाहन चालवण्यासाठी सुयोग्य नाही. अपघात घडल्यानंतर उपमुख्यमंत्री चौकशीचे आदेश देतात, मुख्यमंत्री अपघातात बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना मदत जाहीर करतात आणि प्रकरण फाईलबंद होते. हे वर्षानुवर्ष होत आले आहे. यात अद्यापही काही कुणी वेगळा रस्ता धरलेला नाही.
अपघात होऊच नयेत, यासाठी काहीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. केवळ मुंबई-पुणे हायवेच नव्हे तर देशातच सर्वत्र हीच परिस्थिती आहे. वाहतूक विभागाने लोणावळा घाट संपल्यावर पुढील सात किलोमीटरचा पट्टा हा खास अपघातप्रवण म्हणून घोषित केला आहे. रस्त्याचे चुकीचे डिझाईन आणि चालकांचा निष्काळजीपणा ही दोन प्रमुख कारणे वाहतूक विभागाने अभ्यासाअंती सांगितली आहेत. चालकांची मानसिकता अशी असते की घाटात अवघड वळणे असल्याने चालक अत्यंत काळजीपूर्वक वाहने चालवतात. पण घाट संपला की ते आपोआपच बेफिकीर होतात आणि नेमके याच भागात अपघात घडतात. त्यात बोरघाट हा सर्वाधिक भयानक म्हणून ओळखला जातो. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक दावे केले होते. अचानक तपासणी करून बेदरकार वाहन चालवण्याला आळा घालणे हे त्यापैकी एक होते. पण पुढे काहीच झाले नाही. अपघातांवर नियंत्रण राहिले नाही आणि अपघात होतच राहिले आहेत. वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालवण्याबाबत शिक्षित करण्याचे प्रयत्न केले जातात. पण हव्या त्या प्रमाणात ते होत नाहीत. ते जर पुरेशा प्रमाणात झाले तर अपघात अगदीच आटोक्यात येणार नसले तरीही काही प्रमाणात कमी होतील, हे निश्चित आहे. पण वाहतूक विभागही याबाबत फारसा जागृत असल्याचे दिसत नाही. अर्थात रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळेस जास्त अपघात होतात. त्यामुळे वाहतूक विभागातील गणवेषातील व्यक्तीने त्याच वेळेत खबरदार राहून वाहतुकीवर देखरेख केली तर पुष्कळच प्रमाणात अपघात कमी होतील. गेल्या पाच वर्षांत मुंबई-पुणे हायवे असो की मुंबई-गोवा हायवे असो, या रस्त्यावरील अपघातात बळी पडलेल्यांची संख्या मोजली तर आजारांनी किंवा एखाद्या साथीने लोक मृत्यू पावले नाहीत तितके अपघातांत बळी पडले आहेत, असे लक्षात येईल. अपघातांचे हायवे झाले आहेत आणि ती ओळख पुसून टाकण्याची जबाबदारी वाहतूक विभाग आणि वाहनचालक यांच्यावरच आहे.