महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला गालबोट
नवी मुंबई : नवी मुंबईत खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक दुःखद घटना घडली. ज्यात उष्माघातामुळे १२ जणांचा मृत्यू झाला तर २० जणांना रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोकळ्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते.
‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाल्याने सुमारे ५०० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी एमजीएम रुग्णालयात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री यांनी अधिकारी आणि डॉक्टरांकडून याबाबत माहिती घेतली. मंत्री दीपक केसरकर, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे देखील रात्री एमजीएम रुग्णालायत पोहोचले. उष्माघाताचा त्रास होऊ लागलेल्या अनेकांना वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालय तसेच खारघर येथील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे.
नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात रविवारी महाराष्ट्र भूषण हा पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. उन्हाचा तडाखा बसल्याने काही नागरिकांना चक्कर आली.
सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. राज्यात सध्या पारा ४० अंश सेल्सियसच्या वर असल्याने उन्हाच्या तडाख्यात नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान ५०० जणांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. अनेकांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.