- क्राइम: ॲड. रिया करंजकर
रेश्माला कळलं, आपण भावांवर वेड्यागत प्रेम केलं आणि तोच आपल्याला फसवायला निघाला आहे. म्हणून वकिलाच्या सल्ल्याने पुढची कारवाई करायचं ठरवलं.
कलावती व रामजी हे राजकारणात असलेले जोडपे होते. ते राहत असलेल्या एरियामध्ये त्यांची चांगल्यापैकी ओळख आणि संबंध होते. त्यांना तीन मुली व दोन मुलगे अशी अपत्य होती. राजकारणात असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांसाठी काही प्रॉपर्टीही जमा केलेली होती. रामजी यांच्या नावे नवी मुंबईत फ्लॅट होता. सर्व मुलांची लग्न झालेली होती. रामजीचा मोठा मुलगा हा नवी मुंबईत राहत होता आणि रामजी यांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्व व्यवहार कलावती बघायला लागली. दोन नंबरची मुलगी रेश्मा हिला कलावतीने त्यांच्याच एरियामध्ये कमी पैशांमध्ये रूम विकला जात आहे ही माहिती दिली. म्हणून रेश्माच्या नवऱ्याने पैशाची जुळवाजुळव करून रेश्माच्या नावे तो रूम विकत घेतला आणि तो रूम कलावती राहत असलेल्या ठिकाणी असल्यामुळे कलावती त्या रूममध्ये भाडोत्री ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टी बघत होती. त्याचप्रमाणे मुलांच्या नावावर कलावती अनेक बचत गटांमध्ये पैसे जमा करायची. रेश्मा स्वतःचे पैसे आपल्या आईकडे बचत गटाला दर महिन्याला भरायला देत असे. रेश्मा यांनी घेतलेला रूम हा स्लम एरियात असल्यामुळे त्याचा फोटो पास बनवायचा होता. म्हणून रेशमाने ओरिजनल कागदपत्र आपल्या आईकडे दिले व फोटो पासला लागणारी रक्कम एक लाखपर्यंत ही तिने आईला दिली आणि त्याच दरम्यान देशांमध्ये लॉकडाऊन झाला.
कोरोना काळामध्ये कलावती यांचं निधन झालं. साहजिकच आई-वडील गेल्यानंतर प्रॉपर्टीवरून भावंडांमध्ये वाद होऊ लागले. रेश्मा त्या वादात नसायची. कारण आपल्याला काही नकोय, आपला स्वतःचा हक्काचा रूम आहे, असं ती म्हणायची. जे आहे ते आपल्या दोन भावंडांसाठी असू दे असं ती दोन बहिणींना सांगायची. याच प्रॉपर्टीच्या वादामध्ये रेश्माचा मोठा भाऊ गेला. लागोपाठ घरामध्ये दोन व्यक्ती गेल्यामुळे काही गोष्टींकडे रेश्माला लक्ष देता आलं नाही. मग तिच्या लक्षात आलं की, आपल्या रूमचे पेपर आपण आईकडे दिलेले होते. तिने ते पेपर लहान भावाकडून मागितले. पेपर देतो असंच फक्त तो म्हणाला. त्याच दरम्यान भावाच्या बायकोचं डोहाळे जेवण होतं. म्हणून घरामध्ये कार्यक्रम होता. तो काही पेपर घेऊन आला आणि बोलला, यावर तुझी सही कर. तर ती बोलली, ‘बाकीच्यांची सही घेतलीस का?’ तर त्यावर त्याने उत्तर दिले, ‘आधी तू कर. तुला लांब जायचं आहे. मी बाकीच्या बहिणींची सही घेतो.’ रेश्माला वाटलं, प्रॉपर्टीसाठी एनओसीसाठी सह्या घेत असेल म्हणून तिने सही केली. भावासाठी कोणतीही अडचण नको, हा विचार तिच्या मनात होता. तिने पुन्हा एकदा आपल्या घराचे पेपर मागितले. त्याने उत्तर दिलं, तुझं फोटो पास बनवण्यासाठी पेपर बीएमसीकडे दिलेले आहेत. म्हणून तिने भावाला न सांगता घराचे झेरॉक्स पेपर घेऊन बीएमसी गाठली. तिथे गेल्यावर तिला सांगण्यात आलंय की, तुमच्या भावाने ओरिजनल पेपर सबमिट केलेले आहेत, पण त्याचबरोबर त्याने तुम्ही त्याला रूम गिफ्ट डिलीट केलेला आहे. असा पेपरही त्याने दिलेला आहे. म्हणून तिने ते पेपर बघायला मागितले तर त्याच्यामध्ये तिने भावाच्या नावे गिफ्ट डिलीट केलेला पेपर तिला दिसला. पण तिने आपलं रूम भावाच्या नावाने गिफ्ट कशाला करेल, हा प्रश्न तिला पडला व शेवटी तिने सही बघितली, ती सही तिने केलेली नव्हती.
त्याच्यावर लावलेला फोटो हा मोबाइलच्या व्हाॅट्सॲपचा डीपीवरून घेऊन लावलेला होता. म्हणून पुढचे पेपर बघितले, तर त्यामध्ये त्या रूमचं लाईट बिल त्याच्या नावे त्याने केलेलं दिसलं. चार महिने झालेले होते, त्याने लाईट बिल स्वतःच्या नावे केलेले होतं. त्या लक्षात आलं की, त्याने त्या दिवशीची सही घेतलेली होती. ती लाईट बिल नावावर करण्यासाठी घेतलेली होती आणि आपण एनओसी आहे म्हणून सही केली. जे गिफ्ट दिलं होतं, ते नोटरी किंवा नोटरी रजिस्टर केलेलं नव्हतं. त्यांनी बीएमसीला या गोष्टीबद्दल सांगितलं. बीएमसीने पोलीस कम्प्लेंट करायला सांगितली. त्याप्रमाणे ती पोलीस कम्प्लेंट करायला गेली. त्यावेळी तिचा भाऊ पोलिसांना म्हणाला की, हा रूम माझ्या आईने घेतलेला होता पण तिच्या नावे केलेला होता. तिने पोलिसांना सांगितलं की, ‘हा रूम मी विकत घेतलेला होता त्यासाठी पैसे आम्ही दिलेले होते आणि हे सर्वांना माहीत होतं. भावाचं म्हणणं असं होतं की, ते काही मला माहीत नाही, आईने घेऊन दिला मी आता देणार नाही. बाकीच्या बहिणी बोलायला लागल्या, जाऊ दे, भावाला देऊन टाक. रेशमाने सरळ सांगितलं, ‘आईने जर मला दिला असता तर मी तिला त्याला दिला असता. स्वतःच्या कष्टाच्या पैशातून हा घेतलेला आहे तो मी त्याला का देऊ? मी आई आणि वडिलांची कुठली प्रॉपर्टी मागत नाहीये, ती मी त्याला देत आहे. फक्त माझ्या कष्टाचा रूम मला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे.
रेशमाने आई भरत असलेल्या बचत गटाबद्दल पैशांबद्दल विचारलं, कारण बचत गटाचे पासबुकही आईकडेच होते. त्यावरही त्याने तेही पैसे देणार नाही, असं तिला सांगितलं. या सर्व प्रकरणातून रेश्मा कळलं की, आपण आपल्या भावांवर वेड्यागत प्रेम केलं आणि तोच आता आपल्याला फसवायला निघाला आहे. म्हणून वकिलाच्या सल्ल्याने पुढची कारवाई करायचं ठरवलं आणि आता रेश्मा आपल्याच हक्काच्या रूमसाठी भावाच्या विरुद्ध लढा देत आहे. एवढेच म्हणणं आहे की, आई-वडिलांच्या प्रॉपर्टीतील मला काही नको, फक्त माझ्या हक्काचं मला दे. यासाठी ती कायदेशीर लढाई लढत आहे. माझे पेपर मला पाहिजेत. असं तिचं आपल्या भावाकडे म्हणणं आहे. आईला फोटो पास काढण्यासाठी ओरिजिनल पेपर दिले आणि तिथेच भावाने आपला डाव साधला.
(सत्यघटनेवर आधारित)