
ऐकलंत का!: दीपक परब
तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता स्वराज आणि मल्हारचे नाते निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेच्या आगामी भागात अभिनेत्री ऊर्मिला कोठारेची एन्ट्री होणार आहे.
मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे. इतकी वर्षे वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेला स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मल्हारला ही गोष्ट स्वराज सांगू इच्छित असला तरी नियतीच्या मनात मात्र दुसरेच काहीतरी आहे. मल्हारला बाबा अशी हाक मारण्याचा क्षण आयुष्यात येण्यापूर्वीच स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावला आहे.
स्वराज त्याच्या मनातली भावना कशी व्यक्त करणार? हे मालिकेतील पुढील भागांमधून उलगडेल. स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरू असतानाच मालिकेत ऊर्मिला कोठारेची एन्ट्री होणार आहे. ऊर्मिलाने मालिकेत स्वराच्या आईचे म्हणजेच वैदेही हे पात्र साकारले होते. मालिकेत वैदेहीचे गंभीर आजारामुळे निधन झाल्याचे दाखवण्यात आले असले तरी स्वराच्या आठवणींमधून ऊर्मिलाचे दर्शन प्रेक्षकांना होत राहिले. आता ऊर्मिला या मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मंजुळा सातारकर’ असे तिच्या भूमिकेचे नाव असून तिच्या येण्याने मालिकेत नवे वळण येणार आहे.
याआधी ऊर्मिलाला प्रेक्षकांनी ग्लॅमरस रूपात रुपेरी पडद्यावर पाहिले आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतला तिचा अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके असणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील नव्या भूमिकेबद्दल ऊर्मिला म्हणते, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मी वैदेहीची भूमिका साकारली होती. वैदेही या पात्राच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे. मंजुळा ही साताऱ्याची असून त्या भाषेचाही वेगळाच गोडवा आहे. मंजुळा हे पात्र वैदेहीसारखे दिसणारे आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.