Friday, March 28, 2025
Homeदेशयूपीचा गँगस्टर अतिक अहमदची भावासह हत्या

यूपीचा गँगस्टर अतिक अहमदची भावासह हत्या

तीन हल्लेखोरांनी केले आत्मसमर्पण

प्रसारमाध्यमांसमोर लाइव्ह असताना व पोलीस संरक्षण असतानाही गँगस्टर अतिक आणि भाऊ अश्रफवर झाडल्या गोळ्या!

लखनऊ : गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला उत्तर प्रदेशातील गँगस्टर, बाहुबली नेता, माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री ३ अज्ञात हल्लेखोरांनी प्रसारमाध्यमांसमोर गोळ्या झाडून हत्या केली.(atiq ahmad shot dead)
उत्तर प्रदेशातील अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेताना हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
अतिक अहमदचा मुलगा असद याला गुरुवारी स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) पोलीस पथकाने एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. आजच कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
हल्लेखोर त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार करीत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. सन २००५ मधील उमेश पाल हत्येप्रकरणी या दोघांना प्रयागराज येथे आणण्यात आले होते. अतिकवर विविध प्रकारचे सुमारे १०० गुन्हे दाखल होते.
उत्तर प्रदेशातील आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी मुख्य साक्षीदार उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असाद आणि असादचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झासी येथे पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यानंतर शनिवारी अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना उमेश पाल हत्याप्रकरणात पोलीस न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, तिन्ही हल्लेखोर मीडिया पर्सन म्हणून आले होते. लवलेश, सनी आणि अरुण मौर्य अशी त्यांची नावे आहेत. हल्ल्यानंतर तिघांनीही आत्मसमर्पण केले. तिघांचीही पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मानसिंग यांनाही गोळी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हत्येचा तपास त्रिसदस्यीय समिती करणार, १७ पोलीस निलंबित

हल्ल्यानंतर यूपीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी पोहोचले. सीएम योगींनी तातडीने सर्व बड्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले. बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी यांनी तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर १७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
सकाळीच अतिकच्या मुलावर अंत्यसंस्कार
अतिकचा मुलगा असदवर शनिवारी सकाळी १० वाजताच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी असदच्या आजोबांसह मोजक्या २५ नातेवाईकांनाच कब्रस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली होती.
अतिक मुलाच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊ शकला नव्हता. सुपूर्द-ए-खाकदरम्यान कब्रस्तान परिसराची ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आली होती. पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा न्यायदंडाधिकारी अंकुर श्रीवास्तव यांना तपास अधिकारी बनवण्यात आले आहे. आदेशात म्हटले आहे की, कुणीही व्यक्ती एन्काऊंटरविषयीचे पुरावे ३ दिवसांत देऊ शकतो.

मुलाच्या एन्काउंटरनंतर अतीकने पोलिसांना दिलेली जेलमधून सुटल्यावर बघण्याची धमकी

अतीक अहमद याच्या मुलाचा असद अहमदचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊन्टरमध्ये खात्मा केला. त्याच्या एन्काऊन्टरनंतर पोलिसांनी अतीकची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने या पोलिसांनाच धमकी दिली होती. ज्यांनी माझ्या मुलाला मारला त्यांना जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी दाखवतो. मिशा पिळत अतीक अहमदने ही धमकी दिली.
राजू पाल हत्याकांडातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या उमेश पाल याच्या हत्येचा कट आपणच रचल्याचे अतीक अहमद याने मान्य केले. तुरुंगात बसूनच आपण हा कट रचल्याचे त्याने म्हटले. आपण आपली बायको शाईस्ता हिला नवा मोबाईल आणि नवे सिम कार्ड घेण्यासही सांगितल्याचे त्याने मान्य केले. उमेश पालवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि पहिले अंगरक्षकाला ठार मारायचं आणि नंतर उमेश पालची हत्या करायची हे ठरलं होतं असं अतीकने सांगितलं आहे.
देशभरात गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असदचे पुणे कनेक्शन उघडकीस आले आहे. गुरुवारी त्याचा आणि साथीदाराचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. मात्र तत्पूर्वी दीड महिने दोघेही पसार असताना त्यांना पुणे आणि नाशिकमध्ये काही दिवस राहण्यासाठी गुंड अबू सालेम याच्या शार्पशूटर्सनी मदत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुणे पोलिसांकडूनही खातरजमा करण्यात येत आहे.

असद, गुलाम पुण्यात राहिले होते

पोलिसांपासून वाचण्यासाठी गँगस्टर असद आणि गुलाम दोघेही कानपूर, नोएडा, दिल्लीत राहिले. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अतिक अहमदने मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलामची गुंड अबू सालेमच्या साथीदारांच्या मदतीने नाशिक आणि पुण्यात वास्तव्याची सोय केली. अबू सालेम आणि अतिक यांची जुनी मैत्री असल्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गँगस्टर असद आणि गुलाम दोघेही पुण्यात राहिल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून विविध स्तरावर माहिती गोळा केली जात आहे. दोघेही गँगस्टर पुण्यात नेमके कुठे राहिले, त्यांना पुण्यात राहण्यास कोणी मदत केली, गँगस्टर आणि गुंड अबू सालेम यांच्या साथीदारांचे नेमके कनेक्शन काय आहे याची माहिती पुणे पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -