-
दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आदिवासी महिलांच्या समस्या तिने पाहिल्या; जाणून घेतल्या, तेव्हा तिला उमगलं की, या ठिकाणी कुपोषण, निरक्षरता याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल, तर या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे. तिने आपल्या संस्थेद्वारे या आदिवासी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनास बाजारपेठ मिळवून दिली. आज पालघर येथील आदिवासी समाजातील या महिला स्वतः उद्योजिका बनल्या आहेत. येथील कुपोषण आणि निरक्षरतेचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. पालघर येथील आदिवासी महिलांच्या विकासामध्ये एका महिलेचा मोलाचा वाटा आहे. ती महिला म्हणजे सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या संचालिका राजकुमारी गुप्ता.
मुंबई शहरामधल्या भांडुप येथील मध्यमवर्गीय कुटुंबात राजकुमारीचा जन्म झाला. सरकारी शाळेत शालेय शिक्षण झाले. बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर वयाच्या १९व्या वर्षी व्यावसायिक प्रदीप गुप्ता यांच्यासोबत राजकुमारीचा विवाह झाला. शिक्षणाची आवड असल्याने लग्नानंतर शिक्षण घेत ती पदवीधर झाली. सेवा विवेक सामजिक संस्थेच्या संचालिका म्हणून सध्या ती काम पाहत आहे. सेवा विवेक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पासून पालघर जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचे काम करत आहे. पालघर जिल्ह्यात बांबूची असलेली उपलब्धता पाहता संस्थेने पालघर जिल्ह्यातील महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचे ठरवले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री होईल याची काळजी संस्था घेते यातूनच महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे.
बांबू हस्तकलेतून रोजगार व सक्षमीकरण या कामाची सुरुवात करताना राजकुमारीला संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला पालघर जिल्ह्यातील खेड्यापाड्यांत फिरावे लागले. तेथील आदिवासी समाजातील महिलांना बांबू हस्तकला व त्यातून मिळणारा रोजगार याचे महत्त्व पटवून द्यावे लागले. थोड्या-थोड्या महिला जमा करत संस्थेने प्रशिक्षण वर्गांची सुरुवात केली. आदिवासी समाजातील महिला थोड्या बंधनात होत्या. त्यांना घराबाहेर आणणे, प्रशिक्षण वर्गात सामावून घेणे हे सर्व आव्हानात्मक होते. हे आव्हान राजकुमारी गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेलले. आता येथील परिस्थिती बदलली आहे. आजमितीस संस्थेने जवळपास २०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना पाहून आदिवासी समाजातील इतर महिलाही आता स्वतःहून संस्थेकडे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
आज संस्थेच्या महिला बांबू हस्तकलेपासून जवळपास ४१ उत्पादने वा वस्तू बनवत आहेत. विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, सेवा विवेक सामाजिक संस्था कोणत्याही प्रकारचे दान वा देणगी न घेता हे काम करत आहे. त्यामुळेच शासनाकडून संस्थेला कोणत्याही प्रकारच्या दान व देणगीची अपेक्षा नाही. मात्र शासनाने या महिलांनी बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसार कार्यात मदत करावी, एवढीच माफक अपेक्षा आहे. या महिलांना रोजगार मिळाला, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर पालघरमधील कुपोषण, निरक्षरतासारख्या समस्या दूर होतील, असे राजकुमारी गुप्ता यांना वाटते.
‘जेव्हा आमच्याकडे एखादी नवीन महिला येते, तेव्हा तिचा चेहरा चिंताग्रस्त असतो. पण जेव्हा ती तिचे रोजगार प्रशिक्षण पूर्ण करते, तिच्यात आत्मविश्वास वाढतो. त्यावेळेस तिचा हसतमुख चेहरा पाहणे माझ्यासाठी अविस्मणीय क्षण असतो.’ असे राजकुमारी प्रांजळपणे नमूद करतात. राजकुमारी गुप्ता यांनी पालघर जिल्हातील ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिला तसेच घरच्या घरी पापड, लोणची तसेच इतर सणवारासाठी पदार्थ बनवणाऱ्या महिलांसाठी सेवा विवेक सामाजिक संस्थेमध्ये ग्रामीण मॉलची स्थापना केली आहे. तिथे या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळाली, त्या आपले उत्पादन विकू शकत आहेत. त्यातून त्यांना रोजगार मिळत आहे. सेवा विवेक सामाजिक संस्थेचा प्रकल्प हा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असल्याने संस्थेच्या उपाहारगृहात बरेच प्रवासी थांबतात. त्यावेळी हे प्रवासी या ग्रामीण मॉलला भेट देतात आणि खरेदी करतात यातून बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळत आहे. त्या महिलांचे सक्षमीकरण होत आहे.
‘आज आमचं २००-२५० महिलांचं कुटुंब आहे. त्या सर्वांची काळजी घेणे, त्यांची बॉस म्हणून नव्हे, तर सखी म्हणून त्यांची सुख-दुःख समजून घेणे, काम करताना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, या महिला जास्त शिकलेल्या नसल्यामुळे त्यांना पैसे बचत करणे, मुलाचे शिक्षण पूर्ण करणे याविषयी मार्गदर्शन करते. तसेच महिलांना सामजिक जाण असावी म्हणून आम्ही महिलांसाठी संस्कार वर्ग, संविधान अभ्यास वर्ग असे उपक्रम राबवतो. आपण सर्वांना एकच विनंती आहे, आपण सर्वांनी आमच्या संस्थेच्या महिलांनी बांबू हस्तकलापासून तयार केलेले उत्पादन खरेदी करावे तसेच संस्थेचे बांबू सेवक बनावे. महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. महिला सक्षमीकरणास आपलादेखील हातभार लागेल.’ अशी आवाहनवजा विनंती राजकुमारी गुप्ता करतात.
जी महिला सभोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करते. स्वतःसोबत इतरांचादेखील उत्कर्ष करते ती खरी ‘लेडी बॉस’ लेडी बॉसच्या या व्याख्येत राजकुमारी गुप्ता चपखल बसतात.