- लक्षवेध: प्रा. दीक्षा पेरवी
जगभरात आज करोडो समर्थ सेवक आप्पासाहेबांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे दारू, व्यसन, अंधश्रद्धेच्या पाशातून बाहेर पडून सुखी जीवन जगत आहेत. एकदा का जनसागर जमा
झाला की, तिथे राजकीय राबता असतोच असतो.
आदरणीय डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण २०२२ हा पुरस्कार देण्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथे येऊन जाहीर केले होते आणि आज करोडो दासभक्तांच्या उपस्थितीत मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान होत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे हृदयस्पर्शी खूप खूप आभार…
खरं तर कोणतीही गोष्ट समाजात रुजवताना, मनुष्याने बनवलेल्या समाजातील चुकीच्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा समूळ नष्ट करून प्रत्येक नागरिकांच्या मनात देशाभिमान रुजवणे आणि समाजाची विस्कटलेली घडी सावरायची असेल, तर हे काम काही एका रात्रीत होत नाही, तर त्यासाठी अनेक वर्षं, अनेक पिढ्या जाव्या लागतात तेव्हा कुठे समाजात परिवर्तन होतं.
आप्पासाहेबांना समाजप्रबोधनाचा हा वारसा त्यांचे वडील महाराष्ट्र भूषण, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळाला, पण त्यांनी नुसता वारसा घेतला नाही, तर ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या उक्तीप्रमाणे समाजप्रबोधनाचे हे कार्य कोणतीही अपेक्षा न करता, कोणतीही जाहिरात/गाजावाजा न करता अविरतपणे सुरू ठेवले आणि मनुष्याला भावनेच्या भक्तीपेक्षा कर्तव्याची भक्ती श्रेष्ठ आहे, हे
पटवून कर्तव्यात उभे करून मनुष्यात देशाभिमान पण जागृत केला आहे.
आप्पासाहेब म्हणतात की, देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो हा विचार करणे ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आप्पासाहेब नेहमी म्हणतात की,
जन्मा जायते अज्ञान:
संस्कारे ज्ञान उच्यते
मनुष्य ८४ लक्ष योनिंमध्ये जरी सर्व श्रेष्ठ असला तरी त्याला सर्व गोष्टी जन्मापासून शिकवाव्या लागतात आणि जर योग्य शिकवण मिळाली नाही, तर मनुष्य हा मनुष्य असून राक्षसासारखा वागायला लागतो आणि अशी अनेक उदाहरणे आपण रोजच्या जगात बघतोच, म्हणून लहान वयातच जर चांगले संस्कार घडवले गेले तर येणारी पिढी ही सदाचरणी, जाज्वल्य देशाभिमान असणारी निर्माण करू शकतो म्हणून बालभक्ती मार्गदर्शन सुरू केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला घडविण्यासाठी, समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली बैठक हीच केंद्रस्थानी ठेवून डॉ. आप्पासाहेबांनी एक उत्तम नागरिक, एक उत्तम समाज घडविण्याचे आकाशाला गवसणी घालणारे महान कार्य आज खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे, यात तीळमात्र शंका नाही. वास्तविक कोणतीही नवीन गोष्ट, नवीन सुरुवात करताना प्रचलित रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि नवीन विचार यांच्यात घर्षण होतेच आणि अशा कार्याला विरोध हा होतोच होतो. त्याचप्रमाणे आप्पासाहेबांनाही अशा विरोधाला अनेक वेळा सामोरे जायला लागलं आहे. पण, आज अशी परिस्थिती आहे की, त्यावेळी चुकीच्या मानसिकतेतून विरोध करणारेच आज बैठकीच्या माध्यमातून स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून उत्तम सुख उपभोगीत आहेत. पण आजपर्यंत आप्पासाहेबांनी समाजाने दिलेल्या त्रासाबद्दल, विरोधाबद्दल कधीही, कोणाजवळही साधा उल्लेखही न करता, त्याचे अवडंबर न करता आपले समाजप्रबोधनाचे कार्य पुढे सुरूच ठेवले आहे. यातच त्यांच्या क्षमाशील व नम्र व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते.
नानासाहेबांनी १९४३ साली पेरलेल्या या समाजप्रबोधनाच्या रोपाची जोपासना अपार मेहनत घेऊन, त्रास झेलून आप्पासाहेबांनी केली आणि त्याची परिणिती म्हणजे आज उत्तम कर्माची शिकवण देणारे, उत्तम मनुष्य घडवणारे, उत्तम नागरिक बनवणारे, मनुष्याला निर्व्यसनी बनवणारे आभाळाएवढे कार्य आपल्याला बघायला मिळत आहे. रायगडमध्ये हातांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या व्यक्तींना घेऊन सुरू झालेलं हे कार्य आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार पोहोचले आहे. या बैठकीच्या माध्यमातून लाखो लोकांना अवगुणापासून, व्यसनाधीनतेपासून, दुःखापासून दूर करून त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखी आणि समाधानी केले आहे. आप्पासाहेब नेहमी सांगतात की, मनुष्य हा एकटा असला आणि बाहेरून शांत दिसला तरी आतून तो एकटा नसतो. काम, क्रोध, मद, मत्सर, संशय आणि चिंता या षड्रिपूंना सोबत घेऊनच असतो. म्हणून मनुष्य आतून शांत झाला की, त्याच्यात बदल होतो. बैठकींच्या माध्यमातून, श्रवणातूनच मनुष्य एकदा का आतून शांत झाला की, बाहेरचा गोंधळ बंद होतो. तसेच आज-काल आत्महत्येंचं वाढलेलं प्रमाण बघितल्यावर आप्पासाहेब म्हणतात की, मनुष्य संसार प्रपंचात येणाऱ्या प्रसंगामुळे खचून जातो, अशावेळी विवेक नष्ट होऊन माणसाची सद्सदविवेकबुद्धी काम करेनाशी होते आणि वरवर शांत दिसणारा माणूस आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलतो. अशा संकटांनी गांजून गेलेल्या लाखो लोकांना बैठकीतून मिळणाऱ्या निरूपणातून योग्य मार्गदर्शन देऊन असा टोकाचा निर्णय घेण्यापासून परावृत्त केले आहे आणि अशा मनानी खचलेल्या व्यक्तींना आत्मस्थिती देऊन आलेल्या प्रसंगात विश्वासाने उभे करण्याचे सर्वात महान कार्यही करीत आहेत. महान कार्य यासाठी की, मनुष्य जन्म हा अतिशय दुर्मीळ आहे आणि हा जन्म मिळाल्यावर आपला जन्म नेमका कशासाठी झाला आहे, त्यामागील परमेश्वराचे काय प्रयोजन आहे, याची जाणीव नसल्यामुळे केवळ भौतिक सुखात रममाण होतो आणि छोटेसे प्रसंग आले तरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. आप्पासाहेब म्हणतात की, जगात कोणत्याही जाती-पातीपेक्षा आणि कोणत्याही धर्मापेक्षा मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्मच सर्वश्रेष्ठ आहे.
बरेच लोक हे देव कोपेल या भावनेने, केवळ भीतीने किंवा आजोबा-पणजोबा करतात म्हणून देवाची भक्ती करतात. पण आप्पासाहेब सांगतात की, अरे देव तर मनुष्याला कायम देत असतो, त्याला काहीही द्यावे लागत नाही. उलट देव भावाचा भुकेला असतो. म्हणून देवाबद्दल भीती न बाळगता वर्तमानात उत्तमच कार्य केलं की, भविष्याची चिंता करायची वेळ येत नाही म्हणून मी स्वतः उत्तमच कार्य करतो आणि तुम्ही पण उत्तमच कार्य करा. आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणे स्वतः कर्तव्यात उभे राहून एखाद्या दीपस्तंभासारखे आयुष्याचा रस्ता चुकलेल्यांना अखंड मार्गदर्शन करत उभे आहेत.
जगभरात आज करोडो समर्थ सेवक आप्पासाहेबांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे दारू, व्यसन आणि अंधश्रद्धेच्या पाशातून बैठकीच्या माध्यमातून बाहेर पडून सुखी जीवन जगत आहेत. एकदा का जनसागर जमा झाला की, तिथे राजकीय राबता असतोच असतो. पण आप्पासाहेब कायम समर्थ रामदास स्वामींच्या
‘पहिले ते हरिकथा निरूपण I
दुसरे ते राजकारण II’ या ओवीप्रमाणेच स्वतः राजकारणापासून कायमच दूर राहिले आणि आपल्या समाजप्रबोधनाच्या कार्यातही राजकारणाला स्थान दिले नाही. आज ह्या बहुआयामी कार्यात त्यांना तोलामोलाची साथ त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारीही देत आहेत आणि फक्त दासबोधावरील होणाऱ्या निरूपणाच्या पलीकडे जाऊन अनेक अविश्वसनीय उपक्रम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाच्या माध्यमातून सुरू केले आहेत. आदरणीय पद्मश्री, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि त्यांच्या या अफाट कार्याला माझे कोटी कोटी नमस्कार, त्यांना आज करोडो दासभक्तांच्या उपस्थितीत व केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान होत असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्र शासनाचे हृदयस्पर्शी आभार. तसेच त्यांना उत्तम आयुआरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.