लखनऊ: अतिक आणि अश्रफ यांच्या शवविच्छेदन प्रक्रियेची संपूर्ण व्हिडिओग्राफीही केली जाणार असून पाच डॉक्टरांचे पॅनेल शवविच्छेदन करणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जेथे शवविच्छेदन होत आहे तेथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अतिक-अश्रफ यांच्या हत्येनंतर, प्रयागराजमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी डीजीपी मुख्यालयाकडून पाच आयपीएस अधिकाऱ्यांना प्रयागराजला पाठवले जात आहे. पोलीस महासंचालक राजकुमार विश्वकर्मा अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतील.
सध्या अटकेत असलेले तिघेही आरोपी लवलेश तिवारी, अरुणकुमार मौर्य आणि सनी यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळत नसून त्यांनी अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचे कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. या तिघांनाही पोलीस आजच न्यायालयात हजर करणार आहेत आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मुख्य आरोपी अरुण मौर्य हा पानिपतमध्ये आपल्या वडिलांसोबत राहत होता. तो विकास नगर येथील एका कारखान्यात वॉचमेन असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कानपूर पोलिसांनी कोणत्याही ग्रुपमध्ये किंवा सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणाऱ्या बातम्या किंवा संवेदनशील पोस्ट टाकू नयेत अथवा, फॉरवर्ड करू नयेत असे आवाहन केले आहे. अफवा पसरवणाऱ्या आणि प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.