Sunday, July 6, 2025

उधळण ऋतुरंगांची...

उधळण ऋतुरंगांची...

  • दृष्टिक्षेप : अनघा निकम-मगदूम


खरं तर आपली रंगपंचमी मागच्याच महिन्यात होऊन गेली आहे. रंगांचा हा उत्सव आपण साजरा केला आहे. पण आता निसर्गाची रंगपंचमी सुरू झाली आहे. वसंत ऋतूतील या रंगपंचमीने परिसरात विविध रंगांची उधळण सुरू केली आहे आणि त्याचे माध्यम आहे रंगीबेरंगी फुले, पाने... बहरलेली झाडे, फळांनी लगडलेले वृक्ष... त्याच्या जोडीला फळा-फुलांचा घमघमाट, पक्ष्यांचा किलबिलाट... सगळं खूपच सुंदर आणि प्रसन्न! तसंही वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा! निसर्ग या दिवसांत इतका खुललेला असतो, सजलेला असतो की त्यालाही या ऋतूचे अप्रूप आहे की काय? असे वाटते.


वसंत ऋतूच्या प्रेमात अगदी सूर्यनारायणसुद्धा असतो बहुदा. म्हणूनच वर्षातील सर्वाधिक काळ तो या दिवसांमध्ये घालवतो, प्रखरतो, वसंत ऋतूला सुरुवात झाली की, उन्हाचा पारा म्हणूनच चढत जातो. पण यातच रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा, फळांचा बहर सुरू होतो नव्हे, हा बहर सुरू झाला सुद्धा आहे.


चैत्राने आगमनाची चाहूल दिली की, ऋतू अंगोपांगी बहरतो, उमलतो. याच काळात जंगलात विविध प्रकारची फुले, फळे बहरून येतात. चैत्रात झाडांना पालवी फुटली असून या पालवीतच बहावा, निवडुंग, गुलमोहर, पळस, चाफा, सावर अशा झाडांची फुले तर आंबा, काजू, फणस, बोरे, टेंभुर्णी इत्यादी रान फळांची झाडे बहरली आहेत. वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा, फळांचा बहर आला आहे. त्यामुळे परिसरसुद्धा आल्हाददायी झाला आहे. उन्हाळा जसजसा कडक होऊ लागला आहे, तशा या पानां-फुलांमुळे मात्र त्यात जगणं सुसह्य झालं आहे.


कुठे बहावा डोकावतोय, गुलमोहोर नवे धुमारे घेऊन लाल रंगाने बहरण्यासाठी आतुरला आहे. कोकणात तर निसर्गाचा उत्सव सुरू झाला आहे. सह्याद्रीच्या कडे-कपारीत, रस्त्यांच्या दुतर्फा, शेत शिवारात असंख्य प्रकारच्या फळ, फुल झाडांना पालवी बरोबरच फुलांचे गुच्छ, फळे आली आहेत. रानावनात फुलणाऱ्या उन्हाळी रान-फुलांनी, फळांनी निसर्ग उन्हाळ्यातही आपली शोभा कायम आहे. बहावा, निवडुंग, गुलमोहर, पळस, चाफा, सावर या झाडांनी आपापली कामे चोख बजावली आहेत.


एकीकडे हे नेत्रसुख, तर दुसरीकडे चविष्ट फळांचा आहार. आंबा, काजू, फणस, बोरे, टेंभुर्णी, करवंद, अटूर्णी, कोकम, रांजण, जांभूळ, अशी कितीतरी फळे जिथे मिळेल तिथे वाढतं आहेत, रानमेवा खाण्यासाठी उपलब्ध झाला आहे. कोकणात नेहमी चर्चा अंबा आणि काजूची होते. पण त्याहीसोबत फणस, बोर, जांभूळ, करवंद अशी अनेक तोंडाला पाणी सुटणारी फळे सुद्धा झाडाला लागलेली आहेत.
हीच फळे पावसाळ्याच्या बेगमीसाठी उपयोगी पडतात. लोणची, पापड तयार होतात. सरबते होतात. कोकम, आगळ होते. किती भरभरून हा निसर्ग देतो. आयुष्य जगण्याचं बळ देतोय, उर्मी देतोय, अडचणींवर कशी मात करायची? याचा जणू धडा शिकवतोय.

Comments
Add Comment