नवी मुंबई: राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव केला. आज नवी मुंबईत निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढला आहे. महासागरासमोर काय बोलावं कळत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर श्री परिवारातील सदस्य म्हणून बोलतोय. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी अमित शाह यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
धर्माधिकारी कुटुंबियांनी कायमच भरकटलेल्या माणसांना मार्ग दाखवला आहे. ते एक दिपस्तंभ असून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.