-
ऐकलंत का!: दीपक परब
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे सध्या पाइपलाइनमध्ये आहेत. त्यातलाच ‘डंकी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून आता या सिनेमासंदर्भात सांगायची गोष्ट म्हणजे या सिनेमात किंग खान आर्मी
ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रेड सी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शाहरुख खानने स्वत:च ही माहिती दिली होती. ‘डंकी’ या सिनेमाचे कथानक अशा लोकांवर आधारित आहे ज्यांना घरी येण्याची इच्छा आहे’. या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. याआधी शाहरुख खान ‘फौजी’,‘मैं हूं ना’ आणि ‘जब तक है जान’ या सिनेमांमध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. ‘जिओ स्टुडिओज’ने नुकतीच १०० सिनेमांची घोषणा केली आहे. यात शाहरुखच्या ‘डंकी’ या सिनेमाचादेखील समावेश आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा डिसेंब २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘पठाण’ची रेकॉर्डब्रेक कमाई…
शाहरुख खानच्या ‘पठाण’ या सिनेमाने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी त्याने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमाने जगभरात एक हजार कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
शाहरुखने चार वर्षांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले असले तरी त्याच्यासाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरले आहे. या वर्षात त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ‘पठाण’नंतर त्याचा ‘जवान’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून या सिनेमात शाहरुखसह दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.