अहमदाबाद (वृत्तसंस्था) : संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने गुजरातवर तीन विकेट राखून दमदार विजय मिळवला. गुजरातच्या संघाने राजस्थानपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण संजू सॅमसनने ६० धावांची तुफानी खेळी साकारत संघाला विजयासमीप पोहोचवले होते.
त्यानंतर शिमरॉन हेटमायरने राजस्थावची खिंड लढवली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारित २० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारली. मात्र राजस्थानने ७ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा करीत हे लक्ष्य पार केले आणि हा सामना तीन विकेटआणि चार चेंडू राखत जिंकला.
अखेरच्या षटकात डेविड मिलर याने ४६ तर अभिनव मनोहर याने २७ धावांची महत्वाची खेळी केली. राजस्थानला विजयासाठी १७८ धावाची गरज होती. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. वृद्धीमान साहा पहिल्याच षटकात बाद झाला. ट्रेंट बोल्ट याने साहा याचा अडथळा दूर केला. त्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.