एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ

  1447



  • प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ



...तर आपण छोटे-छोटे आनंद अनुभवू या. हे छोटे-छोटे आनंद जरी आपण एकमेकांना देऊ शकलो तरी तेही मोठे सामाजिक कामच आहे.

मी तेव्हा दहावीत होते. माझी एक मैत्रीण माझ्याकडे नोट्स मागायला आली. मला ते द्यायचे नव्हते कारण खूप मेहनत घेऊन मी ते तयार केलेले होते. कुठेतरी अहंभाव होताच. इतक्यात रेडिओवर गाणे सुरू झाले -
एक एहसान कर, एहसान कर
एक एहसान कर, अपने मेहमान पर
अपने मेहमान पर, एक एहसान कर
दे दुआएँ, दे दुआएँ, तुझे उम्र भर के लिये
दे दुआएँ तुझे उम्र भर के लिये...
कधी कधी मला प्रचंड आश्चर्य वाटते की, नेमकेपणाने ही गाणी कशी काय वाजतात? म्हणजे कोणती तरी एखादी शक्ती हे संपूर्ण जग चालवते की काय? आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते सांगण्यासाठी अशा गाण्यांची निर्मिती झाली आहे का? आणि झाली असेल तर घडणारी घटना पाहून ती गाणी त्या जागी बरोबर कशी बरे वाजतात? असो!


केवळ या गाण्याचे बोल ऐकून मी ताबडतोब नोट्स काढून तिला दिल्या. तिचे त्या गाण्याकडे लक्षही नसेल. तिने कदाचित या गाण्यांच्या ओळींमुळे मी तिला नोट्स दिले, हे लक्षात येणेसुद्धा असंभव. पण, प्रत्येक वेळेस कोणते तरी गाणे वाजल्यावर आपल्याला त्या व्यक्तीला मदत करण्याची गरज आहे का? मी जर का ऑफिसमधून दमून आले. स्वतःसाठी चहा घेऊन हॉलमध्ये येऊन बसल्यावर समोर सासुबाई वाटाणे निवडत बसल्या होत्या. मी चहा पिता-पिता त्यांच्याबरोबर वाटाणे निवडू लागले. चहा पिणे आणि वाटाणे निवडणे हे एकत्रितपणे करणे सहज सोपे होते ते मी केले. एका दिवशी मी मेथी निवडत होते आणि सासुबाई नाम जपत होत्या. त्यांनी पाहिले की मेथीची जुडी खूपच मोठी आहे. त्या नाम जपता जपता माझ्याबरोबर मेथी निवडू लागल्या. सासऱ्यांनी दुपारी चहा करता करता फ्रीजमधल्या पाण्याच्या बाटल्या भरून टाकल्या. तर मी ऑफिसमधून येता-येता रस्त्यात रिक्षा थांबवून सासऱ्यांसाठी त्यांच्या संपलेल्या बीपीच्या गोळ्या विकत आणल्या.


ही दोन उदाहरणे मी सहज सुचली म्हणून दिली. इथे कोणीही कोणालाही मदत नसती केली तरी चालण्यासारखे होते, पण मदत केल्यामुळे काम लवकर सहज झाली तसेच जो आनंद सगळ्यांना मिळाला तो शब्दांत मांडण्यासारखे नाही. कधी कधी एखाद्याला सरळ हातभार लावून मदत करणे शक्य नसते. अशा वेळेस आपला मौलिक वेळ देऊन त्याला फक्त फोन केला तरी सुद्धा ते पुरेसे असते. ‘मी तुझ्यासोबत आहे.’ ‘तू केव्हाही मला फोन करू शकतोस.’ ‘कोणतीही मदत लागली तर मी आहे.’ ‘बस! असे काही शब्द. खूपदा समोरचा माणूस कोणतीही मदत घेत नाही; परंतु मित्रत्वाचे, प्रेमाचे, विश्वास देणारे हे शब्द संकटात असणाऱ्या माणसाला, आजारी असणाऱ्या माणसाला आणि तणावग्रस्त माणसाला किती सहजपणे बाहेर काढतो.


‘परिस्थिती खूप वाईट आहे’ असे पिढ्या आणि पिढ्या आपण ऐकत आलो आहोत. या वाईट परिस्थितीमध्ये आपण अजूनच भर घालत जातो. म्हणजे काय? तर आपणच एकमेकांशी बोलताना ‘काय चाललंय?’, ‘कसं होणार?’, ‘काहीच खरं नाही.’ असेच काहीतरी एकमेकांशी बोलत राहतो त्याऐवजी ‘मी हे चांगले पुस्तक वाचले तू ही वाच.’, ‘बघ ना हे जुने गाणे किती छान प्रकारे चित्रित केले आहे. बघून घे,’ ‘अरे/अगं संध्याकाळी चल, तर माझ्याबरोबर फिरायला. हळूहळू चालूया. गप्पा मारता मारता दोन-तीन फेऱ्या होतील. चालून पाय दुखले तर बसू शकतो कुठेही...’ असे सांगितले तर कोणीतरी आपल्याला चालताना सोबतही करेल आणि त्या माणसाला चालायला प्रवृत्त केल्यामुळे त्याची प्रकृती ठीक होईल आणि आपण नसतानाही आत्मविश्वासाने तो चार पावले निश्चितच चालू शकेल.


किती लहान-लहान आणि सरळ साध्या असतात गोष्टी. आपण स्वतःच त्याला कठीण करून ठेवतो. शारीरिक प्रकृतीमुळे फार प्रवास न करणारी व्यक्ती असेल तर शेजारपाजारच्या घरातल्या लोकांनी त्यांना चहाला बोलवावे. फार काही शक्य नसेल तरी चहासोबत दोन बिस्किटे समोर ठेवावी. त्या माणसालाही घराबाहेर पडल्याचा आनंद मिळू शकतो आणि आपल्यालाही शेजारधर्म निभावल्याचा आनंद मिळतो.


सर्वांनाच आपल्या नातेवाइकांना आणि मित्रमंडळींना बोलावून सण, समारंभ, वाढदिवस साजरे करायला आवडतात. हो... अलीकडे त्याला ‘पार्टी’ म्हणतात. अशा वेळेस आपण अनेकविध पदार्थ बनवतो. काही पदार्थ हॉटेलमध्ये नाही मागवत; परंतु आपल्या घरी छोट्या-मोठ्या कामासाठी आलेला इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबर असेल, कारपेंटर असेल तर आपण तितक्याच आनंदाने त्याला चहा किंवा चहा सोबत खाण्याचा एखादा छोटासा पदार्थ देतो का? आता तुम्ही म्हणाल, त्याच्या कामाचे पैसे देतो. कामाचे पैसे देणे वेगळे आणि त्याला चहा देऊन त्यासोबत काहीतरी खायला देणे वेगळे. मेहनतीचे काम केल्यावर त्याला मिळणारा हा क्षण त्याला कितीतरी आनंद देऊन जातो आणि त्याच्याकडे पाहताना आपल्याला मिळणारा आनंद त्यापेक्षा कितीतरी पट मोठा असतो.


तर आपण छोटे-छोटे आनंद अनुभवू या. हे छोटे-छोटे आनंद जरी आपण एकमेकांना देऊ शकलो तरी तेही मोठे सामाजिक कामच आहे.


एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ


हे जरी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेले वाचता येण्याइतके आपण सुशिक्षित नसलो तरी ते अमलात आणण्याइतके सुसंस्कृत बनूया!


pratibha.saraph@gmail.com

Comments
Add Comment

सस्पेंशन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आपण सर्वच दानधर्म करतो; परंतु आपले दानधर्म हे खूपदा उघड असते म्हणजे आपण काहीतरी

ताणतणाव व्यवस्थापन

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर प्रत्येक माणसाला आपल्या मूलभूत आणि इतर गरजा भागविण्यासाठी प्रयत्नशील

नौदलात थेट भरती

करिअर : सुरेश वांदिले भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी. टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत

‘वंदे भारत‌’मुळे नव्या काश्मीरची उभारणी

विशेष : प्रा. सुखदेव बखळे कतरा ते श्रीनगर या ‌‘वंदे भारत एक्स्प्रेस‌’ला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ

मुले मोठी होताना...

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजर्सना वाढवणं जेवढं कठीण तेवढेच टीनएजर होणंही अवघड. असं का बरं? कारण आपल्या

आषाढ घन

माेरपीस : पूजा काळे किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो... खुल्या चांदण्याची