-
स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
मागील पिढीच्या पुरुष वर्गापेक्षा नव्या पिढीचा पुरुष वर्ग इथे बदललेला पाहिला. पुरुष वर्गाने पिढीजात व्यवसायाची जबाबदारी पार पाडत घरच्या स्त्रीला नोकरीसाठी उद्युक्त केले आणि खऱ्या अर्थाने घरातील गृहिणी ही उंबरठ्याबाहेर पडली.
अनेकवेळा असं होतं की, मुलींचं कौतुक आणि सुनांना शिस्तीचे धडे दिले जातात. आपले रितीरिवाज शिकवले जातात, कसं वागावं, रूळावं सांगितलं जातं. कारण मुली आपल्या आणि सुना
दुसऱ्या घरातून आलेल्या असतात म्हणून असेल कदाचित.
पण, एक अनुभव काहीसा वेगळा होता. घराचा उंबरठा हा पूर्वजांनी राखलेला, त्या उंबरठ्याच्या आत वावरणारी स्त्री बाहेर पडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जिथे सुनांनी उंबरठ्यावरही उभं राहू नये असं वातावरण असताना मुलींनाही तीच वागणूक मिळू लागली. शिस्तीचा एक प्रवास अनुभवताना आज कितीही स्वातंत्र्य असलं तरी त्या अंगवळणी पडलेल्या काही गोष्टी पुसता पुसल्या जात नाहीत. जिथे स्त्रियांनी केवळ आणि केवळ घर सांभाळावं हा अट्टहास बाळगलेला होता, त्यांच्या पुढच्या पिढीनेही हेच करावं का? कदाचित करावंही लागलं असतं, पण मागील पिढीच्या पुरुष वर्गापेक्षा नव्या पिढीचा पुरुष वर्ग इथे बदललेला पाहिला. पुरुष वर्गाने पिढीजात व्यवसायाची जबाबदारी पार पाडत घरच्या स्त्रीला नोकरीसाठी उद्युक्त केले आणि खऱ्या अर्थाने घरातील गृहिणी ही उंबरठ्याबाहेर पडली. सासू नोकरीला, सुनाही नोकरी करू लागल्या आणि मग मुलींची पावलंही आपसुकच नोकरीसाठी बाहेर पडली आणि एक एक करता घरातील साऱ्या स्त्रीया नोकरी करणाऱ्या म्हणून जी ओळख निर्माण झाली, ती अभिमानास्पद भासून गेली.
कारण इथे उंबरठा मध्ये आला नाही. उंबरठ्याची चौकट राखून, मानमर्यादा राखून घराबाहेर पडलेलं घरातील स्त्रियांचं पाऊल हे स्वातंत्र्याचीच तर अनुभूती होती. इथे पुरुष वर्गाची बदललेली मानसिकता पहिल्यांदा पाहिली. घरातील कर्ता पुरुष तोही स्त्रीला नोकरी करू देतो, तिथेच कर जुळले. दुसरी गोष्ट राहिली शिस्तीची, घरोघरी तेच. भाऊ शिस्त दाखवणार, काका, बाबा, आजोबा सारेच आले त्यामध्ये. पण ही शिस्त, मर्यादा आजही एवढी अंगवळणी पडली की, सुनांचं काय होईल, हा प्रश्न निर्माण झाला. मुलींना एवढी शिस्त मग सुना कशा राहणार एवढ्या शिस्तीत. मेकअप कशाला हवा? नैसर्गिक सौंदर्य असावं. लिपस्टीक कशाला? फेकून द्या ती, सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळता काय, डाँकी आणि मेंढीकोट वगैरे फाडा ते पत्ते. अभ्यास झाला का? असे धडे गिरवताना जे होतं ते चांगल्यासाठीच असतं म्हणून मग गप्प राहण्याशिवाय पर्याय नसायचा. पण राहून राहून मुली हे सारं शिस्त वगैरे पाळतील, रितीरिवाज सांभाळतील, पण हाच अट्टहास उद्या घरी येणाऱ्या सुना नाही सांभाळू शकणार, सुना नाही सहन करू शकणार हे सारं असं असायचा.
‘पण मुलींना शिस्त ही उद्या कुणी वावगं बोलू नये म्हणून आहे आणि राहिला प्रश्न सुनांचा, तर सुनांना त्यांचे आई-वडील शिस्त लावून आपल्या घरी पाठवतील.’ हे उत्तर ऐकून कुणाचीच बोलण्याची हिंमत व्हायची नाही. लेकी-सुनांच्या राज्यात लेकींची शिस्त बघून सुना शिस्त शिकतील हा अट्टहासही ठेवणे चुकीचेच आणि सुना नव्या पिढीच्या आणि लेकी जुन्या पिढीच्या हा समज ठेवणेही चुकीचेच. कारण पिढी एकच असली तरी स्वातंत्र्य साऱ्यांनाच हवे असते. म्हणून उगाचच आम्ही शिस्त पाळली म्हणून आपल्या सुनांनीही शिस्त पाळावी असा हेका आजही दिसून येत नाही. कारण आज आम्हाला शिस्त लावणारी आई सासू म्हणून सुनेला तुम्ही म्हणाल तसं म्हणून वावरताना दिसते. बाबा सासरे म्हणून सुनेला लेकीसारखं वागवतात. भाऊ बिनधास्तपणे वहिनीला मेकअप करू देतात. घरात बाकी माणसंही सुनांना स्वातंत्र्य कमी पडू देत नाहीत. मात्र आज त्याच घरच्या लेकी सासरी वावरताना कितीही स्वातंत्र्य असलं तरी अंगी पहिल्यापासून शिस्तीचीच जडण-घडण असल्याने शिस्तीची घडी तर मोडली जाणार नाही ना, म्हणून संस्काराचं गणित मांडताहेत इतकंच!