Friday, May 9, 2025

संपादकीयरविवार मंथन

खटपट मराठीसाठी!

खटपट मराठीसाठी!


  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर



मुलांच्या शिक्षणाचा अतिशय सखोल विचार करणारी महाराष्ट्रातील जी व्यक्तिमत्त्वे आहेत, त्यांच्यात विद्याधर अमृते हे नाव मला महत्त्वाचे वाटते. अमृते सरांनी प्राध्यापक या नात्याने भूगोल हा विषय शिकवला आणि मराठी शाळांतील मुलांकरिता भूगोलाचे नानाविध उपक्रम केले.


शिक्षणाच्या कक्षेतील प्रत्येकच विषयाची भाषा असते. अमृते सरांनी भूगोलाची भाषा घडवली. सरांचे एक छोटेसे पुस्तक आठवते. हे पुस्तक खडकांशी संबंधित आहे. वेगवेगळ्या खडकांच्या प्रकारांची या पुस्तकात सरांनी ओळख करून दिली आहे. या पुस्तकासोबत एक खडकपेटीही मिळालेली आठवते. ती छोटीशी खडकपेटी गंमतीशीर तर होतीच. पण अभ्यासक्रमातला एक भाग सोपा करून सांगायची.


मुलांची पुस्तके निर्दोष असायला हवीत, हा सरांचा आग्रह. पाठ्यपुस्तकातील चुका सर वेळोवेळी माध्यमांना व शिक्षण विभागाला कळवल्याखेरीज राहत नाहीत. शिक्षणविषयक अनेक पुस्तकांची नावे सरांना तोंडपाठ आहेत. अनुताई वाघ नि ताराबाई मोडक यांच्या शिक्षणविचारांवर ठाम विश्वास ठेवून कोसबाड, डहाणू, ऐना या सर्व परिसरात अमृते सरांनी भरीव काम केले नि अजूनही समर्पित वृत्तीने ते कार्यरत आहोत.


मराठी शाळांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरता, त्यांच्या गुणवत्तावाढीकरिता सरांनी नेहमी योगदान दिले. मराठीतील शिक्षणविषयक अंक, पुस्तके यांच्या लेखनाकरिता परिश्रम घेतले. सरांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘चित्रमय महाराष्ट्र’ जेव्हा हाती आला, तेव्हा तो पाहण्यातला अपार आनंद आजही तितकाच ताजा आहे. जेव्हा शाळेत होते, तेव्हा असा चित्रमय महाराष्ट्र उपलब्ध असता, तर मी परीक्षेत नकाशावरचे प्रश्न नेमकेपणाने सोडवले असते.


‘चित्रमय महाराष्ट्र’च्या प्रारंभी मनोगत व्यक्त करताना अमृते सरांनी म्हटले आहे, ‘महाराष्ट्रातील मुलांना ही चित्रमय मानचित्रांची म्हणजेच नकाशांची मायमराठीमधील माळ घालताना मला माझ्या जीवनातील महत्तम आनंदाचा क्षण अनुभवायास मिळतो आहे. भूगोल हा विषय म्हणजे निसर्गाच्या शिक्षणाचेच एक अंग आहे. अर्थातच निसर्ग हा रंगीबेरंगी असतो. मुलांनाही रंगीत नकाशे समजण्यास सोपे असतात. म्हणून ही चित्रमय महाराष्ट्राची कल्पना विविध रंगात साकारण्यात मला विशेष आनंद आहे. ‘सरांनी महाराष्ट्रातील जिल्हे, त्यांची वैशिष्ट्ये, तिथली पिके, फळे, महत्त्वाची ठिकाणे, विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला चालना देणारे प्रश्न, महाराष्ट्रातील त्या त्या ठिकाणाला अनुकूल कविता व गीतांच्या ओळी, आकर्षक रंग नि अतिशय सुंदर कागद यांनी सजलेला अमृते सरांचा हा मराठीतील ‘चित्रमय महाराष्ट्र’!


सरांनी नेहमीच मराठी माध्यमातील मुलांकरिता पूरक पुस्तकांचा विचार केला. भूगोलाची बाग, त्याकरिता आवश्यक साधने असे सुंदर स्वप्न साकारण्याकरिता सर आज प्रयत्न करीत आहेत. साहित्य, संगीत, चित्रकला या सर्वांचा सर मनापासून आस्वाद घेतात. बासरीचे सूर त्यांना जितकी मोहिनी घालतात, तितकाच एखादा शिक्षणविषयक नवा प्रयोग त्यांना भारून टाकतो. अमृते सरांनी चैतन्यशील उपक्रमांसह भूगोलाची भाषा घडवली. मुख्य म्हणजे हे सारंच त्यांनी मराठीतून केले.


‘आली तैसी मना केली खटपट, वाईट का नीट देव जाणे!’ या संत तुकारामांच्या शब्दांवर विश्वास ठेवून अमृते सर मराठीच्या समृद्धीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची ही खटपट मोलाची हे तर खरेच!

Comments
Add Comment