-
गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांतील सातवे! पहाटेच्या घंटा, शंखाच्या नादाने भगवान शंकराला, वाराणसीला जागे केले जाते. हे शिवलिंग सत्याचे प्रतीक मानतात. गर्भगृहाच्या समोरच्या दालनात अंदाजे २५/३० भक्त उभे राहू शकतात.
काशी ! युगानुयुगे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र! आस्था आणि आदराचे सर्वात जुने शहर : काशी!
सतत गजबजलेली नगरी! भगवान शंकराच्या त्रिशुळाच्या टोकावर पवित्र गंगेच्या तीरावर कमानकार वसलेली ही काशीनगरी! येथे भगवान शिव यांना विश्वनाथ (विश्वाचा शासक) किंवा विश्वेश्वर (विश्वाचा ईश्वर) म्हणून गौरविण्यात आले. भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेल्या काशीत त्यांचे पार्वतीसह वास्तव्य होते; म्हणून भगवान शंकरानी आपली राजधानी (काशी) आणि आपले नाव (विश्वनाथ) दिले. काशी शहराचे “काशीनाथ विश्वनाथ मंदिर” हे आताच्या वाराणसीतील हिंदूंचे प्रार्थनास्थळ!
भारताच्या आध्यात्मिक इतिहासात काशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भगवान शिव कित्येकदा रचनात्मक विश्वनाथ म्हणूनही ओळखले जातात. हिंदूंचा असा विश्वास आहे, काशी विश्वनाथ लोकांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करून मोक्ष प्रदान करतो, म्हणून काशीला मोक्ष नगरी असेही म्हणतात. जीवनाचे अंतिम सत्य मृत्यू! भा. रा. तांबे म्हणतात, ‘परमेश्वर भेटीचे साधन मृत्यू.’
काशी शहरातून वाहणाऱ्या वरुण आणि असी या दोन नद्यांच्या नावांवरून बनारसचे नाव वाराणसी झाले. जैन आणि बौद्ध धर्मानेही या नगरीला आकर्षित केले, आपलेसे केले. जन्मभूमी असलेल्या संत कबिरांनी भक्तीची परिभाषा बदलली. शंकराचार्य, गुरुनानक, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, तुळशीदास या आदी महान व्यक्तींनी मंदिराला भेट देऊन येथे वास्तव्य केले होते; परंतु महात्मा गांधीजींनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यावर येथील समस्या मांडल्या. ते लिहितात, चिंचोळ्या गल्लीतून मंदिराकडे जाताना अनेक घरे, वेडीवाकडी दुकाने, निसरडी वाट, सर्वत्र अस्वच्छता, देवाच्या बाजूलाच फुलांची दुर्गंधी, प्रांगण नाही, गंगा नदीतच सोडलेले गटाराचे पाणी, घाटावरच्या प्रेताचे दहन गंगा नदीतच, गलिच्छ किनारा… ७० वर्षांनी पंतप्रधान मोदीजींच्या ड्रीम प्रोजेक्टमधून या समस्या सोडविल्या. मंदिरावर शेकडो वर्षांच्या सततच्या आक्रमणांमुळे आजच्या पुनर्बांधणीत बाबा विश्वनाथ मुक्त झाले. पाहा आताची भव्य दिव्य काशी!
पंतप्रधानांच्या निर्धारामुळे आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे काशी कॉरिडॉरच्या अंतर्गत काशीविश्वनाथ मंदिराचा, तेथील परिसराचा, गंगानदीच्या साऱ्या घाटांचा कायापालट करून सुविधांसह नूतनीकरण केले. १३ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कॉरिडॉरची पायाभरणी करून विश्वधामचे उद्घाटन करीत ते मंदिर लोकार्पण केले. आज सर्व भक्तांना ते मंदिर खुले आहे. मुख्यतः मंदिर ते गंगाघाट रस्ता तयार केल्याने आज मंदिराचे महत्त्व अनेक पटीत वाढले आहे.
मंदिराच्या सुंदरीकरण परियोजनेत हजारो कर्मचाऱ्यांना काम मिळाले. अजूनही काम चालू आहे. मंदिरे स्वच्छ, सुंदर, प्रशस्त आणि रम्य असतील, तर भारतातील, भारताबाहेरीलही पर्यटक येथे येतील. आपल्या संस्कृतीची ओळख होईल. काशीवासीयांच्याही स्वप्नांत नसेल, असे अद्भुत अकल्पनीय मंदिराचे सुशोभीकरण करून तेथे नवा स्वर्ग उभा केला. नुकतेच काशीच्या भेटीत पहिल्या दिवशी काशी शहर, मंदिरे, खाद्यसंस्कृती, बनारस विद्यापीठ पाहिले. काशी विश्वनाथच्या मंदिराची स्वतंत्र वेबसाईट असून आरतीसाठी एक महिना आधी आगाऊ आरक्षण केले.
ब्रह्म मुहूर्ताच्या ३च्या आरतीसाठी पहाटे २च्या आधीच मंदिरापाशी पोहोचलो. येथे फोन कॅमेरा यांना बंदी आहे. विश्वेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांतील सातवे! पहाटेच्या घंटा, शंखच्या नादाने भगवान शंकराला, वाराणसीला जागे केले जाते. हे शिवलिंग सत्याचे प्रतीक मानतात. गर्भगृहाच्या समोरच्या दालनात अंदाजे २५/३० भक्त उभे राहू शकतात. लवकर गेल्याने सुदैवाने तेथे जागा मिळाली. उरलेले ७० जण दरबारच्या बाहेर होते. जवळून षोडोशोपचारे होणारी पूजा, मंत्र आरती, पुजाऱ्याने फेकलेले फुलाचा प्रसादही मिळाला. आरतीनंतर दर्शनासाठीच्या रेटारेटीत गर्भगृहात प्रवेश करताच सोन्याचा चौकोनी मंडप आणि शिवलिंग! मंदिराचे नूतनीकरण करताना १७८० मध्ये अहिल्याबाईने बांधलेल्या मंदिराचे मूळ स्वरूप, धार्मिक पावित्र्य, रणजितसिंहाने बांधलेले सोन्याचे छत्र अबाधित ठेवले. शिवलिंग आणि सोन्याच्या कळसाचे दर्शन घेताना मन भरून आले. एका गुप्त दात्यामुळे काशीविश्वनाथ मंदिर सोन्याने उजळून निघाले. आध्यात्मिक वातावरणात जय भोलानाथ, हर हर महादेवच्या गजरांत, भक्त श्रद्धेनुसार देवाचे दर्शन घेऊन तेथेच थोडा काळ विसावतात. हिंदूना अभिमान वाटावा, असे भव्य स्वच्छ सुंदर मंदिर!…
त्याच दिवशी सारनाथ करून राजघाटावर आलो. दुरूनच दूरवर पसरलेला शांत, प्रशस्त प्लॅटफॉर्म असलेला घाट, बाजूला झाडी. पुढे येताच समोर जणू एका कुटुंबातील पुरुष, स्त्री आणि बालक हात जोडून नमस्कार करत आपल्याला ‘नमस्ते बनारस’ म्हणत स्वागत करतात. ‘नमो नमः घाट’ सुंदर कल्पना. सेल्फी पॉइंट. येथे वर्दळ नसल्याने गंगा नदीत स्नान करून, दिवे सोडले. या नव्या घाटाचे वैशिष्ट्य १. स्नानासाठी खास सोय. २. अपंग वयस्करांसाठी एका बाजूला खास उतरण. ३. बाजूलाच दुमजली मालवीय ब्रिज. ४. फूड कोर्ट, वॉशरूम, थंड-गरम पाण्याचा कुलर. ५. कुठेही न पाहिलेले तरंगता सीएनजी प्लांट.
आपल्या हिंदू संस्कृतीत गंगामैया नदीला धार्मिक महत्त्व आहे. गंगा नदी स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील क्रॉसिंग पॉइंट आहे. घाटांची कमतरता नसलेला गंगा घाट. सूर्यास्ताच्या वेळी रात्रीचा गंगा आरतीचा सोहळा पाहण्यासाठी अलकनंदा क्रूझमध्ये आरक्षित जागी बसलो. वेलकमचे पाणी चहा-बिस्कीट घेतले. क्रूझ सुरू होताच आम्ही डेकवरच्या उघड्या भागात गेलो. गंगा नदीत कचरा नव्हता. अस्सी घाटापासून गंगातीर स्वच्छता अभियानला सुरू झाली होती. अस्सी नदी आणि दशाश्वमेघ घाट आरतीसाठी प्रसिद्ध. मणिकर्णिका घाटाला मोक्षाचे स्थान म्हणतात. येथे देहावर अंतिम संस्कार होतात. येथे अग्नी कधीच विझत नाही. घाट आणि त्यांची नावे वाचतानाच गंगानदीचे पात्र असंख्य पर्यटकांनी भरलेल्या छोट्या बोटींने भरलेले होते. बरोबर तिन्हीसांजेला झांजा, शंख, घंटाच्या आवाजांत, मोठ्या समईच्या प्रकाशांत आरती सुरू होते. नदीत दिवे सोडतात. सारा घाट दिव्याने उजळून निघतो. आरतीत मीही मनाने सहभागी झाले. गंगा आरती हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. या मोठ्या प्रकल्पामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. काशी! आपली संस्कृती समजून घेण्यासाठी एकदा तरी विश्वनाथाच्या दर्शनाला यावे.