-
नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
अनेक उत्तम गाणी एरव्ही हवेत विरून गेली असती, जर रसिकांनी ती आपल्या मनात जपून ठेवली नसती तर! कारण गीतकारांनी समरसून लिहिलेल्या, संगीतकारांनी निगुतीने सजवलेल्या काही अतिशय भावोत्कट गाण्यांना सिनेमात काही आधारच नव्हता. सिनेमाच्या कथानकाशी त्यांचा काही संबंध नसायचा. मात्र मूळ कथेशी थेट संबंध नसताना अशा गाण्यांनी त्यांच्या गुणवत्तेवर आपल्या मनात त्यांचे स्थान निर्माण केलेले असायचे.
सिनेमातील क्लबमध्ये नर्तिका गात असलेले गाणेसुद्धा बहुधा कुणाला तरी उद्देशून गायलेले असायचे. क्लबमध्ये आलेल्या एखाद्या नवख्याला बेधुंद, स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायचे. कधी प्रेक्षकांत बसलेल्या एखाद्या प्रामाणिक प्रेमिकाच्या मनात प्रेयसीविषयी निर्माण झालेला संशय दूर करण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. अनेकदा तर हॉटेलातील असा गाण्यातून ‘परस्परांवर (विशेषत: तरुण स्त्री-पुरुषांनी एकमेकांवर) प्रेम करा, प्रेमच जीवन आहे.’ असा उदात्त आध्यात्मिक संदेशही बिंदू किंवा हेलनसारखी साध्वी देत असायची! ‘जीवनाची क्षणभंगुरता, त्यातून उद्भवलेली प्रेम करण्याची अर्जन्सी’ समजावून सांगण्याचे कामही अशा क्लबमधील गाण्यातून, मुळात आध्यात्माकडे कल असलेल्या अर्धनग्न नर्तिका एकेकाळी हमखास करत!
कधीकधी सस्पेन्स चित्रपटात ती नर्तिका काही महत्त्वाचे गुपित कथानायकाला अशाच गाण्यातून कळवायची. हिंदी सिनेमात तशी प्रथाच होती! अर्थात हे रहस्य जरी आपल्याला सहज ओळखण्यासारखे वाटले तरी त्या नर्तिकेभोवती गोल करून उभ्या असलेल्या खलनायकाच्या साथीदारांना (बहुधा दिग्दर्शकाने आधीच दम दिला असल्याने) कधीच कळत नसे! अनेकदा सिनेमातील प्रेक्षकांत पोलीस वेश बदलून उभे असायचे आणि रुबाबदार काळा फेटा, उंच उभे गंध, काळा नेहरू शर्ट आणि काळेच धोतर, वर वळवलेल्या झुपकेदार मिशा अशा डाकूंच्या ‘अधिकृत गणवेशात’ असलेले डाकू घटनास्थळी उपस्थित असत. त्यांच्याच टोळीतील नर्तिका काही गुप्त संदेश असलेले गाणे (नीट रचून, कोरीओग्राफीत बसवून) गात असली तरी तिचे काय संदेशवहन सुरू आहे, त्याचा पोलिसांना काही थांग लागत नसे! जुन्या सिनेमातील त्या रूढी-परंपरा!
पण, असे काहीच नसलेली अनेक सुंदर गाणीही असायची. ती स्वतंत्रपणे पहिली तर खूप अर्थपूर्ण असत पण कथेशी कोणताही धागा नसल्याने पतंगासारखी हवेत तरंगत असायची. फक्त आशयाच्या, संगीताच्या गुणवत्तेवर ती लोकांच्या मनात जागा मिळवत आणि टिकून राहत. ‘मेहबूब की मेहंदी’ या १९७१साली आलेल्या आणि चक्क गुलजार यांचे संवाद असलेल्या सिनेमात आनंद बक्षीजींचे असेच एक सुंदर गाणे होते. सिनेमाची सुरुवातच त्या गाण्याने होत होती. कॉलेजच्या एका कार्यक्रमात शबानाला (लीना चंदावरकर) गाण्याचा आग्रह होतो आणि ती स्टेजवर जाऊन हे गाणे गाते हेच पहिले दृश्य! गाणे खूप लोकप्रिय झाले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनात ते गायले होते लतादीदींनी!
प्रेमभंगानंतर एक विमनस्कता प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मनाला घेरून टाकते. तिला मग प्रेम या एकंदर विषयाचीच व्यर्थता जाणवू लागते. मनापासून प्रेम करून आपण चूक केली असे वाटू लागते. त्यानंतर तर ‘इतर लोकही कशाला सुखाचा जीव दु:खात घालून कुणावर प्रेम करतात?’ असे तिचे किंवा त्याचे मन स्वत:लाच विचारू लागते. त्या मन:स्थितीचे फार मनोज्ञ वर्णन बक्षीजींनी या गाण्यात केले होते –
इस ज़मानेमें, इस मोहब्बतने,
कितने दिल तोड़े, कितने घर फूंके.
जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं…
दिलके बदले दर्द-ए-दिल लिया करते हैं…?
प्रेमात फार क्वचित यश मिळते. जीवनाचा साथीदार, आयुष्याचा सांगाती, शोधायला निघावे तर कुणाची साथ मिळायच्या ऐवजी उलट टोकाचे एकाकीपण नशिबी येते. हृदय भंगते, मनाचा निर्धार कमकुवत होऊन बसतो –
तन्हाई मिलती है, महफ़िल नहीं मिलती,
राहें मोहब्बत में कभी मंज़िल नहीं मिलती,
दिल टूट जाता है, नाकाम होता है,
उल्फत में लोगोंका, यही अंजाम होता है.
मग ज्योतीवर झडप घेऊन जळून जाणाऱ्या एखाद्या पतंगासारखे लोक का बरे प्रेमात पडतात? आणि अपेक्षाभंग झाल्यावर उसासे भरत आयुष्य कंठतात? असे प्रश्न हरलेल्या प्रेमिकाला पडत राहतात.
कोई क्या जाने, क्यों ये परवाने,
क्यों मचलते हैं, गम में जलते हैं,
आहें भरभरके दीवाने जिया करते हैं,
जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं?
प्रेमात अश्रू अपरिहार्यच असतात का? विरहात प्रियेची आठवण आली की, डोळ्यांत अश्रू येतातच ना? त्यावेळी सतत तिची किंवा त्याची तक्रार करावीशी वाटते. प्रेम असले तरी राग असतो आणि राग असला तरीही प्रेम संपत नाही. मग “नल गे औषध मजला” अशी अवस्था झाल्यावर दुसरे औषधही उपयोगाचे राहात नाही आणि प्रार्थनाही! मग जीवनाचा जवळजवळ अंतच करणारे हे प्रेमाचे विष, इतक्या हौसेने लोक पितात तरी कशाला?
सावन में आँखोंको कितना रुलाती है,
फुरक़तमें जब दिलको किसीकी याद आती है.
ये जिंदगी यूंही बरबाद होती है,
हर वक़्त होंठोंपे कोई फ़रियाद होती है,
न दवाओंका नाम चलता है,
न दुआओंसे काम चलता है,
जहर ये फिरभी सभी क्यों, पिया करते हैं,
जाने क्यों लोग मोहब्बत…
प्रेमात हरलेल्या व्यक्तीच्या जीवनातले प्रत्येक दु:ख जणू त्या एकाच व्यक्तीशी जोडलेले असते! मग खूप विपरीत प्रसंग घडत जातात. जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीला विफल प्रेमाचे किस्से ऐकवले जातात. ‘ती’ कशी बेईमान निघाली, तिला कशी कुणाची कदर नाही, कसे माझ्यावर दडपण आणून तिनेच मला दु:खी केले अशा आपल्याच त्या जीवलगाबद्दलच्या तक्रारी एखाद्या जीवलग मित्राला/मैत्रिणीला ऐकवल्या जातात. प्रेमिकाला वाटत राहते हेच होणार असते तर मग का प्रेम करतात हे एक कोडेच आहे!
महबूबसे हर ग़म, मंसूब होता है.
दिनरात उल्फतमें तमाशा खूब होता है.
रातोंसे भी लम्बे ये प्यारके किस्से
आशिक सुनाते हैं, जफ़ा-ए-यारके क़िस्से
बेमुरव्वत है, बेवफा है वो.
उस सितमगरका, अपने दिलबरका,
नाम ले लेके दुहाई, दिया करते हैं
जाने क्यों लोग मोहब्बत…
अशी ही माणसाच्या मनाचा एक्स-रे काढणारी सुंदर गाणी. त्यांचे वेगळेच हळवे, भाबडे, भावविश्व! त्यातले उत्कट आनंद, घोर निराशा आणि मनाला घेरून टाकणारी दु:खे…!